विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाने, मुंबईतील टाटा हॉस्पिटलमधील एसीटीआरईसी येथे घेण्यात आलेल्या पहिल्या सीएआर-टी पेशी उपचारपद्धतीसाठी सहाय्य केले आहे.

याविषयीच्या पहिल्या/ दुसऱ्या टप्पाच्या मानवी चाचण्याना जैवतंत्रज्ञान विभाग/ जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक  परिषद -राष्ट्रीय औषध मिशन यांचे संयुक्त पाठबळ

Posted On: 08 JUN 2021 3:04PM by PIB Mumbai

 

किमेरिक एटीजन रिसेप्टर टी-सेल (सीएआर-टी) थेरपी कर्करोगाच्या उपचारात एक लक्षणीय यशस्वी उपचार पद्धती म्हणून उदयास आली आहे. जागतिक स्तरावर आयोजित केलेल्या मानवी चाचण्यांमधे‌ शेवटच्या टप्प्यातील कर्करोग रूग्णांमध्ये, विशेषत: तीव्र लिम्फोसाइटिक ल्युकेमियाग्रस्त रूग्णांमध्ये आशादायक परिणाम या चाचण्यांनी दाखवून दिले आहेत. कर्करोगाच्या रुग्णांसाठी या तंत्रज्ञानात लक्षणीय उपचार क्षमता असूनही सध्या हे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध नाही. प्रत्येक रूग्णाच्या सीएआर-टी सेल थेरपीची किंमत 3-4 कोटी रुपये  (INR) असते. म्हणूनच हे तंत्रज्ञान परवडणाऱ्या उचित दरात विकसित करणे आणि रूग्णांसाठी उपलब्ध करून देणे हे एक आव्हानच आहे.

उत्पादन प्रक्रियेतील किचकटता हा या उपचार पध्दतीच्या प्रचंड  खर्चाचे एक प्रमुख कारण आहे. कर्करोग आणि इतर आजारांविरूद्ध सीएआर-टी सेल तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन आणि  पाठिंबा देण्यासाठी, बिराक अर्थात जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक  परिषद आणि डीबीटीने पुढाकार घेत, गेल्या 2 वर्षात अनेक उपक्रम आमंत्रित  करत विशेष प्रयत्न  सुरू केले आहेत.

दिनांक 4 जून, 2021 हा टाटा मेमोरियल हाँस्पिटल, आयआयटी मुंबई टीम आणि कर्करोग सेवा क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक दिवस होता, कारण या दिवशी टाटा मेमोरियल सेंटरच्या एसीटीआरईऐसी येथील बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटमध्ये पहिली सीएआर-टी सेल उपचारपध्दती (एक प्रकारची जनुक उपचारपध्दती) करण्यात आली होती.आयआयटी  मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवतंत्रज्ञान (बीएसबीई) विभागात यासाठी आवश्यक  सीएआर-टी पेशींची  रचना आणि निर्मिती करण्यात आली होती.

या संशोधनाच्या कामाला  बिराक-पेस योजनेने अंशतः सहाय केले आहे.

टीएमसी-आयआयटी बॉम्बे यांना , त्यांच्या सीएआर-टी उत्पादनाच्या फेज I / II ट्रायल्सना, डीबीटी / बीआयआरएसीच्या नॅशनल बायोफार्मा मिशनने  संशोधन आयोजित करून या प्रकल्पाच्या विस्तारास अधिक सहाय्य केले आहे.

ही सुरुवातीच्या टप्प्यात असलेली  "भारतातील पहिली" जनुक उपचारपद्धतीअसून ही पायलट मानवी चाचणी आयआयटी मुंबई आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई यांच्यातील समर्पित प्रयत्नांचे आणि उत्कृष्ट सहकार्याचे उदाहरण आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल बायोफार्मा मिशन-बीआयआरएसीने सीएआर-टी पेशींवरील पहिल्या आणि दुसऱ्या  मानवी-टप्प्यातील  - क्लिनिकल चाचणी घेण्यासाठी या संघाला 19.15 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यातील मानवी चाचण्या डॉ. (सर्जन कमांडर  सीडीआर) गौरव नरुला, (बालकर्करोगतज्ञ आणि आरोग्य विज्ञान विषयाचे प्राध्यापक) ,यांनी केल्या  आणि  बायोसायन्स अँड बायोइन्जिनियरिंग (बीएसबीई) विभाग आयआयटी मुंबई येथील प्राध्यापक राहुल पुरवार आणि त्यांच्या गटानेत्याच्या औषधीस्वरुपात वापरायच्या सीएआर-टी सेल निर्माण केल्या.टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे  सहयोगी प्रकल्प म्हणून या दोन तपासनीस संशोधकांनी याची रचना, विकास आणि विस्तृत पूर्व-मानवी चाचण्या केल्या .

आयआयटी-मुंबई चे  संचालक डॉ.सुभासीस चौधरी म्हणाले की, संस्थेसाठी तसेच देशासाठी ही एक  महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. आयआयटी-मुंबई मधील आम्हा सर्वांना आनंद झाला आहे, की टाटा मेमोरियल हॉस्पिटलसह आमच्या शास्त्रज्ञांनी  कर्करोगाच्या उपचारातील अत्याधुनिक उपचार पद्धती यशस्वी करून ती  वापरात आणली आहे. जर चाचण्या यशस्वी झाल्या तर भारतात परवडणाऱ्या दरात उपचार करून लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात. हे आयआयटी-मुंबई  चे संशोधन असून ते सर्वांच्या जीवनासाठी सर्वस्पर्शी ठरेल,अशी अपेक्षा आहे, असेही  चौधरी म्हणाले.

 

जैवतंत्रज्ञान विभागाबद्दल:

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणारा जैवतंत्रज्ञानविभाग (डीबीटी), भारतातील जैवतंत्रज्ञानातील विकासास प्रोत्साहन आणि गती देतो.

 

जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक  परिषद(बीआयआरईसी)बद्दल:

जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परीषद हा भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने (डीबीटी) स्थापन केलेला ना  नफा  या तत्त्वावर सेक्शन‌ 8 शेड्यूल ओ बी, स्थापन करण्यात आलेला सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग  आहे.

***

Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1725321) Visitor Counter : 50