संरक्षण मंत्रालय

सध्याच्या कोविड 19 विरोधातील लढ्यात संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दले करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुसऱ्यांदा घेतली बैठक


नागरी प्रशासनाला शक्य ते सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे दिले निर्देश

Posted On: 24 APR 2021 6:36PM by PIB Mumbai

 

सध्याच्या कोविड 19 विरोधातील लढ्यात संरक्षण मंत्रालय आणि तीनही सेवा करत असलेल्या प्रयत्नानांचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एप्रिल 24, 2021 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत,नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह, लष्करप्रमुख जनरल एम . एम. नरवणे,संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार,( संरक्षण उत्पादन ) सचिव श्री. राज कुमार, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि संरक्षण आणि विकास संस्था  ( डी आर डी ओ ) चे अध्यक्ष डॉ. जी .सतीश रेड्डी, हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल संदीप सिंह आणि सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे (एएफएमएस) महासंचालक सर्जन व्हॉईस ऍडमिरल रजत दत्ता या बैठकीला उपस्थित होते.

सद्यस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने , सशस्त्र  दले आणि संरक्षण मंत्रालयाच्या अन्य आस्थापनांनी नागरी प्रशासनाला शक्य ते सर्व सहकार्य करावे असे निर्देश श्री. राजनाथ सिंह यांनी दिले. ते म्हणाले, संकटाच्यावेळी लोक सशस्त्र सैन्याकडे पाहतात कारण लोकांना  त्यांच्याबद्दल मोठी आशा आणि  विश्वास असतो.

परदेशातून तसेच देशातूनही ऑक्सीजन टँकर्स आणि संयंत्रांची वाहतूक करण्यासाठी भारतीय हवाई दल (आय ए एफ) ने केलेल्या मदतीचा  संरक्षणमंत्र्यांनी आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले. भारतीय हवाई दलाचे सी -17 विमान एप्रिल  24, 2021 रोजी सकाळी सिंगापोरला रवाना झाले आणि  संध्याकाळी क्रायोजेनिक ऑक्सिजन टाक्यांसह चार कंटेनर घेऊन परत येईल, यासंदर्भात त्यांना माहिती देण्यात आली. आणखी एका सी -17 विमानाने दोन रिकामी कंटेनर ट्रक पुण्यातून जामनगर येथे तर दुसरे दोन  रिकामे  ऑक्सिजन कंटेनर जोधपूरहून जामनगर येथे आणल्याची माहितीही त्यांना देण्यात आली. एका चिनूक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कोविड चाचणीसाठीची उपकरणे जम्मूहून लेह येथे नेण्यात आली. ऑक्सीजन टँकर्सच्या वाहतुकीसाठी काही मदत लागल्यास भारतीय नौदलाची जहाजे सज्ज आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांना देण्यात आली.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या  अध्यक्षांनी माहिती दिली की, नवी दिल्लीतील सरदार वल्लभभाई पटेल कोविड रुग्णालयात 24 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळपर्यंत आणखी 250 खाटा कार्यान्वित झाल्यानंतर एकूण खाटांची संख्या 500 वर जाईल. गुजरातमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 1,000 खाटांचे रुग्णालय उभे करण्याचे काम पूर्ण केले आहे. लखनौमध्ये कोविड सुविधा उभारण्याचे काम जोरात सुरु असून आगामी 5-6  दिवसात ही सुविधा  कार्यान्वित होईल स्थानिक राज्य सरकारांच्या सहकार्याने आणि समन्वयाने सशस्त्र दल वैद्यकीय सेवेद्वारे ही रुग्णालये चालवली जातील, अशी माहिती त्यांनी संरक्षण मंत्र्यांना दिली.

या संदर्भात आवश्यक समन्वयासाठी संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत सतत संपर्कात असतात.सशस्त्र दल वैद्यकीय सेवेने आपल्या संसाधनांची मर्यादा वाढवल्यामुळे, वाराणसीतील 750 खाटांच्या रुग्णालयात स्थानिक डॉक्टर्स आणि आरोग्य व्यावसायिकांच्या सेवेचा समावेश करणे शक्य होणार आहे. आरोग्य व्यावसायिकांचे कार्यबल वाढविण्यासाठी, सशस्त्र दल वैद्यकीय सेवेतून  नुकत्याच  सेवानिवृत्त झालेल्यांना तैनात करण्याच्या सूचनेला संरक्षण मंत्र्यांनी  मान्यता दिली.

संरक्षण मंत्रालयाचे सार्वजनिक उपक्रम आणि आयुध कारखाना मंडळाला, कोविड -19 प्रादुर्भाव असलेल्या स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहितीही श्री. राजनाथ सिंह यांना देण्यात आली.विविध उपाययोजनांच्या  प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी संरक्षण दलाचे अधिकारी आणि तिन्ही सेवांना दिले. 

सध्याच्या कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाचा सामना  करण्याच्या दृष्टीने ,संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दलाच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ही दुसरी बैठक होती. एप्रिल  20, 2021.रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे पहिली बैठक झाली.

***

Jaydevi PS/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1713812) Visitor Counter : 223