पंतप्रधान कार्यालय

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 21 JUN 2021 7:22AM by PIB Mumbai

नमस्कार !

तुम्हा सर्वांना सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!! 

आज जेव्हा संपूर्ण विश्व कोरोना महामारीशी लढा देत आहे तेव्हा योग आपल्यासाठी एक आशेचा किरण म्हणून काम करत आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत, जगभरातील सर्व देशांमध्ये तसेच भारतात जरी कोणत्याही मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकले नसले तरीही, योग दिवसाबाबत लोकांचा उत्साह जराही कमी झालेला दिसत नाही. कोरोना महामारी पसरलेली असताना देखील या वेळच्या योग दिनाच्या “स्वास्थ्यासाठी योग” या संकल्पनेने, कित्येक कोटी लोकांच्या योगाबद्दलच्या उत्साहाला आणखीन उत्तेजन दिले आहे. जगातील प्रत्येक देश, प्रत्येक समाज आणि प्रत्येक व्यक्ती निरोगी राहो आणि सर्वजण एकत्र येऊन परस्परांचे सामर्थ्य बनो अशी सदिच्छा मी आजच्या योग दिनानिमित्त व्यक्त करतो.

 

मित्रांनो,

आपल्या ऋषी-मुनींनी योगासाठी "समत्वम् योग उच्यते" असे म्हटले आहे. त्यांनी सुख-दुःखात एक सारखे वर्तन राहावे, वागण्यात संयम राहावा यासाठी योगाला एका मापदंडाचे स्थान दिले आहे. सध्याच्या या जागतिक आपत्तीमध्ये योगाने ही गोष्ट सिद्ध देखील करून दाखवली आहे. कोरोना संसर्गाच्या या दीड वर्षांमध्ये भारतासह जगातील अनेक देशांनी खूप मोठ्या संकटाला तोंड दिले आहे.

 

मित्रांनो,

जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन म्हणजे त्यांचा वर्षानुवर्ष जुना सांस्कृतिक उत्सव नाहीये. सध्याच्या या कठीण परिस्थितीत, लोक योगाचे महत्त्व सहजपणे विसरून जाऊ शकले असते,  योगाकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ शकले असते. मात्र त्याउलट, लोकांचा योगाप्रती उत्साह आणखीनच वाढला आहे. योगामुळे लोकांमध्ये स्नेह वाढीस लागला आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये, जगाच्या कानाकोपऱ्यात लाखोंच्या संख्येने नवे योग साधक तयार झाले आहेत. योगामध्ये सांगितलेल्या  संयम आणि शिस्तबद्धता या सर्वात पहिल्या धड्याला सर्वांनी आपापल्या जीवनात अंगी बाणवायचे प्रयत्न देखील सुरु केले आहेत.   

 

दोस्तांनो,

जेव्हा कोरोनाच्या अदृश्य विषाणूने जगाचा दरवाजा ठोठावला होता तेव्हा कुठलाही देश, साधनांच्या, सामर्थ्याच्या आणि मानसिक अवस्थेच्या पातळीवर या विषाणूशी लढण्यासाठी तयार नव्हता. आपण सर्वांनी पहिले की या कठीण काळात, योग हे आत्मबळ मिळविण्याचे सर्वात मोठे माध्यम बनले होते. या आजाराशी आपण लढू शकतो हा विश्वास योगाने लोकांमध्ये वाढीस लावला.

मी जेव्हा आघाडीवरील योध्यांशी, डॉक्टरांशी चर्चा करतो तेव्हा ते मला सांगतात की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांनी योगाला देखील त्यांचे संरक्षक कवच म्हणून वापरले. योगाच्या सहाय्याने, डॉक्टरांनी स्वतःला तर सशक्त केलेच, पण त्याचसोबत त्यांच्या रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी देखील योगाचा उपयोग करून घेतला. आजच्या घडीला कित्येक रुग्णालयांतून अनेक डॉक्टर्स आणि परिचारिका रुग्णांना योगाचे शिक्षण देत आहेत, तर काही ठिकाणी रुग्ण योगाबद्दलचे आपले अनुभव सांगत आहेत हे दाखविणारे कित्येक फोटो आपल्याला बघायला मिळतात. प्राणायाम तसेच अनुलोम-विलोम यासारखे श्वसनाचे व्यायाम केल्याने आपली श्वसन संस्था किती मजबूत होते याबद्दल जगभरातील अनेक तज्ञ स्वतःहून सर्वांना सांगत आहेत.

