आयुष मंत्रालय
सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ‘शंभर दिवस’ काउंटडाऊनला प्रारंभ
Posted On:
13 MAR 2021 6:26PM by PIB Mumbai
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) तसेच आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) किरेन रिजीजू यांनी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ‘शंभर दिवस’ काउंटडाऊनला आज सकाळी 7.30 वाजता नवी दिल्लीतील मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था (MDNIY) येथे प्रारंभ केला. आयुषचे अतिरिक्त सचिव पी के पाठक या संमारंभाच्या अध्यक्षपदी होते.
मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे संचालक आयवी बसवरड्डी यांनी त्यांच्या प्रास्ताविकात प्रमुख पाहुण्यांचे व इतर मान्यवरांचे स्वागत केले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर करणे, युनेस्कोने योगाला मानवी सांस्कृतीचा अमूल्य वारसा म्हणून दिलेली मान्यता आणि योगासनाला स्पर्धात्मक खेळ म्हणून जाहीर करणे अश्या तीन प्रमुख बाबी सरकारने योगाच्या प्रसार आणि विकासासाठी केल्या अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सरकारने या गोष्टी प्राधान्यक्रमाने केल्यामुळे योगाच्या प्रसाराच्या दृष्टीने 2014 पासून मोठी वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
योगा मानवी शरीराच्या प्रतिकारक्षमतेत वाढ करत असल्यामुळे कोविड-19 ला रोखण्यात योग उपयुक्त ठरल्याचे अतिरिक्त सचिव पी के पाठक यांनी सांगितले. आयुष मंत्रालयासह अनेक संबधित नानाविध उपक्रमांसह आंतरराष्ट्रीय योग दिन-2021 साजरा करतील असेही त्यांनी नमूद केले.
योग ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ असून त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय समुदायात एकमेवाद्वितीय मानाचे स्थान मिळाले आहे असे मंत्रीमहोदयांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात स्पष्ट केले.
या समारंभात उपस्थित असलेल्या लहान विद्यार्थ्यांना तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रसारण बघत असलेल्या प्रेक्षकवर्गाला त्यानी योगाचा सराव करण्याचे व योगासन कार्यक्रमात भाग घेण्याचे आवाहन केले. भारताच्या पंतप्रधानांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे योगाची स्वीकारार्हता या मर्यादेपर्यंत वाढली की आता योगाला जीवनपद्धती म्हणून स्वीकारले जात आहे असे ते म्हणाले.
मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या योगविज्ञान या द्विवार्षिक संशोधन पत्रिकेच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आले.
मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने लेह-लडाखमधील योग प्रशिक्षकांसाठी आयोजित केलेल्या पुनर्परिचय योग प्रशिक्षण वर्गाचा त्यांनी प्रारंभ केला.
मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली 45 मिनिटांचे सामान्य योग नियम या विषयावरील प्रात्यक्षिक यावेळी झाले. यावेळी 300 विद्यार्थी आणि उपस्थितांसह कोविड नियमांचे पालन करत मंत्रीमहोदयांनीही या योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिकाधीक लोकांमध्ये सर्वसाधारण योग नियमपालनाबद्दल जागरूकता निर्माण करून त्याचा प्रसार करणे आणि त्यांना याचा फायदा मिळवून देणे हे या कार्यक्रमामागील प्रमुख उद्दीष्ट होते. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या समाजमाध्यम मंचावरून तसेच आयुष व My Gov च्या समाजमाध्यम मंचावरून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले.
***
S.Thakur/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704608)
Visitor Counter : 256