अल्पसंख्यांक मंत्रालय
देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात कोरोना लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 21 जून 2021 रोजी देशभरात "जान है तो जहाँ है" राष्ट्रव्यापी जनजागृती अभियान सुरु केले जाईल- अल्पसंख्यक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि विविध सामाजिक-शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गट या अभियानाचा प्रारंभ करतील
Posted On:
19 JUN 2021 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2021
केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज नवी दिल्लीत सांगितले की देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि सध्या चालू असलेल्या लसीकरण मोहिमेसंदर्भात पसरवल्या जात असलेल्या अफवा व भीती खोडून काढण्यासाठी “जान है तो जहाँ है " राष्ट्रव्यापी जनजागृती अभियान 21 जून 2021 रोजी सुरु केले जाईल.
नक्वी म्हणाले की अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालय व विविध सामाजिक-शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गट या जनजागृती अभियानाचा प्रारंभ करतील.
ते म्हणाले की, अल्पसंख्यक बहुल जिल्हा रामपूर (उत्तर प्रदेश) येथून राष्ट्रव्यापी जनजागृती अभियान राबविले जाईल आणि देशाच्या विविध भागातही त्याचे आयोजन केले जाईल.
विविध धार्मिक नेते, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, विज्ञान आणि इतर क्षेत्रांतील नामांकित लोक लसीकरणाबाबत लोकांना प्रभावी संदेश देतील. या अभियानाअंतर्गत देशभरात पथनाट्यांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
नक्वी म्हणाले की, काही देशातील काही भागात कोरोना लसीकरणाबाबत अफवा व भीती पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे घटक लोकांच्या आरोग्याचे आणि कल्याणाचे शत्रू आहेत.
ते म्हणाले की दोन “मेड इन इंडिया” कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मिती हे आपल्या वैज्ञानिकांच्या परिश्रमांचे फलित आहे आणि कोरोनाविरूद्धच्या लढाईत या लसी पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी शस्त्र आहेत हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
ते म्हणाले की अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाच्या “नई रोशनी” योजनेंतर्गत राज्य हज समित्या, वक्फ बोर्ड, त्यांच्या संबंधित संस्था, केंद्रीय वक्फ परिषद, मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट या “जान है तो जहाँ है" राष्ट्रव्यापी जनजागृती अभियानाचा भाग असतील. या संघटना कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी लोकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहित व प्रवृत्त करतील.
नक्वी यांनी नमूद केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार देशात जगातील सर्वात मोठे कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान चालवत आहे. देशात आतापर्यंत कोट्यवधी लोकांना लस देण्यात आली आहे. ज्या देशांकडे आधीपासूनच चांगली संसाधने आणि सुविधा आहेत त्यांच्या तुलनेत भारत कोरोना लसीकरणात खूपच पुढे आहे.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728554)
Visitor Counter : 223