शिक्षण मंत्रालय
इयत्ता बारावीची परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी उच्चस्तरीय बैठक
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना परीक्षा आयोजित करण्याबाबत लिहिले पत्र
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार
Posted On:
22 MAY 2021 2:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2021
बारावीच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आणि भागधारक यांच्यासोबत उद्या एक उच्चस्तरीय आभासी बैठकीचे आयोजन केले आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’, केंद्रीय महिला आणि बालकल्याण स्मृती झुबीन इराणी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ‘निशंक’ यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची सुरक्षितता आणि सुरक्षा विचारात घेऊन, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसई, परीक्षा आयोजित करण्यासंदर्भात पर्याय शोधत आहेत. परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाचा उच्च शिक्षण संस्थांशी विचारविनिमय सुरु आहे.
पत्रात नमूद केले आहे की, कोविड -19 महामारीचा शिक्षण क्षेत्रासह विशेषत: बोर्डाच्या परीक्षा आणि प्रवेश परीक्षेसह विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. सद्यपरिस्थिती लक्षात घेता, जवळपास सर्व राज्य शिक्षण मंडळे, सीबीएसई आणि आयसीएसई यांनी 2021च्या इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आणि राष्ट्रीय परीक्षा घेणार्या अन्य संस्थांनीही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याचा परिणाम राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षा आणि देशभरातील इतर प्रवेश परीक्षांवर होतो. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये असलेली अनिश्चितता दूर करण्यासाठी, देशातील सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध राज्य सरकारांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर इयत्ता बारावीच्या सीबीएसई परीक्षांविषयी निर्णय विचारात घेणे योग्य आहे.
पोखरियाल यांनी ट्विटरद्वारे सर्व भागधारक - विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि इतरांकडून यासंदर्भात माहिती मागवली आहे.
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1720857)
Visitor Counter : 327