संरक्षण मंत्रालय
एएलएच Mk-III ताफ्यात सामील करून तटरक्षक दलाने आपल्या हवाई सामर्थ्यात वाढ केली
Posted On:
12 JUN 2021 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेच्या अनुषंगाने संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी आज प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स (एएलएच) एमके-III भारतीय तटरक्षक दलात सामील केली. या स्वदेशी अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सची रचना आणि निर्मिती हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), बंगळुरू यांनी केली आहे.
सध्याच्या कठीण काळात 'मेक इन इंडिया'चे पंतप्रधानांचे स्वप्न पुढे नेत या हेलिकॉप्टर्सचा ताफ्यात समावेश केल्याबद्दल भारतीय तटरक्षक दल आणि हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडच्या चिकाटीचे डॉ. अजय कुमार यांनी कौतुक केले. तटरक्षक दलाच्या व्यापक मोहिमादरम्यान या प्रगत हेलिकॉप्टर्सच्या वापराचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. बंगळुरू इथे कोविड प्रोटोकॉल लक्षात ठेवून आणि सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेला प्रोत्साहन देत हा कार्यक्रम पार पडला ज्यात दिल्लीहून डिजिटल पद्धतीने मान्यवर सहभागी झाले होते.
तटरक्षक दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एचएएलने 19 अतिरिक्त उपकरणांच्या मदतीने ALH Mk-III सागरी आवृत्तीची रचना केली आणि विकसित केली आहे. एचएएल पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत तटरक्षक दलाला 16 ALH Mk-II पुरवणार आहे. ही हेलिकॉप्टर्स जहाजांवरून परिचालन करण्यास सक्षम आहेत ज्यामुळे सागरी-हवाई समन्वयासह शोध, प्रतिबंध क्षमता, तटीय सुरक्षा, शोध आणि बचाव कार्ये, वैद्यकीय स्थलांतरण, मानवतावादी मोहिमा, प्रदूषण निवारण अभियानाच्या दिशेने तटरक्षक दलाची क्षमता वाढेल.
तौते आणि यास चक्रीवादळांदरम्यान अनेकांचे प्राण वाचवल्याबद्दल तसेच अलिकडेच अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे जप्त केल्याबद्दल आयसीजीचे कौतुक करत संरक्षण सचिव म्हणाले की, आयसीजीकडे सरकारने दिलेल्या कठीण जबाबदाऱ्या विचारात घेऊन कालबद्ध रीतीने सेवा क्षमता वाढवणे आवश्यक आहे.
ताफ्यात समावेश झाल्यानंतर 16 एएलएच एमके -III हेलिकॉप्टर्स भुवनेश्वर, पोरबंदर, कोची आणि चेन्नई येथे चार तटरक्षक दलाच्या ताफ्यात नियुक्त केले जातील. किनारपट्टी लगतच्या राज्यांसह सामायिक सागरी सीमावर अनेकदा बेकायदेशीर व्यवहार चालतात तसेच या भागात वारंवार चक्रीवादळ होण्याची शक्यता असते. तटरक्षक दलाचा हा काफिला त्यावर अखंड देखरेख ठेवेल आणि समुद्रात संकटात सापडलेल्या मच्छिमारांना मदत पुरवेल .
तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन यांनी तटरक्षक दलाच्या अलिकडच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना सांगितले की भारतीय तटरक्षक दल आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सज्ज आहे आणि ALH Mk-III च्या समावेशामुळे जहाजावरुन मोहिमा बजावता येतील आणि देखरेख ठेवणे शक्य होईल. ही हेलिकॉप्टर्स सेवा क्षमता बळकट करण्यासाठी जहाज आणि विमानासमवेत समन्वयासह तैनात केली जातील असे त्यांनी स्पष्ट केले.
एचएएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन आणि संरक्षण मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1726598)
Visitor Counter : 260