नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

भारत का अमृत महोत्सव : नवीन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताच्या कामगिरीची माहिती देणाऱ्या वेबिनार मालिकेचे आयोजन

Posted On: 15 JUN 2021 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2021

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतांना, यानिमित्त देशभरात भारत का अमृत महोत्सव या नावाने अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यानिमित्त नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयानेही, भारताच्या नवीन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीची माहिती सांगणाऱ्या वेबिनार मालिकेचे आयोजन केले आहे. 15 मार्चपासून ही वेबिनार मालिका सुरु झाली असून, ती 75 आठवडे चालणार आहे .

याच मालिकेतील, ‘भारतातील सौर पार्क’ या विषयावरील वेबिनार एक एप्रिल 2021 रोजी आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये देशातील सौर पार्कच्या विकासाविषयी चर्चा करण्यात आली.सुमारे 350 जण वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. सौर ऊर्जा पार्कविषयीचे अनुभव यावेळी वक्त्यांनी सांगितले तसेच या क्षेत्रातील आव्हानांविषयीही चर्चा झाली.

12 एप्रिल 2021 रोजी, ‘बायोगॅस प्रकल्प उत्पादक/विकासकांनी एक संवादात्मक वेबिनार आयोजित केले होते. या क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आणि यशोगाथांवर यात चर्चा झाली तसेच बायोगॅस कार्यक्रमाच्या विस्तारीकरणातील आव्हानांवरही यावेळी चर्चा झाली. या वेबिनार मधील चर्चेतून, मंत्रालयाला राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यात मदत मिळू शकेल.

16 एप्रिल रोजी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेने सौर ऊर्जेतील संशोधन आणि नवोन्मेष या विषयावरील वेबिनार आयोजित केले  होते.  सौर ऊर्जा क्षेत्रात अलीकडे झालेली संशोधने आणि नवोन्मेष तसेच NISE ने तयार केलेल्या सौर उत्पादनांच्या व्यवसायिकरणास वाव यावर चर्चा झाली.

‘फोटोव्होल्टाइक संशोधन आणि विकास दूरदृष्टी 2026’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन, 26 एप्रिल रोजी, आयआयटी मुंबईच्या राष्ट्रीय फोटोव्होल्टाइक संशोधन आणि शिक्षण केंद्राने आयोजित केले होते.  येत्या दशकात आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करण्यात मंत्रालय, NCPRE  आणि उद्योग क्षेत्र कशाप्रकारे परस्परांना सहकार्य करु शकतात, यावर या कार्यशाळेत चर्चा झाली. या कार्यशाळेच्या प्रत्येक सत्रात, परिसंवाद आणि प्रश्नोत्तरे झाली.

या चर्चासत्रात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी अशा विविध क्षेत्रातील गरजा, क्षेत्रे आणि विशिष्ट तंत्रज्ञानावर चर्चा केली, जिथे ते NCPR च्या सहकार्याने प्रकल्प राबवू शकतात.यावेळी उद्योग प्रतिनिधींनी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात आवश्यक असणारी कौशल्ये विकास कार्यक्रम राबवून या क्षेत्रातील व्यावसायिकांचे तंत्रज्ञानाचे ज्ञान अद्ययावत करण्यावर भर दिला.

धानाच्या कांड्यांपासून बायोगॅस तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याची अंमलबजावणी या विषयावरील वेबिनार पाच मे रोजी आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्थेने जर्मन रिटेक या कंपनीसोबत या वेबिनारचे आयोजन केले होते. भारत आणि जर्मनीतील 20 तंत्रज्ञानी यावेळी धानाच्या (तांदळाच्या) कांड्यांपासून बायोगॅस निर्मिती, त्यातील आव्हाने आणि अनुभव यावर चर्चा केली. कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीतील यशाविषयी यावेळी चर्चा झाली.

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1727209) Visitor Counter : 182