पंतप्रधान कार्यालय
कोविड-19 परिस्थिती बाबत पंतप्रधानांनी केले मुख्यमंत्र्यांना संबोधित
लसीकरण केंद्रांची संख्या आणि आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा: पंतप्रधान
लशीच्या मात्र वाया न घालविण्याचे केले आवाहन
सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र आणि 'टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट'धोरणावर जोर
Posted On:
17 MAR 2021 5:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड-19 च्या परिस्थितीबद्दल विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी कोविडविरूद्धच्या लढाईतील पंतप्रधानांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम सुरळीतपणे राबविल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले, तसेच लसीकरणाच्या व्याप्तीमध्ये आणखी वाढ करण्यासंदर्भात सूचना व मते मांडली.
अलीकडे काही राज्यांतील कोविड रुग्ण संख्या वाढल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये कोविडचे योग्य वर्तन राखण्याच्या आव्हानावर देखील यावेळी चर्चा केली. अधिक दक्षता घेण्याची आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्य केले.
विषाणुच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज असलेल्या जिल्ह्यांची यादी गृहमंत्र्यांनी यावेळी जाहीर केली. केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशातील सद्य कोविडची स्थिती आणि लसीकरणाच्या धोरणाविषयी सादरीकरण केले.
भारतातील 96% पेक्षा जास्त कोविड रुग्ण बरे झाले असून जगातील सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण हे भारतात आहे असे पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक येत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. गेल्या काही आठवड्यांत देशातील 70 जिल्ह्यांमध्ये 150 टक्के वाढ झाली आहे. कोरोनाची ही “दुसरी लाट” त्वरित थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच जर आपण आता या महामारीला आळा घातला नाही तर देशात याचा खूप मोठा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला.
कोरोनाची “दुसरी लाट” थांबवण्यासाठी पंतप्रधानांनी त्वरित व निर्णायक पावले उचलण्याच्या गरजेवर जोर दिला. स्थानिक प्रशासनाचे प्रश्न सोडविण्यावर त्यांनी भर दिला. कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपल्या यशस्वी कामगिरीने आपण जो आत्मविश्वास संपादन केला आहे त्याला निष्काळजीपणात रुपांतरीत करू नका, असा इशारा त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, जनतेला घाबरवू नका आणि त्याचबरोबरच त्यांची त्रासातूनही सुटका करा. आपल्या भूतकाळातील अनुभवांच्या आधारे धोरण तयार करण्यावर त्यांनी भर दिला.
सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी लक्ष वेधले.गेल्या एक वर्षापासून करीत असलेल्या 'टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट' धोरणाचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि आरटी-पीसीआर चाचणी दर 70 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवणे फार महत्वाचे आहे असे ते म्हणाले. रॅपिड अँटिजन चाचण्यांवर अधिक भर देणार्या केरळ, ओदिशा, छत्तीसगड आणि उत्तरप्रदेश सारख्या राज्यांनी अधिक आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर द्यावा यावर त्यांनी जोर दिला.
पंतप्रधानांनी चाचणीचे प्रमाण वाढविण्याचे आणि लहान शहरांमध्ये "रेफरल सिस्टम" (निर्देश प्रणाली) आणि "रुग्णवाहिका नेटवर्क" वर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. आता संपूर्ण देश प्रवासासाठी खुला झाला असून प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याने हे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपापसात माहिती सामायिक करण्यासाठी नवीन यंत्रणा निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठीच्या एसओपीचे पालन करण्याचीही जबाबदारी वाढली आहे.
कोरोना विषाणूचे म्युटंट आणि त्याच्या परिणामाचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.देशातील लसीकरणाचा निरंतर वाढत असलेला वेग आणि एकाच दिवसात लसीकरणाने 3 दशलक्षाहून अधिकचा टप्पा ओलांडल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केलं. परंतु त्याच वेळी त्यांनी लसीची वाया जाणाऱ्या मात्रेच्या समस्येकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशात 10 टक्के लसी वाया गेल्या आहेत. लसीचे वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन व कारभारातील उणीवा त्वरित दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी वरील उपाययोजनांसह मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे, स्वच्छतेची काळजी घेणे देखील आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या उपाययोजनांमध्ये कोणतीही दिरंगाई नसावी आणि या विषयांवर लोकांची जागरूकता वाढवावी असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचे आवाहन केले आणि मुदतबाह्य लसींबाबत जागरुक राहण्यास सांगितले. ‘दवाई भी और कडाई भी’ यावर पंतप्रधानांनी जोर दिला.
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1705500)
Visitor Counter : 354
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam