रेल्वे मंत्रालय

रेल्वेने आसाममधील (ईशान्य फ्रंटीयर रेल्वे) गुवाहाटी येथे विलगीकरण सुविधा असलेल्या 21 डब्यांची तर सिलचरजवळ बदरपूर येथे 21 विलगीकरण सुविधा असलेल्या 20 डब्यांची सोय केली


देशभरात विविध भागातील 17 स्थानकांवर विलगीकरण सुविधा असलेल्या 298 डब्यांमध्ये सुमारे 4700 खाटांचा वापर होत आहे

रेल्वेने केलेल्या स्वच्छता आणि खानपानविषयक सोयींबद्दल रुग्णांकडून सकारात्मक अभिप्राय

Posted On: 07 MAY 2021 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2021

कोविड विरोधातील कठोर लढ्यात सहभागी होत रेल्वे मंत्रालय संबंधित राज्यांच्या मागणीला प्रतिसाद देत त्या त्या ठिकाणी विलगीकरण सुविधा असलेले रेल्वेचे डबे तातडीने पोहोचविण्यासाठी तसेच या सुविधेशी संबंधित कर्मचारीवर्ग आणि सामान यांची तरतूद करीत जलदगतीने कृती करीत आहे. रेल्वे विभागाने विलगीकरण कक्षाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी 70,000 खाटांची सोय असलेला 4,400 विलगीकरण डब्यांचा ताफा वापरासाठी उपलब्ध करून ठेवला आहे.

ताज्या माहितीनुसार, आसाम राज्य सरकारच्या मागणीला प्रतिसाद देत रेल्वेने तातडीने विलगीकरण सुविधा असलेले 21 डबे गुवाहाटीला पाठविले तसेच 20 विलगीकरण डबे आसाममधील (ईशान्य फ्रंटीयर रेल्वे) सिलचर जवळ असलेल्या बदरपूर येथे पाठविले.

त्याचप्रमाणे, विविध राज्यांच्या मागणीनुसार, सध्या 4,700 खाटांची व्यवस्था असलेले 298 विलगीकरण सुविधा डबे कोविड रुग्णांवरील उपचारासाठी राज्य सरकारांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाशी केलेल्या करारातील अटींना अनुसरून पालघर येथे आता रेल्वे विभागाकडून वैद्यकीय उपचारासाठी  21 डबे कार्यान्वित करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून या डब्यांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर्सचे दोन संच देखील  पुरविण्यात आले आहेत.

दिल्ली,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये विलगीकरण सुविधा असलेल्या डब्यांची ताजी स्थिती पुढीलप्रमाणे आहे:-

महाराष्ट्रात, नंदुरबार येथे गेल्या 2 दिवसांत 10 नवे रुग्ण दाखल झाले तर यापूर्वी विलगीकरण सुविधेचा लाभ घेत असलेल्या 10 रुग्णांना घरी सोडण्यात आले. या ठिकाणी सध्या 26 कोविडग्रस्त उपचार घेत आहेत. आतापर्यंत, एकूण, 114 रुग्ण इथे दाखल झाले तर राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी उपचारानंतर 88 जणांना घरी पाठवले.रेल्वे विभागाने नागपूर येथील अजनीच्या मालडेपो स्थानकात 11 कोविड सुविधा डबे उभे केले असून त्यापैकी एक डबा केवळ आरोग्य कर्मचारी आणि सामानासाठी आरक्षित आहे, हे डबे नागपूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. या ठिकाणी 9 रुग्ण दाखल करण्यात आले आणि 6 रुग्ण उपचाराअंती घरी पाठविण्यात आले.

मध्य प्रदेश राज्य सरकारच्या विलगीकरण सुविधा असलेल्या 2 रेल्वे डब्यांच्या मागणीनुसार, पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाने, 320 खाटांची सुविधा असलेले 22 डबे इंदोरजवळच्या ती  ही स्थानकात कार्यान्वित केले आहेत. भोपाळ येथे 20 डब्यांची व्यवस्था केली असून आजमितीला 18 रुग्ण या सुविधेचा लाभ घेत आहेत. या ठिकाणी 302 खाटांची सोय उपलब्ध आहे.

दिल्लीला राज्य शासनाची मागणी संपूर्णपणे पूर्ण करत रेल्वेने 1,200 खाटांची व्यवस्था असलेले 75 कोविड सुविधा डबे पुरविले आहेत. याठिकाणी 1200 खाटा उपलब्ध आहेत.

विविध राज्यांमध्ये रेल्वेने व्यवस्था कलेल्या या कोविड सुविधा डब्यांमध्ये ताज्या नोंदणीनुसार एकूण 177 रुग्ण दाखल झाले तर 117 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. सध्या 60 कोविड रुग्ण या विलगीकरण सुविधेचा लाभ घेत आहेत.

 

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716869) Visitor Counter : 174