उपराष्ट्रपती कार्यालय
युवकांनी उद्योजकता आणि अभिनव संशोधन यांची वृत्ती आत्मसात करावी असे उपराष्ट्रपतींचे आवाहन
भुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठाच्या 50 व्या पदवीदान समारंभाला उपराष्ट्रपतींनी संबोधित केले
Posted On:
03 APR 2021 8:04PM by PIB Mumbai
देशाच्या युवावर्गाने भारताच्या वैभवशाली भूतकाळापासून प्रेरणा घ्यावी आणि उद्योजकता तसेच अभिनव संशोधनाची वृत्ती आत्मसात करावी असे आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आज केले. विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील कौशल्ये शिकवावी जेणेकरून हे विद्यार्थी रोजगार निर्मिती करण्यास सक्षम म्हणून उभारी घेतील असे ते म्हणाले.
ओदिशामधील भुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठाच्या 50 व्या पदवीदान समारंभाला संबोधित करताना उपराष्ट्रपती आज बोलत होते. भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाच्या वैभवशाली परंपरेची उपराष्ट्रपतींनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकवृंदाला आठवण करून दिली. तक्षशीला, नालंदा, वल्लभी आणि विक्रमशीला यासारख्या प्राचीन भारतीय संस्थांची उदाहरणे देत त्यांनी देशात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवू शकणारी अष्टपैलू आणि अभिनव व्यक्तिमत्वे घडविण्यासाठी प्राचीन भारताची ही महान परंपरा पुन्हा परत आणण्याच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला.
ओदिशा राज्यात 62 विविध प्रकारचे आदिवासी समुदाय स्थायिक असून राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 23% लोकसंख्या या समुदायांची आहे याचा उल्लेख करून, या समुदायांचे कल्याण आणि विकास यांना प्राधान्य मिळायला हवे असे ते म्हणाले.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ओदिशा मधील आदिवासी जमातींच्या गटांऐवजी रांगेत चालणे आणि प्रतिकारशक्ती वाढविणारे नैसर्गिक अन्न सेवन करणे यासारख्या विशिष्ट पारंपरिक पद्धती आणि परंपरांमुळे तेथील लोकांमध्ये कोविड-19 संसर्गाचा फारसा प्रसार झाला नाही.
आदिवासी समुदायांमधील अशा प्रकारच्या सकारात्मक दृष्टीकोनांना जास्त महत्त्व देऊन शालेय अभ्यासक्रमात त्यांचा समावेश केला जावा अशी सूचना त्यांनी केली.
ओदिशाच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाबद्दल बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की कलिंगाच्या या महान भूमीने सम्राट अशोकाला शांतीचा धडा शिकविला, या भूमीवर राज्य करणारे राजे आग्नेय आशियातील देशांशी सांस्कृतिक संबंध वाढविण्यास कारणीभूत ठरले असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.कलिंगाच्या काळातील वैभवशाली सागरी परंपरांचा उल्लेख करत राष्ट्रपतींनी श्रीलंका, जावा, सुमात्रा, बाली आणि बर्मा या देशांशी व्यापारविषयक संबंध वाढविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कलिंगाच्या धाडसी सागरी व्यापाऱ्यांचे कौतुक केले. कलिंगाच्या नावाड्यांचे आणि व्यापाऱ्यांचे कौशल्य आणि उद्योजकता यांचे कौतुक करत, उपराष्ट्रपतींनी युवा पिढीला त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन सुखी आणि समृध्द भारताची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
9व्या आणि 10 व्या शतकात स्त्री राज्यकर्त्यांची दीर्घ परंपरा असलेल्या ओदिशाच्या भौमकारा राजघराण्याचा देखील नायडू यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला. महिला सशक्तीकरणाचे हे तेजस्वी उदाहरण असून युवा पिढीने अशा गोष्टी वाचल्या पाहिजेत अशी आग्रहाची विनंती त्यांनी केली.
आजचे विद्यार्थी ही नेत्यांची, वकिलांची, शिक्षण तज्ञांची आणि प्रशासकांची पुढची पिढी असून त्यांचे भविष्य या देशाच्या भविष्याशी जोडलेले आहे असे उपराष्ट्रपती म्हणाले. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी हिण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि मेहनती असले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.
उत्कल विद्यापीठ हे ओदिशाचे शैक्षणिक मार्गदर्शक आहे असे सांगून, विद्यापीठाने उच्च शैक्षणिक दर्जा राखल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी कौतुक केले.
या कार्यक्रमामध्ये उपराष्ट्रपतींच्या हस्ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास, भारताचे नियंत्रक आणि महालेखाकार गिरीश चंद्र मुर्मू, ओदिशाच्या उच्च न्यायालयाच्या कुमारी न्यायमूर्ती संजू पांडा, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक डॉ. अजित कुमार मोहंती, आणि ओदिशा सरकारचे सल्लागार डॉ.विजय कुमार साहू या पाच प्रतिष्ठित व्यक्तींना उत्कल विद्यापीठाच्या मानद पदव्यांनी (Honoris Causa) सन्मानित करण्यात आले..
*****
S.Thakur/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709375)
Visitor Counter : 240