ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

देशाला एकल, तंत्रज्ञानदृष्ट्या आधुनिक साठवण व्यवस्थापन सुविधेची गरज आहे: केंद्रीय मंत्री पीयूष  गोयल


विशिष्ट उत्पादने आणि मालासाठी देशव्यापी साठवण आराखडा सशक्त करण्याची गरज आहे: केंद्रीय मंत्री गोयल

Posted On: 08 JUN 2021 8:03PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, रेल्वे आणि वाणिज्य तसेच उद्योग मंत्री पीयूष  गोयल यांनी आज देशातील अत्यावश्यक वस्तूंच्या साठवण आराखड्याचा आढावा घेतला.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे देखील या आढावा बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत आढावा घेताना, मंत्री पीयूष  गोयल म्हणाले की, देशाला एकल, तंत्रज्ञानदृष्ट्या आधुनिक साठवण व्यवस्थापन सुविधेची गरज आहे. आपण देशातील सर्व साठवण सुविधांचे केंद्रीकरण आणि एकत्रीकरण यांच्या बाबतीत विचार करायलाच हवा असे ते म्हणाले. स्वतंत्र विभागवार साठवण योजनेऐवजी संपूर्णतः सरकार दृष्टीकोनातून याचा विचार व्हायला हवे असे त्यांनी सांगितले. या कामासाठी जागेचे एकत्रीकरण करताना राज्ये तसेच सार्वजनिक उपक्रमांतील साठवणीसाठी राखून ठेवलेल्या जागांचा देखील विचार करायला हवा असे ते म्हणाले. कृषीविषयक पायाभूत सुविधा निधीचा परिणामकारक उपयोग आणि आधुनिक साठवण सुविधा निर्मिती यांच्यात अधिक ताळमेळ राखण्याचा सल्ला गोयल यांनी उपस्थितांना दिला.   

सरकारी-खासगी भागीदारी, गुंतवणूक, नवीन उपक्रम आणि उद्योग यांना चालना देण्यासाठी स्थळ-विशिष्ट दर्जात्मक आराखडे आणि योजना तसेच वातावरण निर्माण करायला हवे असे त्यांनी पुढे सांगितले. उपलब्ध जागा आणि त्याचा उपयोग यांचा जास्तीतजास्त प्रमाणात वापर करून घेण्यासाठी जागा आणि साठवण यांच्यासाठी देखील सर्वोत्तम योजना तयार करायला हवी असे मंत्री गोयल यांनी सांगितले.

अगदी मूळ पातळीवर आणि ब्लॉक पातळीवर आधुनिक आणि किफायतशीर साठवण सुविधा निर्माण केली तर  देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्याचा चांगलाच उपयोग होईल असे गोयल म्हणाले.   

***

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1725421) Visitor Counter : 142