कोळसा मंत्रालय
भारतातील व्यावसायिक कोळसा खाणींच्या दुसऱ्या टप्प्यातील लिलावाची सुरुवात
Posted On:
25 MAR 2021 4:52PM by PIB Mumbai
भारतातील 67 खाणींतील कोळशाच्या विक्रीसाठी व्यावसायिक कोळसा खाणींच्या दुसऱ्या टप्प्यातील लिलावाची आज सुरुवात करण्यात आली. सन 2014 मध्ये कोळसा खाणींच्या लिलावाची पद्धत सुरु झाल्यापासून आज प्रथमच लिलावाच्या विशिष्ट टप्प्यात इतक्या मोठ्या संख्येत कोळसा खाणींचा लिलाव होत आहे. केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नवी दिल्ली इथे झालेल्या कार्यक्रमात या लिलाव प्रक्रियेचे उद्घाटन केले. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि कोळसा विभागाचे सचिव अनिल कुमार जैन यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
कोळसा मंत्रालयाने लिलावासाठी खुल्या केलेल्या 67 कोळसा खाणींपैकी 23 खाणी कोळसा खाण (विशेष तरतुदी) कायद्याअंतर्गत तर उर्वरित 44 खाणी खाण तसेच खनिज विकास आणि नियामक कायद्याअंतर्गत लिलावासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. या कोळसा खाणी लहान आणि मोठ्या साठ्यांनी बनलेल्या मिश्र प्रकारच्या, कोकिंग आणि बिगर-कोकिंग तसेच संपूर्णपणे किंवा अंशतः खोदलेल्या खाणी असून त्या महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओदिशा या 6 राज्यांमध्ये विस्तारलेल्या आहेत.
“आपण कोळशाला देशातील आर्थिक घडामोडींचा प्रेरक घटक म्हणून स्थान दिले आहे. भारतीय कोळसा क्षेत्रामध्ये अगणित संधी उपलब्ध होत आहेत, म्हणून मी गुंतवणूकदारांना देशातील कोळशाच्या साठ्यांसारख्या वापरात नसलेल्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आमंत्रित करीत आहे,” असे जोशी यांनी लिलाव प्रक्रियेचे उद्घाटन करताना सांगितले.
भूतकाळातील लिलाव प्रक्रियेचे यश लक्षात घेऊन सरकार यापुढे “चक्राकार लिलाव” प्रक्रियेचा स्वीकार करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. कोळसा ही देशातील पहिली अशी खनिज संपत्ती आहे ज्यासाठी चक्राकार लिलाव प्रक्रियेचा अवलंब केला जाणार असून त्यात लिलावासाठी नेहमीच कोळसा उपलब्ध असेल.
व्यावसायिक पातळीवरील कोळसा उत्खननाला प्रोत्साहन देतानाच, सरकार कोल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या विद्यमान ई-लिलाव पद्धतीमध्ये काही सुधारणा करून कोल इंडिया कंपनीच्या विविध ई-लिलाव मार्गांचे एकत्रीकरण करण्याचा विचार करत आहे, असे जोशी यांनी सांगितले. यामुळे “एका प्रकारच्या कोळशाकरिता एक किंमत” या पद्धतीचा स्वीकार करायला मदत होईल. एकाच ई-लिलाव खिडकी द्वारे बाजारभावाने कोळशाची विक्री झाल्यामुळे या प्रक्रियेत सुलभता येईल आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले.
व्यावसायिक पातळीवर कोळसा खाणींचे उत्खनन हा देशाच्या कोळसा क्षेत्राने हाती घेतलेला सर्वात क्रांतिकारी आणि प्रगतीशील उपक्रम आहे, यामुळे भारतीय कोळसा क्षेत्राची उत्पादकता आणि आधुनिकीकरण यात मोठी सुधारणा घडून येईल असे मत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले.
***
S.Thakur/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707543)
Visitor Counter : 318