जलशक्ती मंत्रालय

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या प्रगतीचा सर्व राज्यांच्या/ केंद्रशासित प्रदेशांच्या जल संसाधन मंत्र्यांबरोबर घेतला आढावा

Posted On: 13 MAR 2021 8:40PM by PIB Mumbai

 

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील ग्रामीण जल- पुरवठा मंत्र्यांसह एका वेबिनारचे आयोजन केले होते. जल जीवन मिशन हा प्रामुख्याने 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने प्राधान्यक्रमाने हाती घेतलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत झालेल्या प्रगतीचा केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री रतनलाल कटारिया, DDWS सचिव पंकज कुमार, अतिरिक्त सचिव आणि या योजनेचे अध्यक्ष भारत लाल हे या आभासी परिषदेला उपस्थित होते.

'हर घर जल' हा पायाभूत सुविधा फक्त एकदाच उभारण्याचा कार्यक्रम नाही, असे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागातील आघाडी वरच्या कार्यकर्त्यांची क्षमता वाढवणे, महिला सबलीकरण आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती अशी अनेक उद्दीष्टे साध्य करत भरपूर काळ सुरू राहणारा असा हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'पेय जलाची दर्जा तपासणी, देखभाल आणि सर्वेक्षण' या कार्यक्रमाला या वेळी केंद्रीय मंत्र्यांनी प्रारंभ केला. तसेच 'वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम' (WQMIS)  या जलजीवन योजनेच्या कार्यक्रमाचीही सुरुवात केली. WQMIS हे ऑनलाइन पोर्टल तसेच मोबाईल ॲप पाण्याच्या दर्जासंदर्भात संपूर्ण स्वयंचलित माहिती व्यवस्थापनासाठी आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2021- 22 मध्ये जल जीवन योजनेसाठीच्या अर्थसंकल्पीय निधी तरतुदीत प्राधान्याने वाढ झाल्याचे दिसून आले. 11,500 कोटी रुपये ही 2020-21मध्ये असलेली तरतूद 2021 -22 साठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत 50,011कोटीं रुपयांपर्यंत वाढलेली दिसून आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 ला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात  जलजीवन योजनेची घोषणा केली होती . त्यानंतर देशभरात या योजनेने लक्षणीय प्रगती केली. ‌ आतापर्यंत 3.77 कोटी ग्रामीण घरांमध्ये नळजोडणी देण्यात आली आहे, असे शेखावत यांनी सांगितले.

सात कोटींहून जास्त ग्रामीण कुटुंबांना आता घरच्या घरी स्वच्छ पाणी मिळू लागले आहे म्हणजेच एक तृतीयांशपेक्षा जास्त ग्रामीण घरांना नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळत आहे.

52 जिल्हे, 670 विभाग, 42,100 पंचायती आणि 81,123 गावांमध्ये आता खात्रीने घरात नळाद्वारे जलपुरवठा होत असल्याचे शेखावत यांनी यावेळी नमूद केले

***

S.Thakur/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1704637) Visitor Counter : 222