 

मित्रांनो,

महान तामिळ संत श्री थिरुवल्लवर यांनी म्हटले आहे-

 

 "नोइ नाडी, नोइ मुदल नाडी, हदु तनिक्कुम, वाय नाडी वायपच्चयल"  म्हणजे, जर काही आजार असेल तर त्याचे निदान करा, त्या आजाराच्या मुळापर्यंत जा, त्या आजाराचे नेमके कारण शोधून काढा आणि मग त्यावर कोणते उपचार योग्य आहेत हे निश्चित करा. योगाने देखील हाच मार्ग दाखविला आहे. आज वैद्यकीय शास्त्र देखील औषधोपचारासोबत, हिलिंग अर्थात  मानसिक पातळीवर आरोग्य प्राप्त करण्याला देखील तितकेच महत्त्व देत आहे आणि हिलिंग प्रक्रियेमध्ये योगसाधना अत्यंत उपयुक्त ठरते. जगभरातील विशेषज्ञ योगाच्या या पैलूबाबत अनेक प्रकारचे संशोधन करीत आहेत, त्यासंबंधी अधिक कार्य करीत आहेत याबद्दल मला समाधान वाटत आहे.

कोरोना आजाराच्या काळात, योगामुळे आपल्या शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत, आपल्या प्रतिकारशक्तीवरील सकारात्मक परिणामांबाबत अनेक संशोधनात्मक अभ्यास सुरु आहेत. आजकाल आपण बघतो की अनेक शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग सुरु होण्यापूर्वी मुलांना 10 ते 15 मिनिटे योग- प्राणायाम करायला लावतात. हा अभ्यास कोरोनाशी लढा देण्यासाठी देखील मुलांना शारीरिकदृष्ट्या तयार करतो आहे.

 

मित्रांनो,

 

भारतातील ऋषींनी आपल्याला शिकवण दिली आहे--

 

व्यायामात् लभते स्वास्थ्यम्,

दीर्घ आयुष्यम् बलम् सुखम्।

आरोग्यम् परमम् भाग्यम्,

स्वास्थ्यम् सर्वार्थ साधनम् ॥

म्हणजेच, योग-व्यायामातून आपले आरोग्य सुदृढ होते, आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते आणि दीर्घकाळ सुखी आयुष्य जगता येते. आपल्यासाठी आरोग्य हेच सर्वात मोठे भाग्य आहे आणि उत्तम आरोग्य हीच सर्व यशाची गुरुकिल्ली आहे. भारतातील ऋषीमुनींनी जेव्हा आरोग्याविषयी चर्चा केली, तेव्हा त्यामागचा अर्थ केवळ शारीरिक आरोग्य हाच नव्हता. म्हणूनच, योगामध्ये शारीरिक आरोग्यासोबतच, मानसिक आरोग्यावरही भर देण्यात आला आहे. जेव्हा आपण प्राणायाम करतो, ध्यानधारणा करतो, इतर योगाभ्यास करतो त्यावेळी आपल्यातील अंतःचेतना जागृत झाल्याचा अनुभव आपण घेत असतो. योगाने आपल्याला हाही अनुभव येतो, की आपली विचारशक्ती, आपले आंतरिक सामर्थ्य इतके जास्त आहे, की जगातील कुठलीही समस्या, 

 

कुठलीही नकारात्मकता आपल्याला दुर्बल करु शकत नाही. योग आपल्याला तणावातून ताकदीकडे, नकारात्मकतेकडून सृजनशीलतेकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. योग आपल्याला मरगळलेल्या वृत्तीपासून चैतन्याकडे, आणि चुकांकडून योग्य आचरणाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो.

