पंतप्रधान कार्यालय

ऑक्सिजनचा देशभरात पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधानांनी घेतला वैद्यकीय ऑक्सिजनच्या सद्यस्थितीचा आढावा

Posted On: 16 APR 2021 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. आरोग्य, उद्योग प्रोत्साहन आणि आणि अंतर्गत व्यापार विभाग, पोलाद, रस्ते वाहतूक अशा सर्व विभागांकडून देशातल्या ऑक्सिजनच्या स्थितीविषयी त्यांनी माहिती घेतली. या स्थितीत, सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय असणे अत्यंत महत्वाचे आहे, यावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिला.

तसेच सध्या देशभरात होत असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याविषयी आणि येत्या 15 दिवसांत कोविड रुग्णसंख्या अधिक असलेल्या 12 राज्यांत किती ऑक्सिजन लागू शकेल, या विषयीही पंतप्रधानांनी विस्तृत आढावा घेतला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तिसगढ, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यात सध्या कोविडची रुग्ण संख्या अधिक आहे. या सर्व राज्यांमधील जिल्हानिहाय स्थितीचे सादरीकरण यावेळी पंतप्रधानांसमोर करण्यात आले.

केंद्र आणि राज्य सरकारे एकमेकांच्या सतत संपर्कात असून, 20 एप्रिल, 25 तसेच 30 एप्रिल रोजी देशात ऑक्सिजनची अंदाजे किती मागणी असू शकेल, याची माहिती सर्व राज्यांना देण्यात आली आहे, असे पंतप्रधानांना यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार, या तीन तारखांना अनुक्रमे, 4,880 मेट्रिक टन, 5,619 मेट्रिक टन आणि 6,593 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडू शकेल.

देशात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता, ती पूर्ण करण्यासाठी, ऑक्सिजन निर्मितीची क्षमतेविषयी देखील पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. प्रत्येक प्रकल्पाच्या सध्याच्या ऑक्सिजन निर्मिती क्षमतेत वाढ करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली. तसेच, पोलाद निर्मिती प्रकल्पांमध्ये असलेला अतिरिक्त ऑक्सिजन साठा देखील वैद्यकीय उपयोगासाठी वापरला जावा, यावरही या बैठकीत चर्चा झाली.

तसेच ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनांची वाहतूक विना-अडथळा व्हावी, हे सुनिश्चित करा, असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले. सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक जलद आणि विनासायास व्हावी, यासाठी केंद्र सरकराने या गाड्यांना परवाना नोंदणीतून सवलत दिली आहे. वाढीव मागणीनुसार, आवश्यक तेवढा ऑक्सिजन वेळेत गरजूंपर्यंत पोचावा यासाठी या  सर्व टँकर्सची वाहतूक 24 तास सुरु राहील अशी व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि वाहतूकदारांना दिले आहेत, अशी माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली.

ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची केंद्रे देखील 24 तास सुरु राहणार असून आवश्यक त्या सुरक्षा उपायांसह ती कार्यरत असतील. काही आवश्यक शुद्धीकरण प्रक्रियेनंतर, औद्योगिक वापरासाठीचा ऑक्सिजन वैद्यकीय कामांसाठी वापरण्याची परवानगी देखील केंद्र सरकारने दिली आहे. त्याचप्रमाणे, नायट्रोजन आणि अर्गोन टँकर्स देखील गरजेनुसार ऑक्सिजन टँकर्समध्ये परिवर्तीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनची आयात करण्याचे प्रयत्न देखील सुरु असल्याचे सबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी पंतप्रधानांना सांगितले.

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712246) Visitor Counter : 278