जलशक्ती मंत्रालय
जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय फोरम वेबिनारला केले संबोधित, आज जग ज्या जलसंकटाला सामोरे जात आहे त्याची तीव्रता केली अधोरेखित
ब्रिक्स राष्ट्रांनी परस्परांच्या अनुभवातून शिकणे आवश्यक, जलसंकटाला तोंड देण्यासाठी पाणी व्यवस्थापनाच्या नाविन्यपूर्ण व सर्वोत्तम पद्धती सामायिक कराव्यात : कटारिया
जलजीवन मिशन हे सर्वसमावेशक भूमिकेतून सामाजिक क्रांती घडवून आणेल
Posted On:
10 APR 2021 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2021
ब्रिक्स आंतरराष्ट्रीय फोरम आयोजित वेबिनारमध्ये बोलताना जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी सुरक्षित पेयजलासारख्या सामायिक प्रश्न सोडवण्याच्या कामी ब्रिक्स राष्ट्रे बजावत असलेली भूमिका अधोरेखित केली. जगावरील सध्याचे जलसंकट किती गहिरे आहे हे सांगताना कटारिया यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊन या महत्वाच्या शहरातील भूजल साठे 2017-18 या वर्षात पूर्णपणे संपल्याचा उल्लेख केला.
सध्याच्या महामारीने भूक, गरीबी व पाणीसंकट यासारख्या संकटांचे स्वरूप तीव्र केले आहे. जगभरात 2.2 अब्ज जनता सुरक्षित पेयजलासाठी झगडत असताना आपण जलसंकटाला तोंड देण्याच्या एकमेकांच्या बहुमोल अनुभवांकडून काही शिकणे आवश्यक आहे. जनतेला सुरक्षित पेयजल पुरवणे हे प्रत्येक शासनाचे अनिवार्य कर्तव्य आहे संयुक्त राष्ट्रांच्या जिनेव्हा करारातील (UNGA) 64/292 कलमानुसार तो मुलभूत मानवाधिकारसुद्धा आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वर्ष 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या महत्वाकांशी योजनेला आरंभ केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ऑगस्ट 2019मध्ये भारताने जलजीवन मिशन (पाणी हेच जीवन) या 3.60 लाख कोटी रुपयांच्या म्हणजेच 48 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या खर्चाच्या योजनेचा आरंभ केला आहे, असे त्यांनी नमूद केले.
दीड वर्षाच्या छोट्या कालखंडात भारताने ग्रामीण भागात 40 दशलक्ष नळजोडण्या दिल्याची माहिती त्यांनी दिली
जलजीवन मिशनचे फलित फक्त नळाद्वारे पाणी पुरवण्यापुरते मर्यादित नाही तर सर्वसमावेशक स्वरुपामुळे प्रत्येक घरासाठी ती एक सामाजिक क्रांती आहे. आपल्या कुटुंबासाठी पाणी मिळवण्यासाठी दूर पायपीट करणाऱ्या स्रियांचे कष्ट त्यामुळे कमी होणार आहेत, असेही जलशक्ती राज्यमंत्र्यांनी सांगितले.
जलजीवन मिशन ही यशोगाथा असल्याचे नमूद करत कटारिया यांनी या संदर्भातील अनुभव विकसनशील राष्ट्रांसोबत सामायिक करण्यास भारत तयार असल्याचे सांगितले. ब्रिक्स राष्ट्रांनी सरकारी तसेच नागरी संस्थांमधील पाणी व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण व सर्वोत्तम कल्पना सामायिक कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले.
ब्रिक्स संघटनेचा पंधरावा वर्धापनदिन सध्या साजरा होत असल्याची माहिती देत ब्रिक्स शिखर परिषदेच्या 13 व्या परिषदेत भारत यजमान राष्ट्र असल्याची आणि ते ब्रिक्स राष्ट्रांमधील सामायिक उद्दिष्टांना कटीबद्ध असल्याची त्यांनी हमी दिली.
Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710876)
Visitor Counter : 236