माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सत्यजित रे (2 मे 1921- 23 एप्रिल 1992) यांची जन्मशताब्दी भारतात व परदेशात वर्षभर साजरी  होणार


'चित्रपटक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानासाठी सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराची' मुहूर्तमेढ

Posted On: 30 APR 2021 10:14PM by PIB Mumbai

 

दिग्गज चित्रपटनिर्माते सत्यजित रे यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय देशभर आणि परदेशातही पूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.

सत्यजित रे हे ख्यातनाम चित्रपटनिर्माते असण्याबरोबरच सिद्धहस्त लेखक,कल्पक रेखाटनकार, सृजनशील ग्राफिक डिझायनर आणि निष्णात संगीतकार होते. त्यांनी जाहिरातक्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली. बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या कादंबरीची बालकांसाठी रेखाटने करताना त्यांना 'पथेर पांचाली' या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची कल्पना स्फुरली. या चित्रपटाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवून दिली. त्यानंतर मागे वळून न पाहता रे यांनी चारुलता, आगंतुक आणि नायक असे एकापेक्षा एक सरस चित्रपट तयार केले. या सृजनशील लेखकाने जन्माला घातलेले गुप्तहेर फेलूदा आणि शास्त्रज्ञ प्रोफेसर शोंकू बंगाली साहित्यात प्रसिद्ध झाले. भारत सरकारने 1992 मध्ये 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांचा गौरव केला.

त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे माध्यम विभाग- म्हणजेच- चित्रपट महोत्सव संचालनालय, फिल्म्स डिव्हिजन, एन.एफ.डी.सी., एन.एफ.ए.आय. आणि कोलकात्याची सत्यजित रे फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था- हे सर्व विभाग विविध उपक्रम आयोजित करत आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, संस्कृती मंत्रालय यासह इतर मंत्रालये / विभागही सक्रिय सहभागी होत आहेत. मात्र, सध्याच्या कोरोना साथीच्या स्थितीत हे सर्व कार्यक्रम डिजिटल आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांचा मेळ घालून वर्षभर साजरे केले जाणार आहेत.

या कलावंताने निर्माण केलेल्या ठेव्याचा विचार करून 'चित्रपटक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानासाठी सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराची' मुहूर्तमेढ यावर्षी रोवण्यात आली आहे. इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षीपासून दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 10 लाख रुपये रोख, प्रमाणपत्र, शाल, रजतमयूर पदक आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.

 

कार्यक्रम आणि उपक्रम-:

  1. चित्रपट महोत्सव संचालनालय, फिल्म्स डिव्हिजन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय मिळून भारतात आणि इंडियन मिशन्सच्या माध्यमातून विविध देशांत 'सत्यजित रे चित्रपट महोत्सवांचे' आयोजन करणार आहे. यामध्ये सत्यजित रे यांनी तयार केलेले तसेच त्यांच्यावरील चित्रपट आणि माहितीपट दाखविण्यात येतील. 74 व्या कान्स चित्रपट महोत्सवात सत्यजित रे यांच्या चित्रपटांवर दृष्टिक्षेप आणि त्यांचे विशेष प्रदर्शन करण्यात येणार आहे.
  2. चित्रपट महोत्सव संचालनालय 2021 च्या इफ्फीमध्ये विशेष सिंहावलोकनात्मक कार्यक्रम आयोजित करणार आहे. हा कार्यक्रम प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पाठविला जाईल.
  3. फिल्म्स डिव्हिजन मुंबईच्या 'भारतीय चित्रपटांविषयीच्या राष्ट्रीय संग्रहालयात' सत्यजित रे याना समर्पित अशा विशेष विभागाची स्थापना करणार आहे. हा विभाग वर्षभर देशातील विविध संग्रहालयातून प्रदर्शित केला जाईल. याद्वारे प्रत्यक्ष आणि डिजिटल माध्यमातून सत्यजित रे यांच्या जीवनातील तसेच त्यांच्या चित्रपटातील उत्कृष्ट प्रसंग आणि मुलाखती दाखविल्या जाणार आहेत.
  4. एन.एफ.ए.आय. म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, रे यांच्या सर्व उपलब्ध प्रसिद्धी साहित्याचे पुनरुज्जीवन आणि डिजिटायझेशन करणार आहे. त्यांच्या चित्रपटांच्या पोस्टर्सचे आभासी माध्यमातून प्रदर्शनही ही संस्था भरवणार आहे.
  5. एन.एफ.डी.सी. आपल्या ओटीटी मंचाच्या माध्यमातून चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार आहे. 'सिनेमाज ऑफ इंडिया' नावाच्या या महोत्सवामध्ये या दिग्गज निर्मात्याच्या पाच चित्रपटांचे प्रदर्शन होईल.
  6. कोलकात्याची सत्यजित रे फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था, त्यांच्या आवारात सत्यजित रे यांच्या शिल्पाचे अनावरण करणार आहे. या चित्रपटनिर्मात्याच्या प्रतिभेचा आवाका समजण्यासाठी त्यांच्या कार्यावर आधारित अभ्यासक्रम या संस्थेत शिकविला जाणार आहे. याखेरीज शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासक्रमाचाही विकास केला जात आहे. रे यांच्या चित्रपटांमधील संकल्पनांवर आधारित आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत.
  7. संस्कृती मंत्रालय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार असून, त्यामार्फत रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, कलेचे आणि साहित्याचे निरनिराळे पैलू उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

माहिती प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील अंमलबजावणी समिती या सर्व कार्यक्रमांवर देखरेख करणार आहे. यामध्ये ज्येष्ठ चित्रपटनिर्माते धृतिमान चॅटर्जी हे नामनिर्देशित सदस्य असतील. याखेरीज माहिती-प्रसारण, संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांचे अन्य वरिष्ठ अधिकारी यामध्ये समाविष्ट असतील..

***

M.Chopade/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1715224) Visitor Counter : 288