विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

2-डीऑक्सी-डी-ग्लुकोजच्या निर्मितीसाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्थेकडून ली फार्मा लि.ला प्रक्रिया ज्ञान परवाना

Posted On: 09 JUN 2021 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जून 2021

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची घटक प्रयोगशाळा असणाऱ्या भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्थेने, 2-डीऑक्सी-डी-ग्लुकोजच्या (2-DG) निर्मितीसाठी हैदराबादच्या ली फार्मा या औषध कंपनीशी बिगर-निवडक प्रकारचा परवाना करार केला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था व डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी तयार केलेल्या 2-DG चा कोविड रुग्णांसाठी वापर करण्यास नुकतीच परवानगी मिळाली आहे. याने रुग्णाचा बरे होण्याचा वेग वाढून, प्राणवायूवरील अवलंबिता कमी होण्यास मदत होत असल्याचे दिसून आले आहे. डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीजने हे औषधद्रव्य सॅशे म्हणजे लहान पाकिटांच्या स्वरूपात आणले आहे.

नवी दिल्लीच्या भारतीय औषध महानियंत्रकांची परवानगी घेण्यासाठी अर्ज करणार असल्याचे ली फार्माने सांगितले आहे. ली फार्मा 2-DG ची पाकिटे तयार करुवून व्यावसायिक तत्त्वावर बाजारात आणेल. आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम येथील दुव्वदा विशेष आर्थिक क्षेत्रात हे उत्पादन होणार आहे. जागतिक नियामक संस्थांनी हे उत्पादन केंद्र प्रमाणित केलेले आहे.

CSIR-IICT म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ.श्रीवरी चंद्रशेखर यांनी यातील CSIR ची भूमिका स्पष्ट केली. "सार्स-सीओव्ही-2 विषाणूच्या नमुन्यांवर 2-DG च्या चाचण्या CSIR-CCMB ने घेतल्या असल्याने, ते औषधद्रव्य विकसित करण्यामध्ये CSIR चा सहभाग आहेच. कोविडवरच्या उपचारांमध्ये उपयोगी पडणारी औषधद्रव्ये विकसित करण्यासाठी CSIR चे निरंतर प्रयत्न सुरु असून काही द्रव्यांच्या क्लिनिकल चाचण्याही CSIR ने घेतल्या आहेत. याबरोबरच आता CSIR ने ली फार्मासोबत केलेल्या या करारामुळे कोविड उपचारांमध्ये परवडण्याजोगे पर्याय निर्माण होण्यास मदत होणार आहे."

ली फार्माचे संचालक रघुमित्र अल्ला म्हणाले की, "2-DG च्या निर्मितीसाठी CSIR-IICT सोबत झालेला हा करार म्हणजे कोविड-19 उपचारांसाठी निरनिराळे पर्याय निर्माण करण्याच्या आमच्या धोरणाचाच एक भाग होय." तसेच "नवीन वैविध्यपूर्ण रेणू तयार करण्यासाठी हैदराबादमधील CSIR-IICT विशेष प्रसिद्ध आहे. आता त्यांच्याबरोबर एकत्रितपणे काम करता येणार असल्याचा अभिमान वाटतो." असेही त्यांनी सांगितले.

 

 

Jaydevi PS/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1725636) Visitor Counter : 254