विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 विरोधातील संघर्षात तंत्रज्ञान विकास मंडळाच्या पाठबळाने विज्ञानाधारित स्टार्ट अप्सची महत्त्वाची भूमिका

Posted On: 29 MAY 2021 12:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2021

कोविड-19 ला तोंड देण्यासाठी विज्ञानावर आधारित स्टार्ट अप्स अतिशय सक्रिय पद्धतीने लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवत आहेत आणि या महामारीची हाताळणी करण्यासाठी देशाला मदत करत आहेत.

या अतिशय व्यापक युद्धामध्ये एकीकडे संशोधक, उद्योगपती आणि उद्योजकांनी आपल्या क्षमता एकवटल्या आहेत आणि सर्व आघाड्यांवर ते पुरेपूर प्रयत्न करत आहेत आणि त्याचवेळी विज्ञानावर आधारित अनेक स्टार्ट अप्स नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देत आहेत, विद्यमान तंत्रज्ञानाचा नव्या उद्देशासाठी पुनर्वापर करत आहेत, परिचालन कार्यात वाढ करत आहेत आणि सरकारच्या पाठबळाने त्याचा व्यावसायिक उपयोग करत आहेत. 

या काळात देशाचे सक्षमीकरण करण्यासाठी पीपीई किट्स, मास्क यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी, चाचण्यांच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि लसींसाठीचे संशोधन करण्यासाठी सध्याची क्षमता, पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आणि संसाधनांचे सुयोग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञान विकास मंडळ(टीडीबी) या वैधानिक शाखेने अनेक स्टार्टअप्सना टेस्टिंग किट्स, मास्क, सॅनिटायजर, थर्मल स्कॅनर आणि वैदयकीय उपकरणांचा व्यावसायिक पद्धतीने वापर करण्यासाठी आणि भारताच्या कोविड19 विरुद्धच्या लढ्यात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी साहाय्य केले आहे. कोविड19 विरुद्धच्या लढ्यात आर्थिक पाठबळाची मागणी करत उपाययोजना सुचवण्याचे प्रस्ताव देणाऱ्या कंपन्यानी दिलेल्या निमंत्रणांमधून याची सुरुवात झाली. यामुळे प्रोत्साहन मिळालेल्या अनेक स्टार्ट अप्सनी नावीन्यपूर्ण प्रस्ताव सुचवले. या प्रस्तावांनी विज्ञानावर आधारित असलेल्या अतिशय छोटेखानी स्टार्ट अप्सना विविध तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर करण्यासाठी आणि नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यास मदत केली.

पुण्याची मायलॅब डिस्कव्हरी ही कंपनी आरटी पीसीआर आधारित मॉलिक्युलर डायग्नोस्टिक किट बनवणारी पहिली स्वदेशी कंपनी ठरली. फ्लू सारखी लक्षणे असलेल्या लोकांची तपासणी करणे आणि नमुने शोधण्याचे काम या किटद्वारे करता येत असून या किटला आयसीएमआर आणि सीडीएससीओने अतिशय कमी वेळात मान्यता देऊन ते वापरात आणले. टीडीबीने दिलेल्या पाठबळामुळे या किटचे अतिशय वेगाने उत्पादन सुरू झाले आणि अतिशय कमी कालावधीत दिवसाला 30,000 चाचण्यांवरून दोन लाखांपर्यंत चाचण्यांची संख्या पोहोचली.

त्याशिवाय या कंपनीने एक अतिशय संवेदनशील ऍन्टीजेन किट तयार केला  आहे आणि दुर्गम भागात या चाचण्यांची उपलब्धता नसलेल्या 2 कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत हा किट पोहोचला आहे आणि लक्षावधी भारतीयांना चाचण्यांमधील विलंब आणि त्रुटी टाळता येणे शक्य झाले. या कंपनीने विशेष प्रयोगशाळांची रचना केली आणि त्या महाराष्ट्र, गोव्याचे अंतर्गत भाग आणि देशाच्या अनेक भागांपर्यंत नेण्यात आल्या आणि दुसऱ्या लाटेच्या काळात शहरी आणि ग्रामीण भागात फिरत्या आरटी पीसीआर प्रयोगशाळा देखील तैनात केल्या. अलीकडेच मायलॅब्जने ‘कोविसेल्फ’ नावाचा घरच्या घरी चाचणी शक्य करणारा किट तयार केला. भारताचा हा पहिला स्वयं चाचणी किट ठरला आहे आणि त्याचे जलदगतीने व्यावसायिकीकरण होत आहे. कोविड-19च्या चाचण्यांमध्ये यापुढील काळात ही कंपनी आणखी महत्त्वाची भूमिका बजावण्याची अपेक्षा आहे.

दिल्लीच्या नॅनोक्लिन ग्लोबल नावाच्या कंपनीने एन95 मास्कचे उत्पादन करणारे यंत्र बनवले आहे आणि या मास्कचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन सुरू केले आहे. या कंपनीने दिल्ली पोलिसांना एक लाख एन95 मास्क वाटले असून आणखी तीन लाख मास्कचे उत्पादन करून भारताच्या कोविड19 विरोधातील लढ्याला मोठे पाठबळ पुरवले आहे.

पुण्याच्या थिंकर टेक्नॉलॉजीज इंडिया या कंपनीने विषाणूप्रतिबंधक रसायनांचे आवरण असलेले अतिशय प्रभावी आणि स्वस्त मास्क विकसित केले आहेत. कोरोना विषाणू संसर्ग आणि इतर प्रकारच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहेत. या मास्कचे व्यावसायिक उत्पादन करण्याबरोबरच या कंपनीने विविध सरकारी आस्थापनांमध्ये  अशा 6000 मास्कचे वाटप केले आहे.

