पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी आपत्ती प्रतीरोधक पायाभूत सुविधा सहकार्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले

एकमेकांवर अवलंबून आणि एकमेकांशी जोडलेल्या गेलेल्या या जगात कोणताही देश जगातील आपत्तीच्या परिणामांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाही: पंतप्रधान

महामारीची शिकवण आपण विसरता कामा नये :पंतप्रधान

आपत्ती प्रतीरोधक पायाभूत सुविधा ही जनचळवळ व्हायला हवी: पंतप्रधान

Posted On: 17 MAR 2021 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून CDRI अर्थात आपत्ती प्रतीरोधक पायाभूत सुविधा सहकार्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या द्‌घाटन समारंभ प्रसंगी उपस्थितांना  संबोधित केले. फिजी, इटली आणि युनायटेड किंगडम या देशांचे पंतप्रधान या प्रसंगी उपस्थित होते. अनेक देशांच्या केंद्र सरकारांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्था, शैक्षणिक संस्था आणि खासगी क्षेत्रातील अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी देखील या परिषदेत भाग घेतला.

सद्य परिस्थितीला अभूतपूर्व संबोधत पंतप्रधान म्हणाले की, आपण सर्वजण सध्या शतकातून एकदा येणाऱ्या अशा आपत्तीला तोंड देत आहोत. एकमेकांवर अवलंबून आणि एकमेकांशी जोडलेल्या या जगात, गरीब अथवा श्रीमंत, पूर्वेचा असो किंवा पश्चिमेचा, उत्तरेचा असो किंवा दक्षिणेचा- कुठलाच देश जागतिक आपत्तीपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाही हा धडा कोविड-19 महामारीने आपल्याला शिकविला आहे.

एखाद्या आपत्तीचा सामना करण्यासाठी संपूर्ण जग कशा प्रकारे एकवटू शकते हे या महामारीने दाखवून दिले याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठीचे संशोधन जगातील कोणत्याही देशात होऊ शकते हे या महामारीने आपल्याला दाखवून दिले असे पंतप्रधानांनी सांगितले. यासाठी जगाच्या सर्व भागांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधनाला पाठबळ पुरविणारी जागतिक परिसंस्था विकसित करणे आणि जिथे या संशोधनाची सर्वात जास्त गरज असेल तिथे ते पोहोचवणे या दृष्टीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. सन 2021 हे वर्ष महामारीपासून जलदगतीने रोगमुक्ती मिळण्याचे वर्ष ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या महामारीने आपल्या शिकविलेले धडे विसरता कामा नये असे पंतप्रधानांनी बजावले. आणि हा नियम फक्त सार्वजनिक आरोग्यविषयक आपत्तीच्या वेळीच नव्हे तर इतर सर्व आपत्तींसाठी लागू होतो असे ते म्हणाले. हवामानविषयक बदलांचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली.

पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणाऱ्या भारतासारख्या अनेक देशांनी, ही गुंतवणूक आपत्ती प्रतीरोधक क्षेत्रात असून धोका निर्माण करणार नाही याची खात्री करून घ्यायला हवी या मुद्द्यावर  त्यांनी जोर दिला. ते म्हणाले की डिजिटल सुविधा, नौकानयन वाहतूक, हवाई वाहतूक  यासारख्या अनेक सेवांच्या  पायाभूत यंत्रणा संपूर्ण जगभर पसरलेल्या असतात आणि जगाच्या एका भागावर  कोसळलेल्या आपत्तीचे दुष्परिणाम जलदगतीने  संपूर्ण जगात पसरू शकतात. जागतिक यंत्रणेला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी सर्वाचे सहकार्य अनिवार्य आहे.

सन 2021 या वर्षाला विशेष महत्त्व आहे याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. आपण आता पॅरीस करारातील शाश्वत विकास ध्येये आणि सेन्दाई चौकटीच्या मध्याकडे प्रवास करीत आहोत. या वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत युनायटेड किंगडम आणि इटली यांच्या यजमानपदात होणाऱ्या  COP-26 परिषदेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यात या आपत्ती प्रतीरोधक सुविधांतील भागीदारी महत्त्वाची भूमिका निभावेल असे पंतप्रधान म्हणाले.

काही प्राधान्यक्रमाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांबाबत पंतप्रधानांनी विस्ताराने माहिती दिली. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे CDRI ने कोणीही मागे पडता कामा नये या शाश्वत विकासाच्या मध्यवर्ती वचनाला मूर्त स्वरूप देण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की आपण सर्वात दुर्बल देश आणि समुदायांच्या समस्यांना प्राथमिकता द्यायला हवी. दुसरे असे की, काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या विशेषतः, या महामारीच्या काळात मध्यवर्ती भूमिका निभावणाऱ्या आरोग्य सुविधा आणि डिजिटल सेवांसारख्या काही महत्त्वाच्या सुविधा क्षेत्रांच्या कामगिरीचा आपण आढावा घ्यायला हवा. या क्षेत्रांच्या अनुभवांनी आपल्याला काय धडे दिले? आणि आपण त्यांना भविष्यकालीन कामगिरीसाठी कोणत्या प्रकारे अधिक संवेदनक्षम बनवू शकतो? तिसरे म्हणजे संवेदनक्षम होण्याच्या नादात कोणतीही तंत्रज्ञानविषयक यंत्रणा अगदी मुलभूत किंवा अगदी आधुनिक मानणे टाळायला हवे असे ते म्हणाले.  CDRI ने तंत्रज्ञानाच्या उपयोजनाचे प्रत्यक्ष परिणाम वाढविणे अपेक्षित आहे. आणि सर्वात शेवटचे म्हणजे, आपत्ती प्रतीरोधक पायाभूत सुविधांची मागणी ही विशेषज्ञ आणि तत्सम लोकांपर्यंत मर्यादित न राहता  जनसामान्यांची चळवळ व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भाषण संपविले.

 

M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1705562) Visitor Counter : 18