रेल्वे मंत्रालय

कोविड संसर्ग वर्षात समर्पण वृत्तीने आणि भव्य प्रमाणात केलेल्या प्रयत्नांबद्दल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रेल परिवाराचे आभार मानले

Posted On: 03 APR 2021 11:08AM by PIB Mumbai

कोविड आपत्तीच्या वर्षात रेल्वे परिवाराने ज्या समर्पण भावनेने अत्यंत मोठे कार्य केले त्याबद्दल केंद्रीय रेल्वे, वाणिज्य, उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे परिवाराचे आभार मानले आहेत.

रेल परिवाराला पाठवलेल्या पत्रात गोयल म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणखी एका आर्थिक वर्षाला निरोप देताना, रेल्वे विभागाचे कार्य अत्यंत अभिमानास्पद, संतोषजनक आणि कृतज्ञतेस पात्र आहे. गेल्या वर्षासारखे संकट आपण यापूर्वी कधीच अनुभवले नव्हते. या वर्षात झालेले नुकसान कधीच विसरण्याजोगे नसले तरी महामारीच्या या अभूतपूर्व संकटात रेल परिवाराने कणखरतेने, दृढनिश्चयाने आणि मजबुतीने या संकटावर मात करत आपले कार्य सुरु ठेवले असे ते म्हणाले. कोविड महामारीच्या संकटात रेल्वे विभागाने देशसेवेला वाहून घेतले. सगळे जग एकाच जागी थांबलेले असताना, रेल्वेचे कर्मचारी मात्र एकही दिवस विश्राम न करता, स्वतःच्या जीवाला असलेल्या धोक्याची पर्वा न करता, जास्त मेहनत करत राहिले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे त्यांनी फिरती ठेवली.  

रेल्वेतील कर्मचाऱ्यांच्या कटीबद्धतेमुळे, आपण उर्जा प्रकल्पासाठी कोळसा, शेतकऱ्यांना आवश्यक खते तसेच सामान्य ग्राहकांसाठी अन्नधान्य यांच्या देशभर अखंडित पुरवठा होईल याबद्दल निश्चिंत होऊ शकलो असे गोयल यांनी म्हटले आहे. कोविड-19 च्या संकटाशी लढण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नांमध्ये रेल्वे परिवाराने दिलेल्या निस्वार्थी योगदानाला देश कायम लक्षात ठेवेल असे मत गोयल यांनी त्यांच्या पत्रात व्यक्त केले आहे.

कोविड काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांची इच्छाशक्ती आणि निश्चयाच्या जोरावर, 4,621 श्रमिक विशेष गाड्यांच्या वाहतुकीतून प्रवासात अडकलेल्या 63 लाखांहून जास्त प्रवाशांना त्यांच्या कुटुंबाकडे जाण्याची सोय केली. टाळेबंदीदरम्यान, निर्बंध लागू असताना देखील रेल्वेने सुरक्षा आणि पायाभूत सोयीविषयक 370 महत्त्वाची कामे पूर्ण केली.या काळात चालविलेल्या ‘किसानरेल्वे ’ सेवेच्या माध्यमातून आपल्या अन्नदात्या शेतकऱ्यांचा शेतमाल थेट मोठ्या बाजारांमध्ये विक्रीला नेण्यासाठीचे माध्यम म्हणून काम केले. अशा कामांमधून तुम्ही देशातील लाखो लोकांच्या जीवांना आणि हृदयाला हात घातला आहे असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

या काळात, अत्यंत अनुकरणीय कार्य करत, रेल्वेने, 1,233 दशलक्ष टन मालवाहतूक करून अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी दिली ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तसेच याआधी कुठल्याही वर्षात झाले नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 6,015 किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले असे गोयल यांनी या पत्रात नमूद किले आहे..   

तुमच्या समर्पण वृत्तीने भव्य काम उभारण्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. या कार्यशील कर्मचारीवर्गाच्या मदतीने आपल्या  कामगिरीच्या माध्यमातून  आपण नवनवे विक्रम करत राहू, नवी उद्दिष्टे साध्य करू आणि इतरांसाठी नवे आदर्श निर्माण करू आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात योगदान देऊ याचा मला विश्वास वाटतो असा विश्वास पियुष गोयल यांनी रेल्वे विभागाला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

 

*****

Jaydevi PS/SC/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1709314) Visitor Counter : 148