राष्ट्रपती कार्यालय

वनवासींचा सांस्कृतिक वारसा आणि ओळख अबाधित राखत त्यांना आधुनिक विकासाच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत - राष्ट्रपती कोविंद


उत्तरप्रदेशात सोनभद्र, चपकी इथे सेवाकुंज आश्रमाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन आणि वनवासी समागमला भेट

Posted On: 14 MAR 2021 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2021

 

आपला सांस्कृतिक वारसा आणि ओळख अबाधित राखत वनवासी समाज आधुनिक विकास प्रक्रियेचा अविभाज्य भाग राहील यादृष्टीने आपला प्रयत्न असायला हवा, असं प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केले. उत्तरप्रदेशमध्ये सोनभद्र, चपकी इथे सेवाकुंज आश्रमाच्या नव्याने बांधलेल्या इमारतीच्या उद्‌घाटन प्रसंगी ते आज (मार्च 14, 2021) बोलत होते.

या प्रसंगी भगवान बिरसा मुंडा यांचे स्मरण करून राष्ट्रपती म्हणाले की, बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या शोषणापासून वन संपत्ती व संस्कृती वाचविण्यासाठी अविरत संघर्ष केला. त्यांचे जीवन केवळ आदिवासींसाठीच नाही तर सर्व नागरिकांसाठीही प्रेरणास्रोत आणि आदर्श आहे.

सेवा कुंज संस्थानच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींचे उद्‌घाटन करताना  आनंद झाला असे राष्ट्रपती म्हणाले. एनटीपीसीच्या वतीने शाळा आणि वसतीगृह बांधण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. नव्याने बांधण्यात आलेल्या इमारती आणि इतर सुविधा या संस्थेतील  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाले की, ग्रामीण आणि वनक्षेत्रात देशाचा आत्मा वास्तव्य करतो, असा माझा विश्वास आहे. ज्यांना भारताची पाळेमुळे जाणून घ्यायची असतील त्यांनी तर सोनभद्र सारख्या ठिकाणी थोडा वेळ व्यतीत केला पाहिजे. ते म्हणाले की, ग्रामीण / वनवासी समुदायांच्या विकासाशिवाय देशाच्या सर्वांगीण विकासाची कल्पनाच करता येणार नाही. त्यांचा खऱ्या अर्थाने विकास केल्याशिवाय देशाचा विकास अपूर्ण आहे.  म्हणूनच , ग्रामीण आणि वनवासी समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहेत.

आपल्या पूर्वजांकडून मिळालेली अंतर्ज्ञानाची परंपरा वनवासींनी जिवंत ठेवली असून ही परंपरा ते पुढे नेत आहेत असे सांगत राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

शेतीपासून कला आणि शिल्पापर्यंत, त्यांचा निसर्गाशी असलेला सुसंवाद प्रत्येकाला प्रभावित करतो.

उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाला झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि मध्य प्रदेशांशी जोडणारा सोनभद्र प्रदेश आधुनिक विकासाचे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. ते म्हणाले की, वनवासींनी आपला सांस्कृतिक वारसा व ओळख अबाधित राखत आधुनिक विकास प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनावे , यादृष्टीने आपले प्रयत्न झाले पाहिजेत .

लुप्त होत चाललेल्या लोककलांचे पुनरुज्जीवन आणि लोकभाषा आणि गीतांचे संवर्धन  करण्याच्या दृष्टीने सेवा समर्पण संस्थानप्रयत्न करत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.

राष्ट्रपतींच्या भाषणासाठी इथे क्लिक करा

 

 

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704728) Visitor Counter : 226