आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

पीपीई सूट्स, मास्क्स वापरा, निर्जंतुक करा, पुनर्वापर करा, केवळ ‘वज्र कवच’च्या मदतीने


“आपली साधने काही मिनिटांत निर्जंतुक होतील, त्यावरील 99.999% विषाणू नष्ट होतील”

“जैव-वैद्यकीय कचरा कमी करणारा प्रभावी पर्यावरण-पूरक उपाय”

Posted On: 31 MAY 2021 1:46PM by PIB Mumbai

मुंबई, 31 मे , 2021

मुंबईतल्या ‘इंद्रा वॉटर’या  स्टार्ट-अप कंपनीने विकसित केलेल्या ‘वज्रकवच’ या निर्जंतुकीकरण प्रणालीमुळे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी स्वतःच्या संरक्षणासाठी वापरत असलेल्या साधनांवर असलेले कोविडचे विषाणू निष्क्रिय होतात. पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट),एन-95 मास्क्स, कोट्स, ग्लोव्हज आणि गाऊन्स(ओव्हरऑल) अशा सगळ्या साधनांना निर्जंतूक करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. यामुळे साहजिकच,आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई आणि इतर साधनांचा पुनर्वापर करणे शक्य झाले आहे. ही प्रणाली केवळ त्यांचेच संरक्षण करते असे नाही, तर एका अर्थाने ती पर्यावरणाचेही संरक्षण करते. कारण पुनर्वापरामुळे जैव-वैद्यकीय कचरा तयार होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच, पीपीई किट्स ची उपलब्धता वाढली असून त्यांचा खर्चही कमी झाला आहे.

तुमची साधने काही मिनिटांत निर्जंतुक होतील”

ह्या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हे निर्जंतुकीकरण केवळ काही मिनिटात पूर्ण होते. “वज्र कवच” ही विद्युतभारावर चालणारी उपकरण प्रणाली असून, तिला दार असते. मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथे ‘इंद्रा वॉटर’ कारखान्यात ही प्रणाली तयार केली जाते आणि तिथून ती रुग्णालयांमध्ये पोचवली जाते.

या प्रणालीमुळे साधनांवर असलेले विषाणू एक लाख पटीने नष्ट होतात

“ वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाल्यास, आमची ही प्रणाली सूक्ष्मजीवांची संख्या एक लाख पट पर्यंत कमी करण्यास सक्षम आहे. हिच्या चाचण्यांमध्ये आम्हाला विषाणू आणि जीवाणूंमध्ये पाच लॉग (99.999%) पर्यंत घट झाल्याचे आम्हाला आढळले आहे.”, ‘इंद्रा वॉटर’ कंपनीचे सहसंस्थापक अभिजित व्ही. व्ही. आर यांनी अत्यंत अभिमानाने त्यांच्या या उत्पादनाविषयी माहिती दिली.

‘लॉग घट’ (Log reduction) म्हणजे सक्रीय सूक्ष्मजीवांची साधारण संख्या सांगणारी परिभाषा असून निर्जंतुकीकरण प्रक्रियेत, तितके सूक्ष्मजीव निष्क्रिय होत असतात.  

आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैव अभियांत्रिकी विभागात, या प्रणालीची चाचणी यशस्वी झाली आणि त्यानंतर या विभागाने तिला मान्यता दिली.

“वज्र कवच च्या चाचण्या आणि चाचण्यांची प्रक्रिया, अत्यंत दीर्घकाळ सुरु होती. एशेरिचिया विषाणू MS2(हा एक एकल-धागा असलेला आरएनए विषाणू असून मानवी श्वसनव्यवस्थेतील विषाणू, जसे की फ्लूचे आणि कोरोना विषाणू यासारखा विषाणू म्हणून ओळखला जातो) तसेच ई. कोली स्ट्रेन C3000 वर त्याची चाचणी केली गेली. एका पीपीईवर विषाणू आणि जीवाणूंचे अनेक नमुने पसरवण्यात आले आणि त्यानंतर वज्र कवच प्रणालीत हा पीपीई सूट ठेवण्यात आला.निर्जंतुकीकरण प्रक्रीयेनंतर, पीपीई बाहेर काढण्यात आला, त्यानंतर त्यावरील विषाणूंचे नमुने पुन्हा तपासले गेले ज्याद्वारे, विषाणूंच्या वाढीचे प्रमाण आणि लॉगमधील घट तपासण्यात आली.” अशी माहिती अभिजित यांनी दिली.  या प्रणालीत विविध पातळ्यांवर निर्जंतुकीकरण प्रक्रिया होत असते, ज्यात अद्यायावत ऑक्सिडेशन, कोरोना डीस्र्चार्ज आणि युव्ही-सी लाईट स्पेक्ट्रम यांचा समावेश असून, ती पीपीईवर असलेले विषाणू, जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांना नष्ट करते. ज्यामुळे 99.999% क्षमतेने निर्जंतुकीकरण शक्य होते, असेही अभिजित यांनी सांगितले.

