कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक निवृत्तीवेतन नियमांचे सुलभीकरण : डॉ जितेंद्र सिंग
Posted On:
31 MAY 2021 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2021
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक निवृत्तीवेतन नियमांचे सुलभीकरण करण्यात आल्याचे केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन , अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीत सांगितले.
कोविड -19 महामारी दरम्यान निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाने केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांबद्दल थोडक्यात माहिती देताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की इतर औपचारिकता किंवा प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा न करता पात्र कुटुंब सदस्याकडून कौटुंबिक निवृत्तीवेतन आणि मृत्यू प्रमाणपत्र दावे प्राप्त झाल्यानंतर तात्काळ तात्पुरते कौटुंबिक निवृत्तीवेतन मंजूर करण्याची तरतूद अलिकडेच करण्यात आली. ते म्हणाले, ही तरतूद महामारी दरम्यान कोविडमुळे किंवा बिगर कोविड कारणामुळे झालेल्या मृत्यूसाठी लागू आहे.
सीसीएस (निवृत्तीवेतन) अधिनियम 1972 च्या नियम 80 (A) नुसार, सेवाकाळात सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, कौटुंबिक निवृत्तीवेतन प्रकरण अधिदान व लेखा कार्यालयाकडे पाठविल्यानंतरच कुटुंबातील पात्र सदस्याला तात्पुरते कौटुंबिक निवृत्तीवेतन मंजूर केले जाऊ शकते. मात्र सध्याची महामारी लक्षात घेता, पात्र कुटुंब सदस्याकडून कौटुंबिक निवृत्तीवेतन आणि मृत्यूच्या प्रमाणपत्राचा दावा प्राप्त झाल्यानंतर अधिदान व लेखा कार्यालयाकडे पाठविण्याची वाट न पाहता लगेचच तात्पुरते कौटुंबिक निवृत्ती वेतन मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे, त्यांनी सांगितले की कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच जाहीर केलेली आणखी एक सुधारणा आहे, ज्यात अधिदान व लेखा कार्यालयाच्या सहमतीने आणि विभागप्रमुखांच्या मंजुरीनंतर सेवानिवृत्तीच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत तात्पुरते कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्याची मुदत वाढवण्याची महत्त्वपूर्ण तरतूद आहे.
सीसीएस (निवृत्तीवेतन), 1972 च्या नियम 64 नुसार सरकारी कर्मचारी त्याचे निवृत्तीवेतन निश्चित होण्यापूर्वी सेवानिवृत्त होणार असेल तर सामान्यत: सहा महिने कालावधीसाठी तात्पुरते निवृत्तीवेतन मंजूर केले जाते.मात्र कोविड महामारी लक्षात घेता, कागदपत्रे सादर करण्यास विलंब झाला असेल तर नियम 64 नुसार तात्पुरते कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, महामारीच्या पार्श्वभूमीवर, निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभाग वेळोवेळी निवृत्तिवेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित प्रत्येक समस्येला अतिशय संवेदनशीलतेने प्रतिसाद देत आहे. त्यानुसार सुधारणाही हाती घेण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723244)
Visitor Counter : 259