उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी दारिद्रय, भ्रष्टाचार आणि इतर सामाजिक कुप्रथांचे निर्मूलन करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे केले आवाहन


दांडी यात्रेने जगाला दाखवून दिले की भारत कोणत्याही दडपणाखाली झुकणार नाही,

उथळ कारणांसाठी लोकांमधे फूट पाडणाऱ्या शक्तींशी मुकाबला करण्याचे आवाहन, भारतीयत्व हेच आपल्याला एकत्र ठेवते असे उपराष्ट्रपतींनी केले प्रतिपादन

चौथ्या औद्योगिक क्रांतिसाठी युवापिढीने कौशल्य आत्मसात करून सज्ज रहावे : उपराष्ट्रपती

Posted On: 12 MAR 2021 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2021

 

उपराष्ट्रपती श्री. एम.व्यंकय्या नायडू यांनी आर्थिक दृष्टीने भारताला सामर्थ्यशाली बनविण्याचा भाग म्हणून गरीबी,अशिक्षितपणा, भ्रष्टाचार आणि लैंगिक दुजाभाव यासारख्या सामाजिक कुप्रथांचे निर्मूलन करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे आवाहन केले. हीच खरी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रध्दांजली ठरेल,असेही ते म्हणाले.

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव -75 सप्ताह या भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या 75 आठवड्यांच्या उदघाटनपर कार्यक्रमावरील आपल्या फेसबुकवरील  पोस्टवर उपराष्ट्रपती म्हणाले, की,हा आमच्या राष्ट्रीय प्रवासातील मोलाचा क्षण आहे आणि   महात्मा गांधी तसेच असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या वारशाचे संस्मरण करण्याची संधी आहे.आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या विलक्षण भावनेचे,त्यांच्या अत्त्युच्च  त्यागाचे आणि उदात्त आदर्शांचे स्मरण करणे हे आपले परमकर्तव्य आहे,असेही ते म्हणाले. 

बापूजींच्या पावलावर पाऊल टाकत आजच्या दिवशी आरंभ झालेल्या साबरमती ते दांडी या 25 दिवसांच्या ऐतिहासिक दांडी पदयात्रेचा उल्लेख करत श्री. नायडू म्हणाले,हा अथक परिश्रमांनी मिळविलेल्या स्वातंत्र्याचा उत्सव आहे.

महान दांडी यात्रेची आठवण करून देताना श्री. नायडू म्हणाले की त्यावेळी साध्या परंतु सामर्थ्यवान मीठाच्या प्रतिकाने संपूर्ण देशाला जागृत केले. ते म्हणाले, की गांधीजींच्या अहिंसेच्या खंबीर  वचनबद्धतेने आणि जे सुयोग्य तेच स्विकारण्याच्या दृढनिश्चयाने ब्रिटिशांना तसेच संपूर्ण विश्वाला दाखवून दिले की भारत कोणत्याही शक्ती अथवा  दडपणामुळे मान तुकवणार नाही.

आपण आपल्या स्वातंत्र्याची  फळे चाखत असताना हे ध्यानात घेतले पाहिजे, की आपण आपल्या घटनेत निश्चित केलेली उद्दिष्टे आणि आश्वासने पूर्ण केल्यानंतरच स्वातंत्र्याचे लक्ष्य साध्य होईल, याचीही  उपराष्ट्रपतींनी आठवण करून दिली.

श्री. नायडू यांनी पुढे असे म्हटले आहे, की उथळ कारणास्तव लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींशी आपण अग्रभागी राहून मुकाबला केला पाहिजे आणि त्यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी  अनेकांनी भारताच्या एकात्मिकतेबाबत आणि त्याच्या व्यापक क्षेत्रातील विविध सांस्कृतिक भेदांबाबत शंका व्यक्त केल्या जात  होत्या, त्यांची नायडू यांनी आठवण केली.त्या सर्वांना भारताने फोल ठरविले.

उपराष्ट्रपतींनी नमूद केले, की पुढे जात असताना आपण त्याच भावनांना अंगिकारले पाहिजे त्याचसोबतच  बलशाली आणि अधिक समृद्ध भारत निर्माण करण्याचे  व्रत शपथपूर्वक आचारायला हवे. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या  नव्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्या युवावर्गाच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करायला हवे आणि लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचे सामर्थ्य ओळखायला हवे. आपल्या लोकशाही प्रक्रियेतील मागास घटकांना उदाहरणार्थ -दिव्यांगजन,महिला,वयोवृद्ध, समलिंगी अशांना सामावून घेत आणि त्यांना देखील विकासाच्या लाभांमधे सहभागी होणे शक्य होईल हे पहाणे  आपले कर्तव्य असल्याची त्यांनी आठवण करून दिली.

लोकांनी मोठ्या संख्येने पुढे यावे, महोत्सवात सहभागी व्हावे आणि आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाची मुळे मजबूत करावीत.हा महोत्सव प्रचंड प्रमाणात यशस्वी होवो, अशा शुभेच्छा देत उपराष्ट्रपती यांनी आपल्या पोस्टचा समारोप केला आहे .

 

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1704375) Visitor Counter : 278