पंतप्रधान कार्यालय

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या महान व्यक्तींना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली


हा संग्राम महाभारत, राम, हल्दीघाटी आणि शिवाजी यांच्या काळातील पराक्रम आणि जागरूकतेशी साम्य दर्शवणारा : पंतप्रधान

आपले संत, महंत आणि आचार्य यांनी देशाच्या प्रत्येक भागात स्वातंत्र्याची ज्योत तेजस्वीपणे पेटती ठेवली : पंतप्रधान

Posted On: 12 MAR 2021 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य चळवळीतील सर्व स्वातंत्र्यसैनिक, चळवळ, उठाव आणि संघर्ष यांना आदरांजली  वाहिली. त्यांनी चळवळी, संघर्ष आणि व्यक्तिमत्त्वांना विशेष आदरांजली वाहिली , ज्यांना भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्यलढय़ातील कथेत योग्य ओळख मिळाली नाही. आज अहमदाबादच्या साबरमती आश्रमात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (भारत @ 75) सुरू केल्यानंतर ते बोलत होते.

 

कमी ज्ञात असलेल्या चळवळी व संघर्षाच्या योगदानाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक संघर्ष आणि लढा म्हणजे खोटारडेपणाच्या शक्ती विरोधात भारताकडून सत्याची घोषणा होती,  भारताच्या स्वतंत्रतेची  साक्ष होती. ते म्हणाले, या संघर्षांनी राम, महाभारत, हल्दीघाटी आणि शिवाजी यांच्या काळात  स्पष्टपणे दिसलेल्या त्याच  जागरूकता आणि पराक्रमाचे प्रतिनिधित्व केले.

पंतप्रधानांनी कोल, खासी, संथाल, नागा, भिल्ल, मुंडा, सन्यासी, रामोशी, कित्तूर चळवळ, त्रावणकोर आंदोलन, बारडोली सत्याग्रह, चंपारण सत्याग्रह, संभलपूर, च्वार, बुंदेल आणि कुका उठाव आणि चळवळी यांचा उल्लेख केला.  मोदी म्हणाले की अशा अनेक संघर्षांनी देशातील प्रत्येक कालखंडात व प्रदेशात स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली. ते म्हणाले, शीख गुरु परंपरेने देशाला संस्कृती आणि परंपरांच्या संरक्षणासाठी ऊर्जा दिली.

आपले संत, महंत आणि आचार्य यांनी देशाच्या प्रत्येक भागात स्वातंत्र्यज्योत तेवत  ठेवण्याचे काम  अविरतपणे केले हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला. . यामुळेच देशव्यापी स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचला गेला.

पंतप्रधान म्हणाले, पूर्वेकडील चैतन्य महाप्रभु आणि श्रीमंत शंकर देव यांच्यासारख्या संतांनी समाजाला दिशा दिली आणि त्यांना लक्ष्यावर केंद्रित ठेवले.  पश्चिमेकडे  मीराबाई, एकनाथ, तुकाराम, रामदास आणि नरसी मेहता, उत्तरेत  संत रामानंद, कबीरदास, गोस्वामी तुलसीदास, सूरदास, गुरु नानक देव, संत रायदास  यांनी हे कार्य हाती  घेतले. त्याचप्रमाणे दक्षिणेत माधवाचार्य, निंबारकाचार्य, वल्लभाचार्य आणि रामानुजाचार्य होते.

भक्ती कालखंडात मलिक मोहम्मद जयसी, रस खान, सूरदास, केशवदास आणि विद्यापती यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांनी समाजाला  दोष सुधारण्यासाठी प्रेरणा दिली, असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्य चळवळीच्या देशव्यापी स्वरूपाला या व्यक्ती जबाबदार होत्या. पंतप्रधानांनी या नायक आणि नायिकांची चरित्रे लोकांपर्यंत नेण्याच्या गरजेवर  भर दिला. या प्रेरणादायी कहाण्या आपल्या नवीन पिढ्यांना एकता आणि उद्दीष्टे साध्य करण्याच्या इच्छशक्तीचे बहुमूल्य धडे शिकवतील, असे पंतप्रधान म्हणाले.

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1704379) Visitor Counter : 564