बंगळूरुच्या ईवोबी ऑटोमेशन्सने  दोन वेगवेगळ्या प्रकारात  अल्ट्राव्हायालेट सॅनिटायजर बनवले आहेत. यापैकी एक पोर्टेबल प्रकार मुंबई, पुणे येथील रुग्णालये आणि देशभरातील विविध सरकारी शाळांमध्ये वितरित करण्यात आला आहे. या कंपनीने 500 पेक्षा जास्त यूव्ही सॅनिटायजरची विक्री केली असून त्यांच्याकडे विविध संस्थांकडून या सॅनिटायजरची सातत्याने मागणी होत आहे.

कोईंबतूरच्या लॅटोमे इलेक्ट्रिक इंडिया या कंपनीने डिजिटल इमेजिंग आणि बॅटरी बॅकअपच्या सुविधेसह एक पोर्टेबल क्ष किरण यंत्र बनवले आहे. कोविड19 रुग्णांचा अलगीकरण कक्ष आणि अतिदक्षता कक्षात वापरण्यासाठी ते उपयुक्त आहे. वीजपुरवठ्याची समस्या असलेल्या दुर्गम आणि ग्रामीण भागात या यंत्रामुळे क्ष-किरण तपासणीची सुविधा उपलब्ध होईल. या कंपनीने डिजिटल चेस्ट एक्स रे यंत्राची पहिली आवृत्ती रुग्णालयात बसवली आहे.

पुण्याच्या ब्रायोटा टेक्नॉलॉजी या कंपनीने अतिशय हातामध्ये मावेल असा अतिशय सुटसुटीत आणि स्वस्त 'स्पायरोप्रो' हा स्पायरोमीटर बनवला आहे. फुफ्फुसांच्या क्षमतेचे मापन आणि देखरेख करण्यासाठी, संसर्गाचे निदान करण्यासाठी हे उपकरण उपयुक्त आहे. नेहा( नर्स एज्युकेटर अँड हेल्थ असिस्टंट) नावाचे मोबाईल ऍप यासोबत जोडलेले असून त्याच्या सहाय्याने फुफ्फुसाची स्थिती आणि व्हेंटिलेटर सपोर्ट याबाबत टेलिमेडीसीन/ टेलिसमुपदेशन सुविधा मिळू शकते. नावीन्यपूर्ण रोगनिदान तंत्रज्ञानासाठी दिल्या जाणाऱ्या ११व्या ग्रॅहम बेल पुरस्कारासाठी निवड झालेल्या अंतिम स्पर्धकांच्या यादीत ही कंपनी वरच्या स्थानावर होती. या कंपनीने एका प्रश्नावलीवर आधारित 'सेव्ह' नावाचे ऍप विकसित केले असून हे ऍप मुंबई महानगरपालिकेला आणि काही खाजगी कंपन्यांना उपलब्ध करून देण्यात आले होते. गरीब लोकांमध्ये कोविडच्या फैलावाला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने हे ऍप विकसित करण्यात आले होते. यामुळे 100हून जास्त लोकांना मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय मदत मिळवणे शक्य झाले. मध्यम लक्षणे असलल्या लोकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळवता आले.

बंगळूरुच्या कोकोस्लॅब्ज इनोवेटीव सोल्युशन्स या कंपनीने शरीराच्या वाढलेल्या तापमानाचे मापन करणारे, त्याचबरोबर फेस मास्क आणि सामाजिक अंतराचे अनुपालन यावर अतिशय अचूक पद्धतीने देखरेख करू शकणारे उपकरण तयार केले आणि व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध केले आहे. लोकांची गर्दी आणि वर्दळीदरम्यान तापमानाची आपोआप तपासणी करू शकणारे आणि लोकांची प्रतीक्षा आणि संसर्गाची जोखीम कमी करणारे अशा प्रकारचे हे उपकरण तयार करणारी भारतातील ही पहिली कंपनी आहे. रेल्वे स्थानके, विमानतळ, बस थांबे, सरकारी कार्यालये, रुग्णालये या ठिकाणी बसवल्यानंतर एका दिवसात 10,000 लोकांची तपासणी करण्याची या उपकरणाची क्षमता आहे. मास्क न लावणाऱ्या किंवा मास्क योग्य प्रकारे परिधान करत नसलेल्या व्यक्तींना देखील हे उपकरण शोधू शकते.

टीडीबीकडून मिळणाऱ्या निधीच्या पाठबळामुळे या कंंपनीला नवनवीन तंत्रज्ञानावर अधिक चांगल्या प्रकारे काम करता येत आहे. संपर्करहित फेस रेकग्निशन आणि थर्मल ऍनालिटिक्सचे तंत्रज्ञान विकसित करणारी ही कंपनी कोविड पश्चात आपली कार्यालये पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इतर कंपन्यांना देखील त्यासाठी आवश्यक तोडगे उपलब्ध करून देत आहे. ऑक्सिजनच्या टँकरमधील ऑक्सिजनच्या पातळीवर लक्ष ठेवून खूप आधीपासून त्याबाबत इशारा देणाऱे आणि ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरणारे एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेन्सर विकसित करण्याच्या प्रकल्पावर ही कंपनी काम करत आहे. यामुळे आकस्मिक स्थितीमध्ये ऑक्सिजनचा नियोजनबद्ध पुरवठा करणे शक्य होणार आहे. 

 

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1723130) Visitor Counter : 198


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu