आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ हर्ष वर्धन यांनी एकात्मिक आरोग्य माहिती मंचाचा (आयएचआयपी) शुभारंभ केला


“अशा प्रकारची प्रगत डिजिटल देखरेख यंत्रणा स्वीकारणारा भारत जगातील पहिला देश”

Posted On: 05 APR 2021 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2021 


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज  नवी दिल्लीत एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्मचा (आयएचआयपी) व्हर्चुअल शुभारंभ केला. आरोग्य आणि  कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री  तीरथसिंग रावत हे देखील  डिजिटल पद्धतीने उपस्थित होते.  एकात्मिक आरोग्य माहिती मंच हा  सध्या वापरल्या  जात असलेल्या एकात्मिक आजार देखरेख  कार्यक्रमाची (आयडीएसपी) सुधारित आणि अद्ययावत  आवृत्ती आहे.

या व्हर्चुअल  कार्यक्रमाला विविध राज्यांचे  आरोग्य मंत्री उपस्थित होते.

डॉ. हर्ष वर्धन यांनी आरोग्य आणि तंत्रज्ञानाच्या या  मिलाफाबाबत  बोलताना सांगितले की, आजचा  दिवस सुवर्ण अक्षरात  लिहून ठेवला जाईल आणि तो  रोगावर देखरेख  ठेवण्यात  मैलाचा दगड ठरेल. भारताच्या सार्वजनिक आरोग्यासाठी आपण  एक नवीन अध्याय सुरू केला आहे. रोगावर देखरेख ठेवणारी अशी प्रगत  यंत्रणा स्वीकारणारा भारत जगातील पहिला देश आहे. ” सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीच्या 18 आजारांच्या तुलनेत आता 33 आजारांचा शोध  घेण्याबरोबरच , कागदावर  लिहिण्याऐवजी  डिजिटल स्वरुपात मध्ये वास्तविक (रियल टाइम) डेटा साठवला जाईल. ”

   

हे जगातील सर्वात मोठे ऑनलाईन रोग देखरेख व्यासपीठ असल्याचे सांगत ते म्हणाले की हे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाशी सुसंगत आहे आणि सध्या भारतात वापरल्या जाणार्‍या इतर डिजिटल माहिती प्रणालीशी अनुरूप आहे.

डॉ हर्ष वर्धन म्हणाले  की आयएचआयपी वास्तविक वेळेत , केस-आधारित माहिती, एकात्मिक विश्लेषणे, प्रगत काल्पनिक क्षमता असलेली आरोग्यविषयक माहिती प्रणाली प्रदान करेल. हे मोबाइल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर विश्लेषणात्मक  अहवाल देईल.  याबरोबरच साथजन्य आजाराची सुरुवात आणि संसर्गाचा वेग शोधणे यासाठी तसेच त्यावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देखरेख ठेवण्यासाठी याचा उपयोग  होईल.

ते पुढे म्हणाले की हे व्यासपीठ  ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाची यशोगाथा  आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्म-निर्भर स्वस्थ भारताच्या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले एक  पाऊल आहे.

या दूरदर्शी डिजिटल व्यासपीठाच्या विकासाशी संबंधित प्रत्येकाचे अभिनंदन करताना, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे म्हणाले की, आरोग्य सेवेच्या बाबतीत भारताने गुणवत्तेचे मानक स्थापित केले आहेत: “गाव किंवा तालुका स्तरावरून ही सेवा  थेट उपलब्ध होत असल्यामुळे आयएचआयपीच्या सहाय्याने विश्वासार्ह आकडेवारी संकलित करणे सोपे होईल.  त्याच्या अंमलबजावणीमुळे आपण तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे आरोग्य सेवेत आत्मनिर्भर भारताच्या  दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत. ”

देखरेखीची भौगोलिक व्याप्ती, रोगांचे प्रमाण आणि त्यातून मिळालेला डेटा यामुळे आयएचआयपी जागतिक स्तरावर  सर्वात मोठ्या डिजिटल आरोग्य व्यासपीठांपैकी एक बनला आहे असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले .

 केवळ भारतासाठी नाही तर जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी हा ‘ऐतिहासिक दिवस’ असल्याचे सांगत  डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. रॉडेरिको ओफ्रिन म्हणाले की हे प्रगत डिजिटल देखरेख व्यासपीठ डेटा पुरवण्यास व जोडण्यास तसेच ‘एक आरोग्य’ या दृष्टिकोनातून पुढे जाण्यास मदत करेल. या व्यासपीठाच्या विकासासाठी त्यांनी भारताचे कौतुक केले.


* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1709695) Visitor Counter : 338