आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
औरंगाबाद मध्ये लावण्यात आलेल्या व्हेंटीलेटर्सची सद्यस्थिती
उत्पादकांकडून काहीही मार्गदर्शन न घेता तात्पुरत्या स्वरूपात व्हेंटीलेटर्सची स्थापना
ऑक्सिजन मास्क योग्य रीतीने न लावल्यामुळे किमान एक व्हेंटीलेटर संपूर्ण स्वरूपात कार्यरत होऊ शकले नाही
व्हेंटीलेटर्स सुव्यवस्थित चालण्यासाठी उत्पादकांकडून सर्व प्रकारचे तांत्रिक सहाय्य प्रदान
Posted On:
14 MAY 2021 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2021
कोविड रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचाराच्या योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार “एक संपूर्ण सरकार’ म्हणून नेतृत्व करत, गेल्या वर्षभरापासून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविडच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सर्वतोपरी सहकार्य करत आहे. रुग्णालयात सध्या असलेल्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकार राज्ये/ केंद्रशासित प्रदेश/केंद्रीय रुग्णालयांना/संस्थांना व्हेंटीलेटर्ससह अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा एप्रिल 2020 पासून करत आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पुरवण्यात आलेले ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत निर्मित काही व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. मात्र हे वृत्त निराधार आणि चुकीचे असून, पूर्ण माहिती न घेताच प्रसिध्द करण्यात आले आहे.
या महामारीची सुरुवात झाली, त्यावेळी देशभरातील सरकारी रूग्णालयांमध्ये अत्यंत मर्यादित संख्येने व्हेंटीलेटर्स उपलब्ध होते. एवढेच नाही तर, भारतात अत्यंत कमी प्रमाणात व्हेंटीलेटर्सचे उत्पादन होत होते. आणि परदेशातील अनेक पुरवठादार कंपन्या देखील भारतात मोठ्या प्रमाणात व्हेंटीलेटर्स पाठवण्याच्या स्थितीत नव्हत्या. अशा स्थितीतच, भारतातील व्हेंटीलेटर्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातील उत्पादकांना “मेक इन इंडिया’ अंतर्गत, व्हेंटीलेटर्सची निर्मिती करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात आले आणि त्यांना व्हेंटीलेटर्स चे ऑर्डरही देण्यात आली. त्यांच्यापैकी अनेक कंपन्या पहिल्यांदाच व्हेंटीलेटर्सचे उत्पादन करणार होत्या. त्यांनी तयार केलेल्या व्हेंटीलेटर्सच्या मॉडेल्सच्या अत्यंत कमी वेळात या क्षेत्रातल्या तज्ञांमार्फत, अनेक चाचण्या, तांत्रिक प्रात्यक्षिक आणि वैद्यकीय परीक्षण करण्यात आले. आणि त्यांच्या मान्यतेनंतरच, या व्हेंटीलेटर्सचा पुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली.
अशी काही राज्ये आहेत, ज्यांना व्हेंटीलेटर्सचा पुरवठा करण्यात आला आहे मात्र, अद्याप ते रुग्णालयांमध्ये लावण्यात आले नाहीत. ज्यांच्याकडे गेल्या चार-पाच महिन्यांपासून 50 पेक्षा जास्त व्हेंटीलेटर्स न लावता पडून आहेत, अशा सात राज्यांना केंद्रीय आरोग्य सचिवांनी 11 एप्रिल 2021 रोजी पत्र पाठवले होते. हे व्हेंटीलेटर्स लवकरात लवकर लावावेत जेणेकरुन त्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करता येईल, अशी विनंती त्या पत्रात करण्यात आली होती.
ज्योती CNC या कंपनीने तयार केलेले व्हेंटीलेटर्स औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले होते. ज्योती CNC ही मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत कार्यरत व्हेंटीलेटर्स उत्पादक कंपनी आहे. त्यांनी, अधिकारप्राप्त गट-3 च्या सूचनेनुसार, केंद्रीय पातळीवर व्हेंटीलेटर्सचा पुरवठा केला होता. राज्यांना त्यांच्या विनंतीनुसार, या व्हेंटीलेटर्सचा पुरवठा करण्यात आला. या पुरवठादारांना पीएम केअर्स फंड मधून निधी देण्यात आलेला नाही.
औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये, 150 व्हेंटीलेटर्सचा पुरवठा,ज्योती CNC कंपनीने केला आहे. 19 एप्रिल 2021 रोजी 100 व्हेंटीलेटर्सची पहिली खेप औरंगाबाद इथे पोचली होती, आणि त्यानंतर राज्य सरकारकडून मिळालेल्या वितरण यादीनुसार, विविध ठिकाणी हे व्हेंटीलेटर्स बसवण्यात आले. पहिल्या खेपेतील 100 पैकी 45 व्हेंटीलेटर्स मेडिकल कॉलेजमध्ये बसवण्यात आले. त्यानंतर, व्हेंटीलेटर्स योग्य प्रकारे बसवल्याचे आणि त्यांचे कार्य योग्य सुरु असल्याचे प्रमाणपत्र या सर्व व्हेंटीलेटर्ससाठी रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले. त्याआधी व्हेंटीलेटर्स योग्य प्रकारे बसवले जाऊन त्यांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले होते.
या 45 व्हेंटीलेटर्सपैकी 3 व्हेंटीलेटर्स नंतर राज्याच्या अधिकाऱ्यांनी एका खाजगी (सिग्मा रुग्णालय) रुग्णालयात लावले. ते खाजगी रुग्णालयात लावण्याचे कामही ज्योती CNC कंपनीच्या अभियंत्यांनीच केले होते आणि ते लावण्याचे व वापराचे प्रात्याक्षिक दाखवल्यानंतर ते सुव्यवस्थित चालू असल्याचे प्रमाणपत्र रुग्णालय प्रशासनाने दिले होते.
त्यानंतर, राज्यातील अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार, 45 पैकी 20 व्हेंटीलेटर्स आणखी एका खाजगी रुग्णालयात (एमजीएम रुग्णालय) लावण्यात आले. याबद्दल ज्योती CNC कंपनीला काहीही औपचारिक माहिती देण्यात आली नव्हती, त्यामुळे ज्योती CNC कंपनी व्हेंटीलेटर्सच्या पुनर्स्थापना प्रक्रियेत सहभागी नव्हती. नव्या जागी हे सर्व व्हेंटीलेटर्स राज्यातील अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवरच बसवण्यात आले होते.
पहिल्या खेपेतील 55 व्हेंटीलेटर्स आणखी चार ठिकाणी पाठवण्यात आले. त्यात (चार जागा म्हणजे, बीड, उस्मानाबाद, परभणी आणी हिंगोली मधील) नागरी रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले. हे सर्व व्हेंटीलेटर्स योग्य प्रकारे लावले गेले असून नीट कार्यरत आहेत, अशी प्रमाणपत्रे 50 व्हेंटीलेटर्ससाठी संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. पाच व्हेंटीलेटर्स बीडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णालय अधिकाऱ्यांकडून सूचनांची वाट बघत, अद्याप तशीच पडून आहेत.
50 व्हेंटीलेटर्सची दुसरी खेप, 23 एप्रिल 2021 ररोजी, औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आली होती. त्यापैकी केवळ 2 व्हेंटीलेटर्स खाजगी रुगणालयात (सिग्मा रुग्णालय) बसवण्यात आले. व्हेंटीलेटर्स योग्यप्रकारे बसवल्यानंतर आणि प्रात्याक्षिक दाखवल्यानंतर तसे आणि ते कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र संबंधित रुग्णालय प्रशासनाने दिले. इतर 48 व्हेंटीलेटर्स सध्या औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पॅकबंद पडून असून ते बसवण्याविषयीच्या सूचनेची ज्योती CNC आणि HLL कंपनीला प्रतीक्षा आहे.
23 एप्रिल रोजी, (जीएमसी रुग्णालयात, व्हेंटीलेटर्स लावल्यानंतर चार दिवसांनी) आठ व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याची तक्रार दूरध्वनीवरून प्राप्त झाली होती. या तक्रारीची दाखल घेत, या विक्रेत्याच्या अभियंत्यांनी सर्व ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन, आठ व्हेंटीलेटर्सची पाहणी केली. तीन व्हेंटीलेटर्समध्ये रुग्णालयांनी फ्लो सेन्सर इंस्टॉल केलाच नसल्याचे त्यांना आढळले. एका व्हेंटीलेटरमधील ऑक्सिजन सेल सुरु नव्हते, तिथे नवा ऑक्सिजन सेल लावण्यात आला, त्यानंतर व्हेंटीलेटर सुरु झाले.
