रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

‘वाहन भंगारात काढण्याचे धोरण’ सर्वच हितसंबंधियांसाठी फायदेशीर : गडकरी

Posted On: 18 MAR 2021 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मार्च 2021

 

“जुनी वाहने भंगारात काढण्याविषयीचे धोरण या क्षेत्रातील हितसंबंधियांसाठी फायदेशीर ठरणारे आहे” असे मत, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. आज संसदेत वाहन भंगारात काढण्याविषयीच्या धोरणाची घोषणा केल्यानंतर नवी दिल्लीत ट्रान्सपोर्ट भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या धोरणामुळे, सुरक्षितता, इंधनाची बचत आणि प्रदूषण या सगळ्यावर परिणामकारक उपाययोजना होऊ शकतील, असे गडकरी पुढे म्हणाले.

या धोरणात दंड किंवा इतर कुठल्याही शिक्षेची तरतूद नाही, तसेच हे धोरण गरिबांच्याही हिताचे आहे, असे सांगत गडकरी यांनी या धोरणाचे फायदे विशद केले. “ भंगारात दिलेल्या वाहनांमधून कच्चा माल नवी वाहने तयार करण्यासाठी वापरला जाईल, त्यामुळे, नव्या वाहनांच्या किमती तर कमी होतीलच, त्यांच्या देखभालीचा खर्चही कमी होईल. तसेच यातून या क्षेत्रात, रोजगाराच्या नव्या संधी देखील उपलब्ध होतील.” असे गडकरी यांनी सांगितले. येत्या एक-दीड वर्षात, देशभरात, 100 पेक्षा जास्त, ‘वाहन भंगारात काढण्याची केंद्रे’ कार्यान्वित होतील आणि पुढेही ही संख्या वाढतच राहिल, अशी माहिती त्यांनी दिली.

त्याशिवाय, नव्या वाहनांवरच्या खरेदीवर वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी मध्ये सवलत द्यावी, अशी विनंती  केंद्रीय वित्तमंत्री आणि राज्य सरकारांनाही करणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले. ‘व्हिंटेज’ म्हणजेच अगदी जुन्या, दुर्मिळ झालेल्या वाहनांचा समावेश या भंगारात काढण्याच्या धोरणात केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, स्वस्त चारचाकी गाडयांमध्येही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था म्हणून एअरबँग लावणे अनिवार्य केले जाणार आहे, असे ते म्हणाले. हे धोरण म्हणजे, ज्ञानाचा वापर करून कचऱ्यातून संपत्ती निर्माण करणारे धोरण आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1705856) Visitor Counter : 111