संरक्षण मंत्रालय

एमव्ही एक्स-प्रेस पर्ल या कंटेनर जहाजावर लागलेली भीषण आग विझविण्याकरता भारतीय तटरक्षक दलाचे अथक प्रयत्न

Posted On: 30 MAY 2021 9:32PM by PIB Mumbai

 

श्रीलंकेतील कोलंबोच्या एमव्ही एक्स-प्रेस पर्ल या कंटेनर जहाजावर लागलेली भीषण आग विझविण्याकरता भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) अथक प्रयत्न करीत आहे. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्तपणे 25 मे 2021 पासून सुरू असलेल्या आव्हानात्मक अहोरात्र सुरु असलेल्या अग्निशमन कार्याला 'ऑपरेशन सागर आरक्षा 2' असे नाव देण्यात आले आहे, जे भारत आणि श्रीलंका यांच्यात वाढत्या सागरी सहकार्याचे प्रतीक आहे.

सध्या श्रीलंकेने तैनात केलेली तीन आयसीजी जहाजे आणि चार बोटी अग्निशमन कार्यात सामील आहेत आणि बाह्य अग्निशमन यंत्रणेचा वापर करून एएफएफएफ आणि समुद्राच्या पाण्याची फवारणी करीत आगीशी सातत्याने मुकाबला करीत आहेत. अग्निशमनाच्या संयुक्त अथक प्रयत्नांना सकारात्मक परिणाम मिळाला असून आग नियंत्रित होण्याची चिन्हे वाढत आहेत. धुराचे लोटही कमी झाले आहेत. आग आटोक्यात आली असून जहाजाच्या मागील भागातील छोट्याशा भागापुरती मर्यादित आहे.

भारतीय तटरक्षक दलाची वैभवआणि वज्रही जहाजे त्यांच्या अग्निशामक क्षमतेव्यतिरिक्त तेलाच्या गळतीसाठी पुरेशा प्रदूषण प्रतिसाद (पीआर) क्षमतेनेसुद्धा सुसज्ज आहेत. आयसीजीएस समुद्र प्रहारीच्या 29 मे 2021 पासून असलेल्या तैनाती मुळे प्रदूषण प्रतिसाद क्षमतेला आणखी बळकटी मिळाली आहे. याव्यतिरिक्त, परिस्थितीचे हवाई मूल्यांकन करण्यासाठी मदुराई येथून दररोज आयसीजी डोर्निअर विमाने मागवली जात आहेत. जहाजे व विमानांच्या अहवालावरून असे दिसून आले आहे की तेथे तेल गळती झालेली नाही. अग्निशमनाच्या काळजीपूर्वक आणि अचूक कार्यवाहीतून जहाजातील ट्रिम आणि ड्रॉटमध्ये कोणताही बदल आढळला नाही यावरून जहाजाची स्थिरता आणि जलरोधक क्षमता अबाधित असल्याचे दिसून येते.

भारतीय तटरक्षक दलाची जहाजे आणि श्रीलंकेच्या बोटी सतत परिघीय क्षेत्र थंड करत आहेत. धातुसंबंधीत आग रोखण्यासाठी व विझविण्यासाठी श्रीलंकेच्या हेलिकॉप्टरद्वारे जळत्या जहाजावर डीसीपीच्या पिशव्या टाकल्या जात आहेत. कोच्ची, चेन्नई आणि तुतीकोरिन येथील भारतीय तटरक्षक दल गरजेनुसार त्वरित प्रदूषण प्रतिसादासाठी सज्ज आहे. भारतीय तटरक्षक दल परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे आणि श्रीलंकेचे नौदल, तटरक्षक दल, सागरी पर्यावरण संरक्षण प्राधिकरण (MEPA) आणि इतर अधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधत आहे.

 

***

S.Thakur/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1723008) Visitor Counter : 239