ज्योती CNC ला 10 मे रोजी एक फोन आला, ज्यात, दोन व्हेंटीलेटर्स अतिदक्षता विभागात लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. त्यापैकी, एक NIV(नॉन इन्व्हेसिव्ह (BiPAP) मोड) मध्ये गेल्याने रुग्णाच्या शरीरातील (रक्तातील) ऑक्सिजनची पातळी कायम ठेवण्याचे काम करू शकत नव्हते. याची तपासणी अतिदक्षता विभागाच्या बाहेर व्हावी,असे अधिकाऱ्यांनी सूचित केले. त्यानुसार, तपासणी करण्यात आली, आणि असे आढळले की हे व्हेंटीलेटर योग्यप्रकारे काम करत आहे . रुग्णालय प्रशासनाचे समाधान झाल्यावरच तंत्रज्ञाचा चमू तिथून निघाला. त्यानंतर 12 मे रोजी हे व्हेंटीलेटर पुन्हा एकदा रुग्णाच्या सेवेसाठी एनआयव्ही मोडमध्ये वापरण्यात आले. 13 मे रोजी दुपारी ज्योती CNC ला असे कळवण्यात आले की हे व्हेंटीलेटर्स संपूर्ण क्षमतेने पीप (PEEP) सुविधा देऊ शकत नाही. दुपारीच कंपनीच्या तंत्रज्ञ चमूने रूग्णालयाला भेट दिली. मात्र, तोपर्यंत, तेच व्हेंटीलेटर रुग्णासाठी आयव्ही मोडवर पूर्ण क्षमतेने वापरले जात असल्याचे आढळले. हे व्हेंटीलेटर्स रुग्णावरील उपचारात उत्तम काम करत असल्याचे त्यांना आढळले.
मात्र ज्योतीच्या अभियंत्यांनी, तक्रार उद्भवलेल्या सर्व उपकरणांची पाहणी केली, त्याचे परीक्षण केल्यावर त्यांना आढळले की रुग्णाला ऑक्सिजन मास्क योग्य न लावल्यामुळे होणाऱ्या ऑक्सिजन गळतविषयी त्या उपकरणातून, वारंवार अलार्म दिला जात होता. (रुग्णाच्या आकारमनानुसार, योग्य आकाराच्या मास्कचा वापर करुन ही गळती रोखता येऊ शकते. व्हेंटीलेटरच्या लॉगवरून हा निष्कर्ष काढण्यात आला.)
कंपनीचे अभियंते अद्याप रुग्णालयातच असून, ज्यावेळी एनआयव्ही मोडवर व्हेंटीलेटर रुग्णाला लावले जाईल, त्यावेळी त्याचे प्रात्यक्षिक ते रुग्णालय प्रशासनाला दाखवू शकतील. सध्या हे व्हेंटीलेटर आयव्ही मोडवर उत्तमरीत्या काम करत आहे.
त्यानंतर, औरंगाबादच्या जीएमसी रुग्णालयाने, आधी बसवण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या 22 व्हेंटीलेटर्सची पुनर्स्थापना आणि प्रात्यक्षिक रुग्णालयाच्या संपूर्ण चमूसमोर पुन्हा दाखवण्याची इच्छा व्यक्त केली. आज आणि उद्या ज्योती CNC च्या अभियंत्यांकडून हे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, 9 मे रोजी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुन्हा एकदा सर्व व्हेंटीलेटर उत्पादकांचे हेल्पलाईन क्रमांक पाठवले होते. सर्व व्हेंटीलेटर्स वर देखील हे क्रमांक लावण्यात आले आहेत. त्याशिवाय, राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील संबंधित नोडल अधिकाऱ्याने तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर देखील हे क्रमांक देण्यात आले आहेत. या ग्रुपवर रुग्णालये आणि उत्पादकांच्या तंत्रज्ञ चमूचे प्रतिनिधी देखील आहेत. त्यामुळे, काही समस्या उद्भवल्यास तातडीने तिचे निराकरण होऊ शकते. उत्पादकांचे समर्पित इमेल आयडी देखील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718728)
Visitor Counter : 258