पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी कोविड-19 साठी असलेल्या सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाच्या सज्जतेचा घेतला आढावा


टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंटला पर्याय नाहीः पंतप्रधान

कोविड रूग्णांसाठी रुग्णालयात खाटांची उपलब्धता वाढवण्यासाठी सर्व आवश्यक उपाय केले पाहिजेत: पंतप्रधान

स्थानिक प्रशासनाने लोकांच्या समस्यांप्रती संवेदनशील असणे आवश्यक : पंतप्रधान

पंतप्रधानांनी रेमडेसिवीर आणि इतर औषधांच्या पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला

लस उत्पादनाला गती देण्यासाठी संपूर्ण राष्ट्रीय क्षमतेचा उपयोग करा: पंतप्रधान

मंजूर वैद्यकीय ऑक्सिजन कारखाने लवकरात लवकर उभारावे : पंतप्रधान

Posted On: 17 APR 2021 10:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2021

 

देशभरात उद्भवलेल्या कोविड-19 साथीच्या आजाराची परिस्थिती हाताळण्यासाठीच्या सज्जतेचा सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक आयोजित केली. या बैठकीत औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि लसीकरणाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

मागील वर्षी भारताने एकत्रितपणे कोविडचा मुकाबला केला होता आणि आता संपूर्ण देश पुन्हा त्याच तत्त्वांनी परंतु अधिक वेगाने कोविडला हरवू शकतो असे पंतप्रधान म्हणाले.

टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंटला पर्याय नाही, यावर पंतप्रधानांनी भर दिला. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रारंभिक चाचणी आणि योग्य ट्रॅकिंग महत्त्वपूर्ण आहे. स्थानिक प्रशासनाने लोकांच्या समस्यांप्रती संवेदनशील असणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

साथीच्या रोगाची परिस्थिती योग्यरीतीने हाताळण्यासाठी राज्यांशी योग्य समन्वय साधला जाणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की कोविड रूग्णांसाठी रुग्णालयात खाटांची उपलब्धता वाढवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. तात्पुरती रुग्णालये आणि वेगळ्या केंद्रांमार्फत खाटांचा अतिरिक्त पुरवठा सुनिश्चित करावा असे निर्देश पंतप्रधानांनी दिले.

विविध औषधांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारताच्या औषधनिर्मिती  उद्योगाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी रेमडेसिवीर आणि इतर औषधांच्या पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला. रेमडेसिवीरच्या   उपलब्धतेच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी केलेल्या कारवाईची माहिती पंतप्रधानांनी दिली. सरकारच्या प्रयत्नांमुळे, रेमडेसिवीरच्या निर्मिती क्षमता आणि उत्पादन वाढीस वेग आला आहे, मे महिन्यात सुमारे 74.10 लाख कुपी/महिना उपलब्ध करण्याची तयारी झाली आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हे उत्पादन 27-29 लाख कुपी/महिना इतके होते. याचा पुरवठा देखील 11 एप्रिल रोजी 67,900 कुपी वरून वाढवून 15 एप्रिल 2021 रोजी 2,06,000 पेक्षा अधिक कुपी एवढे करण्यात आले असून ज्या राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे आणि जास्त मागणी असलेल्या राज्यांकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यांनी वाढीव उत्पादन क्षमतेची माहिती घेतली आणि राज्यांशी समन्वय साधत राज्यांसोबत असलेले वास्तविक-वेळ पुरवठा साखळी व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले.

रेमडेसिवीर आणि इतर औषधांचा वापर हा मान्यताप्राप्त वैद्यकीय मार्गदर्शक तत्वांनुसारच असला पाहिजे आणि त्यांच्या गैरवापराला आणि काळाबाजाराला काटेकोरपणे आळा घालावा असे निर्देश त्यांनी दिले. 

वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याविषयीच्या मुद्यावर, पंतप्रधानांनी सूचना केली की, मंजूर वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती कारखाने लवकरात लवकर सुरु करावे. पीएम केअर्समधून 162 पीएसए ऑक्सिजन निर्मिती कारखाने 32 राज्य/कें.प्रदेशात सुरु करण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, 1 लाख सिलेंडरची निर्मिती होत आहे आणि राज्यांना लवकरच याचा पुरवठा करण्यात येईल. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली की, उच्च रुग्णसंख्या असलेल्या 12 राज्यांची सध्याची आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन नियमितपणे पुरवठा सुरु आहे. 12 राज्यांसाठीचा 30 एप्रिलपर्यंतचा पुरवठा मॅपिंग आराखडा हाती घेण्यात आला आहे. पंतप्रधान म्हणाले की, संक्रमण परिस्थिती हाताळण्यासाठी लागणारी औषधनिर्मिती आणि इतर उपकरणांसाठीसुद्धा ऑक्सिजनपुरवठा सुनिश्चित करावा.

पंतप्रधानांनी व्हेंटीलेंटर्सची उपलब्धता आणि पुरवठ्याचाही आढावा घेतला. पंतप्रधानांनी सूचना केली की, रिअल टाईम मॉनिटरींग प्रणालीविषयी संबंधित राज्य सरकारांना माहिती द्यावी आणि सक्रीयतेने या प्रणालीचा वापर करण्यास सांगावे. 

लसीकरणाच्या मुद्यावर पंतप्रधानांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना केली की, लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील पूर्ण राष्ट्रीय क्षमतेचा वापर करावा. 

आजच्या बैठकीला कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, केंद्रीय गृह सचिव, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव, औषधनिर्माण विभागाचे सचिव, नीती आयोगाचे डॉ व्ही.के.पॉल यांची उपस्थिती होती.

 

* * *

S.Thakur/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1712486) Visitor Counter : 143