आयुष मंत्रालय

ब्रिक्स देशांमधील पारंपरिक औषधी उत्पादनांचे मानकीकरण नियमन सुसंगत करण्याबाबत वेबिनार संपन्न

Posted On: 04 JUN 2021 9:38AM by PIB Mumbai

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली आयुष मंत्रालयाने नुकतेच   ब्रिक्स देशांच्या पारंपारिक औषधी उत्पादनांच्या मानकीकरण नियमन सुसंगत करण्याबाबत  एका  वेबिनारचे  आयोजन  केले होते.  या कार्यक्रमाला  भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, रशिया आणि ब्राझील मधील पारंपरिक औषध क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ आणि हितधारक उपस्थित होते.  24-26 फेब्रुवारी  2021 रोजी झालेल्या “ब्रिक्स शेर्पाच्या पहिल्या  बैठकी ” दरम्यान आयुष मंत्रालयाने अशा प्रकारचे वेबिनार आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला होता ज्याला सदस्य  देशांनी सहमती दर्शवली होती.  आयुष मंत्रालयाने 25 मार्च 2021 रोजी "पारंपरिक औषधांमधील ब्रिक्स तज्ञांची " आभासी बैठक देखील  आयोजित केली होती.

डॉ . मनोज नेसरी, सल्लागार (आयुष), आयुष मंत्रालय यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले आणि उद्घाटनपर भाषण केले.  वेबिनारबद्दल माहिती देताना डॉ. नेसरी यांनी ब्रिक्स सहकार्यात आणखी वाढ करण्याच्या उद्देशाने पारंपारिक औषध क्षेत्रातील भारताच्या ब्रिक्स 2021 चा प्राधान्यक्रम आणि वितरण योग्य बाबींवर  भर दिला. भारताच्या प्रस्तावामध्ये पारंपरिक औषधांमध्ये ब्रिक्स सहकार्यावरील सामंजस्य करार आणि पारंपरिक औषधांबाबत  ब्रिक्स मंचाची  स्थापना (बीएफटीएम) यांचा समावेश होता. ब्रिक्स देशांमधील पारंपारिक औषधी उत्पादनांचे  मानकीकरण नियमन सुसंगत करण्याची  गरज त्यांनी अधोरेखित केली. आयुष औषध प्रणालीच्या  माध्यमातून कोविड 19 चा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनाही त्यांनी अधोरेखित केल्या.

वेबिनारच्या पहिल्या सत्रादरम्यान, ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधींनी औषध नियमन,  सेवा मानके आणि नियम; त्यांच्या संबंधित देशांमध्ये पारंपारिक औषधांबाबत मार्गदर्शन याबाबत सादरीकरण केले. भारताकडून “आयुष नियम आणि औषध मार्गदर्शन  मानक”; "भारतीय औषधाच्या पारंपारिक प्रणालींचा कोश - एक आढावा आणि " आयुष आरोग्यसेवा मानकीकरण आणि नियमन " यावर सादरीकरण  करण्यात आले.  वेबिनारच्या दुसर्‍या सत्रादरम्यान, ब्रिक्स देशांमधील पारंपारिक औषधाच्या क्षेत्रातील उद्योग हितधारकांमध्ये  चर्चा झाली. भारत आणि चीनमधील पारंपारिक औषध उद्योगाच्या प्रतिनिधींनी विस्तृत सादरीकरण केले.

ब्रिक्स देशांतील पारंपारिक औषध तज्ज्ञांनी व हितधारकांनी ब्रिक्स देशांसह जागतिक स्तरावर पारंपारिक औषधाना चालना देण्यासाठी  भारताने केलेले  प्रयत्न आणि उपाययोजनांची प्रशंसा केली आणि त्यासाठी सहकार्य व सहाय्य करण्याचे आश्वासन दिले .

***

Jaidevi PS/Sushama K/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1724329) Visitor Counter : 131