सांस्कृतिक मंत्रालय

स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सव’चा पंतप्रधान उद्या करणार आरंभ आणि अहमदाबादमधल्या साबरमती आश्रमातून निघणाऱ्या पदयात्रेला दाखवणार झेंडा : सांस्कृतिक मंत्री

Posted On: 11 MAR 2021 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2021

स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सव’चा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या करणार असून अहमदाबादमधल्या साबरमती आश्रमातून निघणाऱ्या पदयात्रेला ते झेंडा दाखवणार आहेतअशी माहिती  सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री प्रहलाद सिंह पटेल यांनी दिली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारने 12 मार्च  2021  ते  15 ऑगस्ट  2022 पर्यंत  भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन 'आज़ादी का अमृत महोत्सव' (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ) म्हणून साजरा करण्यासाठी  अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.राज्य सरकारे आणि  केंद्रशासित प्रदेशही  12 मार्च, 2021 ला  कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे ते म्हणाले.

महात्मा गांधी यांनी 81 व्यक्तीसोबत  12 मार्च ते  6 एप्रिल 1930  या कालावधीत प्रसिद्ध  दांडी पदयात्रा काढली  होती.  पंतप्रधान उद्या पदयात्रेला झेंडा दाखवणार असून ती साबरमती आश्रम, अहमदाबाद ते नवसारी इथल्या दांडीपर्यंत 241 मैलांचा प्रवास करणार आहे. 25 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा समारोप  5 एप्रिल 2021 रोजी  होईल. 81 व्यक्ती पदयात्रेमध्ये सहभागी होतील आणि दांडीच्या मार्गावर लोकांचे विविध गटही  यात सहभागी  होतील, असे पटेल यांनी सांगितले.

पदयात्रेच्या 75 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे नेतृत्व आपण स्वत: करणार असल्याचेही पटेल यांनी जाहीर केले.

स्वातंत्र्याचा  75 वा  वर्धापन दिन अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत येत्या 75 आठवड्यात साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक आठवड्यात  कार्यक्रम आयोजित केला जाईल. या महोत्सवात सर्व नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार सहभाग घेता यावा, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरिता सांस्कृतिक मंत्रालय साहाय्य करणार आहे.

 

 M.Chopade/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704186) Visitor Counter : 559