सांस्कृतिक मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2021 साजरा करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘योग- एक भारतीय परंपरा’ या विशेष मोहिमेचे देशभरात आयोजन
‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून 75 वारसा स्थळांवर योग प्रात्यक्षिके आणि सांस्कृतिक कार्यक्रम
Posted On:
19 JUN 2021 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2021
शारीरिक, मानसिक स्वास्थ्य आणि आत्मिक आनंद कमवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या योगविद्येची शक्ती जगाने जाणून घेतली आहे. त्यामुळेच योगविद्या हळूहळू प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मध्यवर्ती स्थान पटकावत आहे. संपूर्ण जगाला सांस्कृतिक परंपरा आणि मानवतेची अमूल्य भेट म्हणून प्रसार झालेली योगविद्या स्वतःचे महत्व अधिक मोठ्या मंचावर सिद्ध करत आहे.
हे लक्षात घेत भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी ‘योग- एक भारतीय परंपरा’ हा कार्यक्रम ‘आजादी का अमृत महोत्सव’ या मोहिमेचा भाग म्हणून आयोजित केला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या सर्व संस्था आणि उपक्रमांच्या सक्रिय सहभागाने 75 सांस्कृतिक वारसा स्थळांवर हा कार्यक्रम केला जाणार आहे. सध्याच्या महामारीच्या कालखंडात प्रत्येक स्थळी फक्त 20 व्यक्तीच या योगावरील कार्यक्रमात सहभागी होतील. या ठिकाणी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अनेक नामवंत व्यक्ती भाग घेणार आहेत.
या कार्यक्रमात पंचेचाळीस मिनिटांच्या योगसाधनेनंतर अर्ध्या तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. योगसाधना सादरीकरणानंतर संगीत नाटक अकादमीचे पुरस्कारप्राप्त युवा कलाकार किंवा विभागीय सांस्कृतिक केंद्रांमधील कलाकारांतर्फे सादर होणारा सांस्कृतिक कार्यक्रम, असे या कार्यक्रमाचे एकूण स्वरूप आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सांस्कृतिक मंत्रालयाच्या सर्व डिजिटल मंचावरून केले जाईल. निवडक 30 ठिकाणांवरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विस्तृतपणे सांस्कृतिक मंत्रालयाच्या डिजिटल मंचांवरून तसेच रेडिओ 104, दूरदर्शन, क्युअरफिट व एफआयसीसीआय यासारख्या मंत्रालयाच्या सहयोगी माध्यमांकडून केले जाईल.
सांस्कृतिक तसेच पर्यटन मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल हे दिल्लीतील लाल किल्ला येथे 21 जून 2019 रोजी सकाळी 7 ते 7.45 या कालावधीत मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह योगाभ्यासाची प्रात्यक्षिके करतील. ती मंत्रालयाच्या सर्व डिजिटल मंचावरून प्रक्षेपित केली जातील.
* * *
S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728644)
Visitor Counter : 156