 मित्रांनो,  

योगशास्त्राची शिकवण आहे- जगात कदाचित खूप साऱ्या समस्या असतील, मात्र आपल्या आत त्यांची अनंत समाधाने उपलब्ध आहेत. आपण आपल्या विश्वसृष्टीत ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहोत, मात्र आपल्यासमोर असलेल्या अनेक अडथळ्यांमुळे आपल्याला या ऊर्जेची जाणीव होत नाही. अनेकदा, आपण सगळे आपापल्या विश्वाच्या बंद भिंतीमध्ये एकेकटे जगत असतो.हे विभक्तपण आपल्या एकूण व्यक्तिमत्वावर देखील परिणाम करणारे असते. या विभक्तपणापासून, संयुगाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे योग. हे एक अनुभवसिध्द शास्त्र आहे, एकत्वाची,अद्वैताची जाणीव म्हणजे योग. मला याठिकाणी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे शब्द आठवत आहेत. ते म्हणाले होते--

“आपल्या ‘स्व’ चा शोध, देव किंवा इतरांपासून वेगळे होऊन लागत नसतो, तर योग म्हणजे, एकत्रित येण्यातून होत राहणारी ही एक निरंतर जाणीव आहे.” 

‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा मंत्र, भारताची प्राचीन परंपरा असून कित्येक वर्षांपासून आपण त्याचे पालन करतो आहोतच; आज जगानेही ही संकल्पना मान्य केली आहे. आपण सगळे जन परस्परांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहोत.जर मानवतेसमोर काही संकट 

 

आले तर, त्यावेळी योगशास्त्राने आपल्याला सर्वांगीण आरोग्याचा मार्ग सांगितला आहे. योग आपल्याला आनंदी जीवनाचा रस्ता दाखवतो. मला खात्री आहे, सकल समुदायाच्या निरामयतेसाठी, योग आपली प्रतिबंधात्मक आणि सकारात्मक भूमिका पुढेही पार पडत राहील.   

मित्रांनो,

जेव्हा भारताने संयुक्त राष्ट्रांत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा प्रस्ताव मांडला होता, त्यावेळी त्यामागेही हीच भावना होती की योगशास्त्र संपूर्ण विश्वासाठी सुलभतेणे उपलब्ध व्हावे. आज याच दिशेने, भारताने संयुक्त राष्ट्रे आणि जागतिक आरोग्य संघटनेसह एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

आता जगाला- M-Yoga ॲपची ताकद मिळणार आहे. या ॲपमध्ये  योगाभ्यासाच्या सर्वसामान्य नियमपद्धतीच्या आधारावर, योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ, जगातील विविध भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. प्राचीन विद्या आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या संयोगाचे हे एक उत्तम उदाहरण आहे. m-Yoga ॲप जगभरात योगाचा प्रचार आणि विस्तार करण्यात तसेच ‘एक जग, एक आरोग्य’ हा प्रयत्न यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल, असा मला विश्वास वाटतो.

 

 मित्रांनो,

गीतात म्हटले आहे --

 तं विद्याद् दुःख संयोग-

 

वियोगं योग संज्ञितम्।

 याचा अर्थ, दुःखापासून वियोग आणि मुक्ती मिळवणे म्हणजेच योग ! सर्वांना एकत्र घेऊन चालणाऱ्या मानवतेची ही योगयात्रा आपल्याला अशीच निरंतर पुढे न्यायची आहे. मग ते कुठलेही स्थान असो, कुठलीही परिस्थिती असो, कुठलेही वय असो, प्रत्येकासाठी योगशास्त्रात काही ना काही समाधान निश्चित आहे. आज जगात योगाविषयी उत्सुकता असलेल्यांची संख्या खूप वाढते आहे. देश-विदेशात योगसंस्थांची संख्याही वाढते आहे. अशा वेळी योगाचे जे मूलभूत तत्वज्ञान आहे, मूलभूत सिद्धांत आहे, तो कायम ठेवून योगशास्त्र सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावे, निरंतर पोचत राहावे, यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. आणि हे कार्य योगाशी संबंधित लोकांनी, योगाचार्यांनी आणि योगप्रचारकांनी एकत्रित येऊन करायचे आहे. आपल्या सर्वांनाच योगाचा एक संकल्प करायचा आहे आणि स्वतः देखील या संकल्पासाठी काम करायचे आहे. योगापासून सहयोगापर्यंतचा हा मंत्र आपल्याला नव्या भविष्याचा मार्ग दाखवणार आहे, मानवतेला सक्षम करणार आहे.

याच शुभेच्छांसह, आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त संपूर्ण मानव समुदायाला,आपल्या सर्वांना खूप खूप सदिच्छा !

खूप खूप धन्यवाद !

 

*****

MC/SC/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1728955) Visitor Counter : 369