रेल्वे मंत्रालय

‘तौ ते’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना


सर्व धोकादायक ठिकाणे आणि महत्त्वाचे पूल यांवर अभियांत्रिकी पथकांमार्फत सातत्याने देखरेख

जलद पावले उचलता येण्यासाठी मदतसामग्री सोयीस्कर ठिकाणी स्थापित

रेल्वे प्रचालनात होणार विलंब कमीत कमी राखण्याच्या दृष्टीने तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरत्या थांबवलेल्या सेवा लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु

Posted On: 17 MAY 2021 6:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 मे 2021

 

तौते चक्रीवादळाचा सामना कारण्यासाठी भारतीय रेल्वे सर्व आवश्यक उपाययोजना करीत आहे. त्याचे तपशील पुढीलप्रमाणे-: 

  1. दक्षिण रेल्वे, नैऋत्य रेल्वे, कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या क्षेत्रीय आणि विभागीय कार्यालयांद्वारे परिस्थितीवर सतत देखरेख करण्यात येत असून सर्व रेल्वे स्थानके सतत संपर्कात आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तिच्यावर देखरेख करण्यासाठी आणि तातडीच्या उपायांचे नियोजन करण्यासाठी रेल्वेचे विभाग व क्षेत्रे, राज्य सरकारांच्या संपर्कात आहेत. 
  2. रेल्वेच्या सर्व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा- जसे- अपघात मदत गाडी (ए.आर.टी.), वैद्यकीय साहाय्य याने (एमआरव्ही) आणि टॉवर वाघिणी- या सर्व यंत्रणांना  उच्च दक्षतेचा इशारा (हाय अलर्ट) देण्यात आला आहे. कोणतीही आपत्तीसदृश स्थिती अचानक उदभवल्यास सुसज्ज राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. दगडांचा चुरा, बोल्डर वगैरेंचे साठे तयार ठेवण्यात आले आहेत.
  3. जेथे धोका अधिक असेल तेथे पावसाळ्याप्रमाणे विशेष गस्त घालण्यात येत आहेत. 
  4. संभाव्य धोका असणाऱ्या जागी वाऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवण्यात येत आहे व गाड्यांच्या हालचालींवर सूचनांनुसार वेगमर्यादा घालण्यात आल्या आहेत. 
  5. हवामानाची बदलती स्थिती लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या व कमी पल्ल्याच्या काही प्रवासी गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यातआल्या आहेत तर काही गाड्या गन्तव्य स्थानकापूर्वीच (प्रि -टर्मिनेशन) थांबविण्यात येत आहेत. 
  6. दिनांक 14.05.21 च्या 16:00 वाजल्यापासून आपत्ती व्यवस्थापन विभाग सुरु करण्यात आला आहे 
  7. गोवा बंदर, वास्को द गामा आणि अन्य स्थानकांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गांवर योग्य त्या उद्घोषणा करण्यात येत आहेत. चक्रीवादळाचा तीव्रता वाढल्यास रेल्वेगाड्या थांबवण्यात येतील. मात्र, आत्ताही अगदी कमी गाड्या धावत आहेत. 
  8. बंदरांवर रेल्वे डब्यात माल भरणे व काढून घेणे या कामांमध्ये चक्रीवादळाच्या तीव्रतेनुसार आवश्यक ते बदल करण्यात आले असून, त्यानुसार प्रचालन करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. जीवितहानी आणि वित्तहानी होणार नही अशा बेताने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.. 
  9. संभाव्य धोका असणाऱ्या सर्व भागात व महत्त्वाच्या पुलांवर अभियांत्रिकी पथकांचे सातत्याने लक्ष असून, झटपट प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने मदतसामग्री सोयीस्कर ठिकाणी ठेवण्यात आली आहे. 
  10. राज्याच्या हवामान विभागांशी रेल्वे सतत संपर्कात असून त्यानुसार कार्यवाही करत आहे.

जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी सुरक्षा विभागानेही आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रेल्वे प्रचालनात होणार विलंब कमीत कमी राखण्याच्या दृष्टीने तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरत्या थांबवलेल्या सेवा लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.


* * *

Jaydevi PS/J.Waishampayan/D.Rane

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai    /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1719398) Visitor Counter : 142