उपराष्ट्रपती कार्यालय

सर्व राष्ट्रांच्या समावेशक आणि शाश्वत विकासासाठी जागतिक शांतता अत्यावश्यक : उपराष्ट्रपती

लोकशाही प्रशासन समृद्ध करण्याचे उपराष्ट्रपतींचे आंतर- संसदीय संघाला आवाहन

Posted On: 15 MAR 2021 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2021
 

बहुपक्षीय लोकशाही जागतिक व्यवस्थेला  प्रोत्साहन देण्यावर भारताचा विश्वास आहे यावर उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी भर दिला आहे.

आंतर संसदीय संघाचे ( आयपीयु )अध्यक्ष दुआर्ते पाचेको यांच्याशी उप राष्ट्रपती भवनात त्यांनी संवाद साधला. लोकशाही आणि समावेशी विकास यासाठी भारताच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. जगभरातल्या अनेक देशांना कोविड-19 प्रतिबंधक लस पुरवण्यातून याची  प्रचीती येत आहे. भारताने कोविड-19 संबंधित  वैद्यकीय सामग्रीचाही 154 हून अधिक देशांना पुरवठा केला असून  महामारीमध्ये मदत करण्यासाठी अनेक देशात भारतीय धडक कृती पथके तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अशा आपत्तीमध्ये एक जबाबदार राष्ट्र म्हणून भारताने नेहमीच जबाबदारी निभावली आहे, जास्तीत जास्त लोकांची आयुष्ये वाचवण्याची भारताला चिंता होती असे त्यांनी सांगितले.

1949 पासून भारत आयपीयुमध्ये  सक्रीय सहभागी आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.  आयपीयुने लोकशाही प्रशासन समृध्द करण्याच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. द्विपक्षीय मुद्यांचा मंच बनण्यापासून आयपीयुने दूर राहिले पाहिजे असे उपराष्ट्रपती म्हणाले

शांतता आणि लोकशाही हे महत्वाचे घटक आहेत जे आधुनिक समाजाचे महत्वाचे आधार आहेत असे त्यांनी जागतिक शांततेला प्रोत्साहन देण्यात भारताची भूमिका विषद करताना सांगितले. जगभरात हिंसाचाराने अनेक रूपे धारण केली असून दहशतवाद आणि अतिरेकी संघटनानी शांतता आणि सुरक्षिततेला मोठे आव्हान निर्माण केले आहे.  सर्व राष्ट्रांच्या समान आणि  शाश्वत विकासासाठी जागतिक शांतता अत्यावश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.


* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1704963) Visitor Counter : 21