शिक्षण मंत्रालय

परदेशी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी आमंत्रित करण्याच्या हेतूने केंद्र सरकारची पूर्वतयारी


एकापेक्षा अधिक पदव्या मिळविण्यासाठी, परदेशी विद्यापीठांसोबत कर्ज हस्तांतरण यंत्रणेसह सहकार्य संबंध वाढविण्याचा निर्णय

Posted On: 20 MAR 2021 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2021

 

उच्च शिक्षणासाठी भारतात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी हाती घ्यायच्या उपाययोजनांवर केंद्रीय शिक्षण मंत्रालय विचार विमर्श करीत आहे. मंत्रालयाच्या अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या ‘भारतात शिक्षण योजने’ च्या भागीदार संस्थांच्या 19 मार्च रोजी झालेल्या आढावा बैठकीत, उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांनी सांगितले की, या योजनेत सहभागी होण्यासाठीच्या पात्रता अटींमध्ये लवकरच सुधारणा करण्यात येणार आहेत. या नव्या सुधारणांमुळे उच्च शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक दर्जा असलेल्या अधिकाधिक संस्था या योजनेत सहभागी होऊ शकतील. जागतिकीकरणाला पाठींबा देणाऱ्या कोणत्याही विषयात खासगी आणि सरकारी संस्था असा कोणताही भेद केला जाणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.  

‘भारतात शिक्षण’ हा भारत सरकारचा उपक्रम असून परदेशी विद्यार्थ्यांना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी आमंत्रित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हा उपक्रम 2018 साली सुरु करण्यात आला आणि सध्या निवडक 117 संस्था यात सहभागी झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर सामायिक पोर्टल द्वारे या योजनेत प्रवेश दिला जातो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत भारतीय संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जगभरातील 50 देशांतील सुमारे 7500 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी दर्जात्मक शैक्षणिक माहिती मिळणारेच नव्हे तर त्या विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वागतशील, आनंदी आणि निवांत वाटेल असे उपयुक्त, संस्था परिसरातील वातावरण उपलब्ध करून देण्याचे महत्त्व ओळखले आहे. यासाठी सर्व संबंधित सहकारी संस्थांनी परदेशी विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाची वसतिगृहे उभारावी असे आवाहन अमित खरे यांनी केले. या योजनेला पाठींबा देण्यासाठी असलेल्या विद्यार्थी सेवा क्षेत्र योजनेतून यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद केलेली आहे, त्यातून काही संस्थांना मदत मिळू शकेल असे ते म्हणाले. त्याचबरोबर, या योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कार्यालयाची स्थापना करणे अत्यंत निकडीचे आहे. परदेशी विद्यार्थ्याची संस्थेत प्रवेश घेण्यासाठी निवड झालेल्या दिवसापासून या विद्यार्थ्यांची प्रत्येक गरज पुरविण्यासाठी या कार्यालयाने एक-खिडकी मदत केंद्र म्हणून काम करणे अपेक्षित आहे.याशिवाय, कुटुंबे तसेच मार्गदर्शकांचे जाळे तयार करण्यासारख्या मार्गांनी परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय समाजात मिसळून राहायला मदत होईल आणि त्यांना या देशात स्वागतशील वातावरण असल्याची खात्री होऊन त्यांचा इथला मुक्काम आनंददायी होईल, जपून ठेवण्यासारख्या आठवणी त्यांच्याकडे असतील आणि ते त्यांचा हा सकारात्मक अनुभव इतरांना सांगतील.

जुळ्या, संयुक्त आणि दुहेरी पदव्या मिळविण्यासाठी, कर्ज हस्तांतरण यंत्रणेसह भारतीय आणि परदेशी संस्थामध्ये अधिकाधिक प्रमाणात संस्थांशी शैक्षणिक भागीदारी करण्यासाठी शिक्षण मंत्रालय प्रयत्नशील आहे. यासंदर्भातील नियमांचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने सहभागी संस्थांच्या विचार विमर्शासाठी  जारी केला आहे. हे नियम विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रम आणि एक अथवा दोन सत्रांचे छोटे अभ्यासक्रम यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.

 

 

S.Thakur/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706292) Visitor Counter : 186