वज्र कवचाची कल्पना

वस्तू, साधनांना एकदा वापरुन फेकून देण्यापेक्षा, त्यांचा पुनर्वापर करता येईल का, या बचतीच्या साध्या मात्र महत्वाच्या विचारातून ‘वज्र कवच’ संकल्पनेचा जन्म झाला, अशी माहिती अभिजित यांनी दिली. “मार्च 2020 मध्ये लागू असलेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या काळात, वज्र कवच या संकल्पनेचा जन्म झाला. या महामारीचा सामना करण्यात, आपण देशाला कशी मदत करु शकू, यावर आम्ही सतत विचार करत असू, त्यावेळी पीपीई किट्स आणि एन-95 मास्कची खूप जास्त मागणी असल्याचे आम्हाला जाणवले. आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स आणि इतर वैद्यकीय उपकरणे पुरवण्यासाठी देशाला बरीच मेहनत करावी लागते. त्यामुळे  आमच्या डोक्यात ही कल्पना आली- “अशी एक सुलभ निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुरु करायची, ज्यातून, आपल्या कोरोना योद्ध्यांना त्यांचे मास्क आणि पीपीई यांचा पुनर्वापर करता येईल.”  

फोटो

बृहद वारंगल महानगरपालिकेच्या आयुक्त पामेला सत्पथी या अ ॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया च्या उपस्थितीत वज्र कवच चे महानगरपालिकेच्या कार्यालयात उद्घाटन करताना

 

कल्पनेपासून अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास

ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी, इंद्रा वॉटरने आपल्या जलशुद्धीकरण तंत्रज्ञानात काही बदल केले आणि त्यातून ही निर्जंतूक प्रणाली जन्माला आली, जी पीपीपी किट्स आणि एन-95 मास्क्स सारख्या साधनांना काही मिनिटात निर्जंतुक करु शकते.

ही संपूर्ण प्रणाली भारतातच विकसित झाली आहे, असे अभिजित यांनी सांगितले. “ही निर्जंतुकीकरण प्रणाली तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व घटक देखील भारतातच तयार झाले आहेत., काहीही बाहेरुन आणलेले नाही.” अभिजित म्हणाले.

इंद्रा वॉटर  ही स्टार्ट अप कंपनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ‘निधी-प्रयास’या जल क्षेत्रातील संशोधनानांना मिळणाऱ्या अनुदान (नवोन्मेष आणि उद्यमशीलता सोसायटी,आयआयटी मुंबई) योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. कोविड या आरोग्य संकटाचा सामाना करण्यासाठी केंद्र सरकारच्या कवच या उपक्रमाअंतर्गत इंद्रा वॉटरसह 51 स्टार्ट-अप कंपन्यांना निधी आणि इतर सहकार्य केले जाते. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारितील राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्यमशीलता विकास मंडळातर्फे (NSTEDB) हा उपक्रम राबवला जात आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त प्रणाली; नवी आवृत्ती लवकरच येणार.

वज्र कवच प्रणाली, सुबक, वापरण्यास सोपी आहे आणि एक प्रणाली 25 खाटांच्या रुग्णालयांसाठी पुरेशी आहे. यामुळे आम्ही पीपीई चा खर्च कमी करू शकतो असे आयआयटी मुंबई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी निशा शाह म्हणाल्या. ही प्रणाली मुंबईच्या कामा रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि आयआयटी मुंबईच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयात बसवण्यात आली आहे. वारंगलच्या एका रुग्णालयातही ही प्रणाली पाठवण्यात आली आहे, असे अभिजित यांनी सांगितले. “सुमारे, 10 वज्र कवच प्रणाली, मुंबईतल्या विविध रुग्णालयात याआधीच लावण्यात आल्या आहेत. अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांशी याविषयी चर्चा केल्यानंतर आम्हाला कळले की, की प्रणाली, केवळ एन-95 मास्क आणि पीपीई किट्स निर्जंतूक करण्यासाठीच नाही, तर प्रयोगशाळेत वापरले जाणारे कोट्स, मास्क, अॅप्रन्स, फेस शिल्ड, अतिदक्षता विभागातील इतर साधने, विविध वैद्यकीय साधने, उपकरणे आणि इतर वैद्यकीय कापडांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीही वापरली जात आहे.”

या प्रणालीच्या आकाराविषयी माहिती देतांना अभिजित यांनी सांगितले, की सुरुवातीला त्यांनी उपलब्ध साधनांमधूनच हे उपकरण बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता ते या प्रणालीची नवी आवृत्ती विकसित करत आहेत- जी अधिक सुबक आणि वापरण्यास सुलभ अशी असेल. “आम्हाला लोकांकडून ज्या प्रतिक्रिया, सूचना मिळाल्या त्या आधारावर आम्ही ही सुधारित आवृत्ती तयार केली आहे.” मात्र पीपीई किटचा आकार मोठा असल्याने आम्हाला ते मावण्यासाठी या प्रणालीत तेवढी जागा ठेवणे आवश्यक होते. मात्र, तरीही, आम्ही आता त्याचा आकार कमी करण्याचा विचार करतो  आहोत.”

इंद्रा ही 20 सदस्य असलेली स्टार्ट-अप कंपनी असून, त्यांचे मुख्य काम, निवासी सोसायट्या, घरे, उद्योगक्षेत्र, कारखाने अशा ठिकाणांहून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचे निर्जंतुकीकरण करणे हे आहे. या कंपनीशी contact@INDRAwater.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.

***

 

M.Chopade/R.Aghor/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1723081) Visitor Counter : 294