आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

दुर्धर आजारांचा सामना करत असलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी तसेच क्षयरोग मुक्त कॉर्पोरेट परिसर निर्मितीसाठी स्वयंस्फूर्तीने देणगी संकलन करण्याविषयी डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्पोरेटसची उच्चस्तरीय बैठक

Posted On: 17 JUN 2021 5:36PM by PIB Mumbai

 

दुर्धर आजारांचा सामना करत असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच, क्षयरोग मुक्त कॉर्पोरेट क्षेत्राच्या निर्मितीसाठी स्वयंस्फूर्तीने देणगी संकलन करण्याबाबत आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. कॉर्पोरेट क्षेत्रातील आणि काही निवडक सार्वजनिक कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच, बैठकीमागचा हेतू स्पष्ट करतांना आरोग्यमंत्र्यांनी, सांगितले की आतापर्यंत जरा दुर्लक्षित राहिलेल्या या उदात्त कार्यात खाजगी क्षेत्राचा सहभाग आणि भागीदारी कशी वाढवता येईल, यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार आहे.

जागतिक आकडेवारीनुसार, सुमारे 8 टक्के लोकांना दुर्धर आजारांचा सामना करावा लागतो. यापैकी 75% टक्के मुले असून त्यांच्या पालकांना या आजारांवरील उपचारांसाठी अनेक ठिकाणी मदत मागावी लागते, त्यांचे सर्व आर्थिक स्त्रोत त्यात संपून जातात आणि यासर्व प्रक्रियेत त्यांना मोठ्या भावनिक तणावातून देखील जावे लागते. असे डॉ हर्षवर्धन म्हणाले. 

भारतात, अशा दुर्धर आजारांचे निदान तसेच उपचार यावर संशोधन आणि अध्ययन करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या विविध पावलांची माहिती देखील हर्षवर्धन यांनी यावेळी दिली. यासाठी दुर्धर आजार समिती स्थापन करण्यात आली, नोडल अधिकारी नेमण्यात आले असून आठ उत्कृष्टता केंद्रात दुर्धर आजार निधी खाती देखील तयार करण्यात आली आहेत. जेनेटिक तपासणीसाठी निदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, तसेच, अशा दुर्धर आजारांवर कमी खर्चात उपचार करणे शक्य व्हावे, यासाठी, डीएचआर अंतर्गत संशोधन मंडळ स्थापन करण्यात आले असून,त्यांच्या संशोधनासाठी औषधांचा पुनर्वापर करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. अशा दुर्धर आजारांच्या निदानासाठी सीएसआयआर  सर्वात मोठा डीएनए सिक्वेन्सिंग प्रोग्राम राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नवी  औषधे आणि क्लिनिकल चाचण्या नियम 2019 अंतर्गत, नव्या औषधांच्या चाचण्या आणि  उपचारांवरील प्रक्रिया जलद करण्यात आली असून, परदेशातून या आजारांसाठी मागवल्या जाणाऱ्या औषधांवरील सीमाशुल्क कमी करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाच्या विचाराधीन आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. 

केंद्रोय आरोग्य मंत्रालयाने देणगी संकलनासाठी राष्ट्रीय डिजिटल पोर्टल तयार केले असून त्यावर दात्यांना वैयक्तिक तसेच कॉर्पोरेट स्वरूपातही देणग्या देता येतील, असे हर्षवर्धन म्हणाले. यातून अशा दुर्धर आजाराच्या रूग्णांवर उपचार होतील आणि त्यांची काळजीही घेतली जाईल. 

आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदाच अशाप्रकारचा उपक्रम राबवत देणगी संकलनासाठी सरकारी देणगी-संकलन पोर्टल सुरु केले आहे. असेही त्यांनी सांगितले. अशा दुर्धर आजारांवरील संशोधनांसाठी देखील कॉर्पोरेट क्षेत्र आणि सार्वजनिक कंपन्या निधी देऊ शकतात अथवा, अशा मुलांच्या उपचारांची जबाबदारी घेऊ शकतात, असे डॉ हर्षवर्धन म्हणाले.

CII, FICCI, ASSOCHAM, PHD-CC चे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

https://twitter.com/DrHVoffice/status/1405406349790388226?s=20

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1727983) Visitor Counter : 576