वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतीय मसाल्यांसाठी ब्लॉकचेन आधारित ट्रेसेबिलिटी इंटरफेस विकसित करण्यासाठी भारतीय मसाले मंडळ आणि युएनडीपी इंडियाज एक्सेलेटर लॅब यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 05 APR 2021 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2021 

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत  भारतीय मसाले मंडळ आणि संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम,युएनडीपी इंडियाज एक्सेलेटर लॅब यांच्यातल्या सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या. व्यापार आणि पुरवठा साखळीमध्ये पारदर्शकता वृद्धिंगत करण्यासाठी ब्लॉकचेन आधारित ट्रेसेबिलिटी इंटरफेस विकसित करण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

ब्लॉकचेन ही खुली आणि इलेक्ट्रॉनिक खतावणीवर व्यवहार नोंद करण्याची विकेंद्रित प्रक्रिया आहे. याद्वारे शेतकरी, ब्रोकर,वितरक,किरकोळ व्यापारी, नियामक आणि ग्राहक यांच्यासह एका जटील नेटवर्क मध्ये डाटा व्यवस्थापनात सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मदत करून पुरवठा साखळी सुलभ करते.

ही प्रणाली पुरवठा साखळीतल्या इतर सदस्यांप्रमाणेच शेतकऱ्यालाही माहिती प्राप्त करण्याची परवानगी देते ज्यामुळे ही साखळी अधिक न्याय्य आणि प्रभावी होते.

मसाल्याच्या पदार्थांच्या वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजारपेठेशी सांगड घालण्यासाठी भारतीय मसाले मंडळाने विकसित केलेल्या ई स्पाईसबाजार या पोर्टलशी ब्लॉकचेन आधारित ट्रेसेबिलिटी इंटरफेस जोडण्यासाठी युएनडीपी आणि भारतीय मसाले मंडळ काम करत आहे. ब्लॉकचेन इंटरफेसचे  डिझाईन 21 मे पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आंध्र प्रदेशातल्या निवडक जिल्ह्यात मिरची आणि हळद लागवड करणाऱ्या 3000  शेतकऱ्यांसमवेत हा प्रकल्प राबवण्यात येईल.

भारत हा मसाल्याचा जगातला सर्वात मोठा  निर्यातदार, उत्पादक आणि ग्राहकही आहे असे भारतीय मसाले मंडळाचे सचिव  डी साथियन यांनी सांगितले. 2019-20  मध्ये भारताने  3 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त  किमतीच्या मसाल्याची निर्यात करून महत्वाचा टप्पा गाठला. 2020-21 मध्ये हा टप्पाही पार करून भारत नवे शिखर गाठेल असे अनुमान आहे.

जागतिक मसाला आणि अन्न क्षेत्रात बदलत्या परिस्थितीत मूल्य वर्धनासाठी पायाभूत ढाचा विकास, ट्रेसेबिलीटी प्रणालीची अंमलबजावणी, रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचे मसाल्याचे गुणधर्म अधोरेखित करणे,गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा यासाठी प्रमाणीकरण यांचे महत्व वाढले आहे. स्वच्छ आणि सुरक्षित मसाल्यासाठी भारत हे उत्तम स्थान राहावे या दृष्टीने मंडळ पुरवठा साखळी बळकट करण्यासह संबंधीताना मदत करण्यासाठी अथक प्रयत्न करत असल्याचे साथियन यांनी सांगितले.

ब्लॉकचेन इंटरफेस मुळे मसाला वनस्पती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यासाठी मदत होणार असून  यातून त्यांच्या उत्पन्नात भर पडेल असा विश्वास युएनडीपीचे भारतातले निवासी प्रतिनिधी शोको नोडा यांनी व्यक्त केला.वस्तू आणि व्यवहार  या संदर्भात, व्यापार भागीदार आणि ग्राहक यांना विश्वासार्ह आणि सुरक्षित डाटा पुरवून महामारीमुळे परिणाम झालेली पुरवठा साखळी  पुन्हा उभारण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल.

मसाल्याची पुरवठा साखळी प्रभावी आणि पारदर्शी करण्यासाठीच्या प्रवासात युएनडीपी आणि मसाले मंडळ यांचा हा संयुक्त उपक्रम, सर्व संबंधीतांसाठी महत्वाचा ठरणार आहे.

मसाले मंडळाविषयी-

वाणिज्य आणि उद्योग  मंत्रालया अंतर्गत कार्यरत असणाऱ्या पाच व्यापार वस्तू मंडळापैकी मसाला मंडळ एक आहे. 52 अधिसुचीत मसाल्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन  आणि वेलची ( लहान आणि मोठी) विकास यासाठी हे स्वायत्त मंडळ आहे.

युएनडीपी विषयी-

युएनडीपी 170 देशात कार्यरत असून  वसुंधरा संरक्षणाबरोबरच दारिद्र्य निर्मुलनासाठी त्यांचे कार्य चालते. देशांनी आपली प्रगती जारी ठेवावी यासाठी धोरणे, कौशल्ये,भागीदारी आणि संस्था विकसित करण्यासाठी युएनडीपी, देशांना मदत करते.

अधिक माहितीसाठी संपर्क करा-

भारतीय मासले मंडळ,

सुरेश कुमार पी एम, संचालक, 

संपर्कासाठी तपशील : sureshkumar.pm[at]nic[dot]in

नितीन जो, उपसंचालक,

संपर्कासाठी तपशील: nithin.joe[at]nic[dot]in


* * *

Jaydevi PS/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1709741) Visitor Counter : 208