संरक्षण मंत्रालय
रक्तातील ऑक्सिजन पातळीवर आधारित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी, डीआरडीओने विकसित केलेल्या 'ऑक्सिकेअर' यंत्रणेची 1.5 लाख एकके खरेदी करण्यास पीएम केअर्स निधीची मान्यता
Posted On:
12 MAY 2021 4:28PM by PIB Mumbai
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या 'ऑक्सिकेअर' यंत्रणेची 1,50,000 एकके, 322.5 कोटी रुपये खर्चून खरेदी करण्यास पीएम केअर्स निधीने मान्यता दिली आहे. ऑक्सिकेअर ही रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीनुसारचा ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा असून, पुरवठा सुरु असताना रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी लक्षात घेऊन त्याप्रमाणे ती स्वतःच मात्रेचे नियमन करू शकते. पीएम केअर्स निधीने दिलेल्या मंजुरीनुसार 1,00,000 मानवसंचलित आणि 50,000 स्वयंचलित एकके आणि नॉन-रिब्रीदर प्रकारचे ऑक्सिजन पुरवठ्यास उपयुक्त असे मास्क खरेदी करण्यात येत आहेत.
ऑक्सिकेअर यंत्रणा एसपीओटू म्हणजेच रक्तातील ऑक्सिजन च्या पातळीवर आधारित असा ऑक्सिजन पुरवठा करते व त्यायोगे, अत्यंत घातक अशा हायपोक्सीया म्हणजे ऑक्सिजनची कमतरता असणाऱ्या स्थितीत जाण्यापासून रुग्णाला वाचवते. ही यंत्रणा डीआरडीओच्या बेंगळुरूमधील DEBEL अर्थात संरक्षण जैव-अभियांत्रिकी आणि विद्युत वैद्यकीय प्रयोगशाळेने, अतिशय उंचावरच्या भागात तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी तयार केली आहे. स्वदेशी बनावटीची ही यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रात वापरण्यास उपयुक्त आणि दणकट आहे. कोविड-19 च्या रुग्णांच्या उपचारांमध्ये तिचा प्रभावी उपयोग केला जाऊ शकतो.
या यंत्रणेचे दोन प्रकार तयार करण्यात आले आहेत. प्राथमिक प्रकारात ऑक्सिजनचा 10 लिटरचा सिलेंडर, दाब व प्रवाह-नियंत्रक, आर्द्रताजनक आणि नाकातील नळी यांचा समावेश आहे. या मानवचलित प्रकारामध्ये एसपीओटूच्या आकड्यानुसार ऑक्सिजन प्रवाहाच्या नियमन माणसाला करावे लागते. तर दुसऱ्या स्वयंचलित प्रकारात ऑक्सिजनच्या सिलेंडरसोबत इलेक्ट्रॉनिक नियंत्रक बसवलेले असून यंत्रणेतील अन्य दोन उपकरणांच्या मदतीने आपोआपच ऑक्सिजनच्या प्रवाहाचे नियमन केले जाते.
एसपीओटूवर आधारित ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेमुळे रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीनुसार ऑक्सिजनचा उचित वापर केला जाऊ शकतो. परिणामी ऑक्सिजनचे सिलेंडर अधिक टिकू शकतात. "रक्तातील ऑक्सिजन ची पातळी किती असता रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा सुरु झाला पाहिजे?" ही मर्यादा आरोग्य कर्मचाऱ्यांना समायोजित (ऍडजस्ट) करता येते. एसपीओटू पातळीवर सतत लक्ष ठेवता येण्यासाठी ती दाखविण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे. या यंत्रणेतीळ अशा विविध सुविधांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
स्वयंचलित यंत्रणेत असलेली आणखी महत्त्वाची सुविधा म्हणजे धोक्याच्या परिस्थितीत वाजविण्यात येणारी इशाराघंटा. रुग्णाची एसपीओटू पातळी खालावत जाणे किंवा यंत्रणेकडून रुग्णाच्या शरीराला जोडलेले 'प्रोब' सुटून जाणे- अशा धोकादायक परिस्थितीत स्वयंचलित यंत्राकडून वाजणाऱ्या इशाराघंटेमुळे मोठा धोका टाळता येऊ शकतो. नॉन-रिब्रीदर प्रकारचे ऑक्सिजन पुरवठ्यास उपयुक्त असे मास्क हे या ऑक्सिकेअर यंत्रणेचाच एक भाग असून यामुळे प्राणवायूची 30-40% बचत होते. प्रत्येक रुग्णांसाठी हे मास्क बदलावे लागतात. ही ऑक्सिकेअर यंत्रणा गृह-विलगीकरण, विलगीकरण केंद्रे, कोविड देखभाल केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये वापरली जाऊ शकते.
डीआरडीओने भारतातील अनेक उद्योगाना हे तंत्रज्ञान पुरविले असून त्यांच्यामार्फत ऑक्सिकेअर यंत्रणांचे उत्पादन होणार आहे.
***
Jaydevi PS/J. Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717966)
Visitor Counter : 262