वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

देशातला कंटेनरचा तुटवडा झाला कमी


तत्पर आणि समन्वित दृष्टीकोनाची झाली मदत

कंटेनर उपलब्धता सुधारण्याच्या दृष्टीने कंटेनरचे देशात उत्पादन करण्याचे भारताचे उद्दिष्ट

Posted On: 20 APR 2021 5:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 एप्रिल 2021


देशातला कंटेनरचा तुटवडा आता कमी झाला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या लॉजीस्टिक विभागाचे विशेष सचिव पवन अग्रवाल यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. मार्च मध्ये 58% अतिरिक्त निर्यात हाताळण्यात आली. ही निर्यात मार्च 2019 (कोविड पूर्व) पेक्षा 17-18 % जास्त असल्याची माहिती कंटेनर शिपिंग लाईन्स असोसिएशन,सीएसएलएने (भारत) दिल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय निर्यात संस्था फेडरेशन,एफआयईओ आणि सीएसएलए यांच्या समवेत 15 एप्रिल 2021 ला घेतलेल्या आढाव्यात, समन्वित प्रयत्नामुळे, चहा, कॉफी, मसाले यांच्या निर्यातीसाठी दक्षिणेकडच्या बंदरामधला काहीसा तुटवडा वगळता, कंटेनरच्या टंचाईचा मुद्दा जवळ-जवळ सोडवण्यात आल्याचे एफआयईओने सांगितले.

शिपिंग कंपन्या आणि निर्यातदार यांच्यात घनिष्ठ समन्वय राखण्यात आला त्यामुळे परिस्थिती आणि आवश्यकता यांचे  उत्तम आकलन करून दोन्ही बाजूनी उत्तम नियोजन केले.

मार्च 2021 मध्ये जागतिक कंटेनर निर्देशांक आधीच्या वर्षीपेक्षा 233% जास्त होता. भारतीय बंदरांना भेट देणाऱ्या जहाजात जागा उपलब्ध नसणे आणि विशिष्ट स्थाने विशेषतः पूर्व आफ्रिके मध्ये  माल उशिराने उपलब्ध होणे याचा व्यापारावर परिणाम झाला. कोविड मुळे जगभरातल्या प्रमुख बंदरांवर झालेली गर्दी, भारतात आयात आणि निर्यात यातला मोठा असमतोल या घटकांचाही परिणाम झाला. गेल्या काही महिन्यात निर्यातदारांना जाणवणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी उचलण्यात आलेली पावले अशी आहेत-

  1. शिपिंग कंपन्यांशी समन्वय साधत भारतातले रिक्त कंटेनर तातडीने  उपलब्ध करण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले.परिणामी  100,000 रिक्त कंटेनर उपलब्ध झाले. 
  2. 2020 च्या सुरवातीला चीन हून येणाऱ्या जहाजांसाठी विलगीकरण काळ 14 दिवसांचा होता नौवहन, बंदरे आणि जलमार्ग आणि आरोग्य मंत्रालयाशी तपशीलवार चर्चेनंतर हा काळ 5-7 दिवसापर्यत कमी करण्यात आला. त्याचाही रिकामे कंटेनर उपलब्ध होण्यासाठी फायदा झाला.
  3. दावे कण्यात आले नाहीत असा माल मोकळा करण्यासाठी सीमाशुल्क विभागाशी समन्वय साधत विशेष अभियान सुरु करण्यात आले
  4. लॉजीस्टिक  विभागाने रिकाम्या कंटेनरची मागणी लक्षात घेऊन शिपिंग कंपन्यांना पोहोचवली. त्याचा नियोजनासाठी फायदा झाला. 
  5. शिपिंग कंपन्या आणि निर्यातदार यांच्यातला समन्वय अधिक घनिष्ठ करण्यात आला. मोठ्या जहाजांना प्राधान्य देण्यासाठी बंदरांना सुचवण्यात आले. ज्यामुळे जेव्हा टंचाई जाणवेल तेव्हा त्यांचा उपयोग करता येईल.
  6. मार्च ते मे 2020 या काळात भारतीय रेल्वेने रिकामे कंटेनरची मोफत ने-आण  केली. एप्रिल 2021 पासून बंदरे ते अंतर्गत भूप्रदेश यासासाठी  रिकामे कंटेनरच्या वाहतूक दरात 50 % कपात करण्यात आली. सुवेज कालव्यात मार्च 2021 मध्ये वाहतुकीसाठी निर्माण झालेला अडथळा यामुळेही जागतिक व्यापारावर गंभीर परिणाम झाला. परिस्थिती वर तत्पर तोडगा काढण्यासाठी आणि परिणाम कमी करण्यासाठी सरकारने 26 मार्च 2021 ला चार सूत्री आराखडा आणला. कंटेनर उपलब्धता सुधारण्याच्या दृष्टीने कंटेनरचे देशात  उत्पादन करण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. कॉन्कोरने भेल आणि ब्रेथवेट कंपनीला 2000 कंटेनरची तयार करण्याची  ऑर्डर आधीच दिली आहे.


* * *

Jaydevi PS/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712922) Visitor Counter : 191