नागरी उड्डाण मंत्रालय

गोवा विमानतळावरून अत्यावश्यक वैद्यकीय सामानाची वाहतूक अखंडितपणे सुरु

Posted On: 07 MAY 2021 10:15AM by PIB Mumbai

भारतीय विमानतळ प्राधिकरण, गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यांच्याशी संबंधित कोविड योद्धे अत्यावश्यक वैद्यकीय सामानाची वाहतूक सुरळीत आणि अखंडितपणे सुरु ठेवून कोविड-19 आजाराविरुद्धच्या लढ्यात सक्रीय भूमिका निभावत आहेत. देशभरातील टाळेबंदीच्या कालावधीत, कोविड-19 विरोधी लढ्याला पाठबळ देण्याच्या उद्देशाने, देशाच्या दुर्गम भागांमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सामानाची वाहतूक करण्यासाठी गोवा विमानतळावरून 8 जीवन वाहिनी उड्डाणे (LifeLine Udan flights) संचालित करण्यात आली होती. या उड्डाणाद्वारे गोवा विमानतळावर एकूण 2.15 मेट्रिक टन सामानाची आवक झाली तर 3.96 मेट्रिक टन मालाची जावक झाली. तसेच या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात गोवा विमानतळाने गोवा राज्यासाठीचे कोविड प्रतिबंधक लसीचे 3 संच तसेच शेजारील कर्नाटक राज्यासाठीचा लसीचा 1 संच यांची वाहतूक संचालित केली.

कोविड विरोधी लढा अजून थांबलेला नाही आणि कोविड संसर्गाने निर्माण केलेली ही अभूतपर्व आपत्तीची परिस्थिती हाताळण्यासाठी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाने कोविड विरोधी अभियान अधिक प्रखरतेने राबवीत कोविड प्रतिबंधक लस, फॅबीफ्ल्यू औषध, कोविड -19 चाचणी संच आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय सामानाचा अखंडित पुरवठा करण्याचे काम सुरळीतपणे सुरु ठेवले आहे. गोवा विमानतळ प्रशासनाने महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या काळात आवक मालाअंतर्गत गोवा राज्यासाठी पुरविण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीची वाहतूक अविरतपणे केली तसेच लसीच्या साठ्याचे विमानतळावरून शीघ्र निर्गमन करून शक्य तितक्या कमीत कमी वेळात हा साठा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविला जाईल हे सुनिश्चित करण्याकडे लक्ष दिले आहे. 

  1. 18 एप्रिल 2021 ला चेन्नईहून कोविड प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लसीचे 13 खोके आले.

  2. 30 एप्रिल 2021 ला मुंबईहून कोविड प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लसीचे 9 खोके आले. 

  3. 23 एप्रिल 2021 रोजी दिल्लीहून 122 किलो कोविड-19 चाचणी संच आले. 

ह्या आवक झालेल्या मालाखेरीज गोवा विमानतळ प्रशासनाने जावक मालवाहतुकीअंतर्गत देशाच्या अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, लखनौ, जयपूर, हैदराबाद, इंदोर, नागपूर, इत्यादी विविध भागांमध्ये ग्लेनमार्क कंपनीच्या फॅबीफ्ल्यू या औषधाचा सुरळीत पुरवठा करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या वर्षी एप्रिल महिन्यात एकूण 31,955 किलो फॅबीफ्ल्यू औषध जावक मालवाहतुकी अंतर्गत गोवा विमानतळावरून देशभरात पाठविण्यात आले. फॅबीफ्ल्यू हे औषध कोविड-19 विषाणूचा सौम्य ते मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाते. गोवा हे आकाराने देशातील सर्वात लहान राज्य असूनही कोविड-19 आजाराविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून खूप महत्त्वाची भूमिका निभावीत आहे आणि त्यासाठी अहोरात्र कार्यरत राहून गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ महत्त्वाच्या प्रवेशद्वाराचे कार्य पार पाडत आहे.

त्याशिवाय, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिरे आयोजित करण्यासाठी गोवा विमानतळ प्रशासन प्रयत्नशील आहे. गोवा सरकारचा सहभाग आणि पाठींब्याने विमान कंपन्या, संबंधित संस्था आणि पहिल्या फळीतील इतर कर्मचारी गोवा विमानतळावर कार्यरत आहेत.

***

Umesh U/ Sanjan C/DY

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1716739) Visitor Counter : 279