रेल्वे मंत्रालय

"चारधाम यात्रेकरूंना बीजी लिंकच्या नंतरही वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळाली पाहिजे " - पियुष  गोयल


रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी चार धाम प्रकल्पांच्या शेवटच्या मैलापर्यंत जोडणाऱ्या संपर्क योजनांचा घेतला आढावा

चार धाम म्हणजेच यम्नोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथसाठी  नवीन बीजी रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी अंतिम स्थान सर्वेक्षण (एफएलएस) पूर्णत्वाच्या जवळ

Posted On: 27 MAY 2021 6:22PM by PIB Mumbai

 

चार धाम यात्रेकरूंना यात्रेच्या शेवटच्या ठिकाणापर्यंत वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळायला हवी, असे रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. चार धाम प्रकल्पाच्या शेवटच्या मैलापर्यंत जोडणी करणाऱ्या संपर्क योजनांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.

नागरिकांसाठी आरामदायी सोयीसुविधा तसेच त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्व पर्यायांचा सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना  दिले. प्रकल्प पूर्ण होईपर्यंतच्या सविस्तर खर्चासह यात्रेच्या शेवटच्या टप्प्यातील संपर्क व्यवस्थेचे पर्याय तपासले जातील, असे ते म्हणाले.

पर्यटनाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि यात्रेकरूंना सुरक्षितपणे  आणि वेळेत मंदिरात पोहोचणे सोयीचे व्हावे, यासाठी प्रकल्पाचे सर्वंकष नियोजन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

चार धाम म्हणजेच यम्नोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यांना नवीन बीजी रेल्वेने  जोडण्यासाठी अंतिम स्थान सर्वेक्षण (एफएलएस) पूर्ण होत आले आहे.

केदारनाथ आणि बद्रीनाथ रेल्वे जोडणी कर्णप्रयाग स्थानकापासून सुरु होईल. 125 किलोमीटर लांबीच्या ऋषिकेश-कर्णप्रयाग नवीन बीजी रेल्वेमार्ग प्रकल्पाचा हा भाग आहे. गंगोत्री आणि यम्नोत्री रेल्वे जोडणी सध्याच्या डोईवाला स्थानकापासून सुरु होईल. चार धाम बीजी रेल्वे कनेक्टिव्हिटी सर्वेक्षणानुसार नवीन बीजी रेल्वे मार्गाचे टर्मिनल स्थानक बार्कोट, उत्तरकाशी, सोनप्रयाग आणि जोशीमठ येथे संपत आहे.  उभी चढण असलेला भूभाग आणि बीजी रुलिंग ग्रेडियंट्स मर्यादा यामुळे ही ठिकाणे चार धाम मंदिरापासून दूर आहे.

पर्यटनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच यात्रेकरूंना सुरक्षितपणे आणि वेळेत मंदिरात पोहोचणे सोयीचे व्हावे, यासाठी मंदिरांना नवीन बीजी रेल्वे टर्मिनल स्थानकांना जोडण्यासाठी रिकनायसन्स इंजिनिअरिंग सर्वेक्षण (आरईएस) केले जात आहे. पर्यावरण-स्नेही, सुरक्षित आणि त्याच बरोबर पर्यटकांना आकर्षण वाटेल, अशी योग्य व्यवस्था निवडणे हा त्यामागचा उद्देश आहे.

देशभरातील यात्रेकरू उत्तराखंड राज्यातील चारधामला मोठ्या संख्येने भेट देतात. त्याचबरोबर देशी-परदेशी पर्यटकही ट्रेकिंग आणि स्थलदर्शनासाठी या ठिकाणाकडे आकर्षित होतात. तिथवर पोहोचण्याचा सध्याचा रस्ते मार्ग ठिसूळ डोंगराळ उतारांमधून जातो. त्यामुळे या प्रवासात भार, क्षमता, सुरक्षा आणि वेगाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवतात. या चार ठिकाणांना रेल्वेने जोडल्यामुळे तिथवरचा प्रवास अधिक सुरक्षित, किफायतशीर, आरामदायक, पर्यावरणस्नेही होईल आणि सर्व ऋतूंमध्ये त्या ठिकाणी प्रवास करणे शक्य होईल.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1722204) Visitor Counter : 135