राष्ट्रपती कार्यालय

माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे थिरुवल्लुवर विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभातील भाषण

Posted On: 10 MAR 2021 5:25PM by PIB Mumbai

 

नमस्कार !

थिरुवल्लुवर विद्यापीठाच्या 16 व्या वार्षिक दीक्षान्त  समारंभात आपल्या सर्वांबरोबर सहभागी होऊ शकल्याचा मला आनंद वाटतो. तुमच्यासारख्या युवा बुद्धिवंतांमध्ये येऊन मला नेहमीच आनंद वाटतो. आज पदवी प्राप्त केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.

 

संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी चिरंतन संदेशांसाठी आदरणीय मानल्या जाणाऱ्या महान संत कवी आणि विचारवंत  थिरुवल्लुवर यांच्या नावावरून या विद्यापीठाचे नाव आहे. थिरुवल्लुवर यांच्या स्मरणार्थ त्यांना प्रणाम करूया. त्यांच्या उदात्त शिकवणींना आत्मसात करण्याचा संकल्प आपणही करूया. त्यांचे नियम, तत्त्वे आपल्या शिक्षणाचे आणि जीवनाचे अविभाज्य घटक होऊ द्या.

ईस्ट इंडिया कंपनी बरोबरच्या प्रारंभीच्या आव्हानात्मक लढ्याची साक्ष असणाऱ्या या भूमीवर उभा असल्याचा मला अभिमान वाटत आहे. 1806 चा वेल्लोर शिपायांचा उठाव हा आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या अग्रभागी असलेल्या चळवळींपैकी एक होता. थिरुवल्लुवर विद्यापीठाच्या 16 व्या वार्षिक दीक्षान्त समारंभाला मला प्रमुख अतिथी म्हणून असणे, हा माझा बहुमान आहे.

प्रत्येक वेळी जेव्हा मी तामिळनाडूला भेट देतो, तेव्हा येथील उत्कृष्टतेच्या सर्वोत्तम परंपरेशी जोडले गेल्यासारखे मला वाटते. उत्कृष्ट साहित्याप्रमाणेच, शेतीत सुपीक असलेले, तामिळनाडू हे एक वैशिष्ट्यपूर्ण राज्य म्हणावे लागेल, जिथे जगातील सर्वांत प्राचीन धरण, सर्वोत्तम सिंचन प्रणाली असलेले, सर्वांत प्राचीन अभियांत्रिकीचा उत्तम नमुना म्हणजेच, द ग्रँड अनिकट अस्तित्त्वात आहे. तंजावूर प्रांताच्या कावेरी नदीवर महान चोला राज्यकर्त्यांनी बांधलेले धरण, त्या प्राचीन काळात आपल्या समाजातील अभियांत्रिकीच्या उत्कृष्टतेची साक्ष आहे. ज्ञान आणि वैज्ञानिकतेचा दृष्टिकोन हे या प्रदेशातील लोकांचे आगळे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच की काय, एस. रामानुजन, नोबेल पुरस्कार विजेते सी. व्ही. रामन आणि एस. चंद्रशेखर यांच्यासारखे महान गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ या प्रदेशामधील आहेत. या प्रदेशातील चकाकत्या ताऱ्यांची यादी न संपणारी आहे.

एक उल्लेखनीय महत्त्वाची बाब आहे की, एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी आणि माझे दोन अग्रगण्य आर. वेंकटरमण आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम याच मातीतील महान पुत्र आहेत.

 

प्रिय विद्यार्थ्यांनो,

तुमच्यासाठी बोधवाक्य असणारे थिरुवल्लुवर यांचे पुढील शहाणपणाचे शब्द, ज्याचा अर्थ असा होतो की, ``जे शिक्षित किंवा बुद्धिमान आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर डोळे असतात आणि इतरांसाठी केवळ दोन बुबुळेच असतात. ``

स्थापना झाल्यापासून दोन दशकांच्या लहानशा काळात, तुमचे विद्यापीठ हे देशातील एक प्रतिष्ठित विद्यापीठ म्हणून उदयास आले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी एक प्रमुख संस्था बनली आहे आणि यामध्ये आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या प्रांतांमधील विद्यार्थी आहेत. यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे, ज्या सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या भागांमधून येतात.

या विद्यापीठामधील एकूण विद्यार्थ्यांपैकी 65 टक्के विद्यार्थी या महिला आहेत, हे समजल्यावर मला त्याचा खूप आनंद झाला आहे. आपल्या लेकी आणि भगिनी आता त्यांचे अडथळे ओलांडत आहेत आणि सर्व क्षेत्रांमध्ये यश प्राप्ती करीत आहेत. आज एकूण 66 विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सुवर्ण पदक मिळविले आहे आणि त्यापैकी 55 विद्यार्थी महिला आहेत, यावरूनच ही बाब अगदी स्पष्ट होत आहे. तसेच, आज 217 विद्यार्थ्यांना पी एच डी अर्थात विद्यावाचस्पति पदवी प्रदान करण्यात आली असून, त्यातील 100,  महिला उमेदवार आहेत. जे 10 विद्यार्थी आपले पदक आणि पदवी स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आले, त्यापैकी नऊ मुलीच होत्या, असे माझ्या लक्षात आहे आहे. म्हणजेच 90 टक्के पदके आज त्यांना प्रदान करण्यात आली आहेत. हे भारताचे उज्ज्वल भवितव्य प्रतिबिंबीत करीत आहेत. जेव्हा आपल्या देशाची महिला शिक्षित झालेली असते, तेव्हा ती  केवळ स्वतःचे भविष्य सुरक्षित करत नाही , तर ती आपल्या संपूर्ण देशाचे भविष्य सुरक्षित करते. मला खात्री आहे की कुलगुरू डॉ. थरमाई सेल्वी सोमसुंदरम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ अधिक उंची गाठेल.

भारताची उच्च शिक्षण पद्धती ही ग्रामीण आणि उपेक्षित (सीमान्त) घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविणे  आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. या प्रक्रियेमध्ये, ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शिक्षण पद्धती बनली आहे. तथापि, आत्मसंतुष्ट होण्यासाठी येथे कोणतेही स्थान नाही आणि जर आपण आणखी उंची गाठण्याची इच्छा व्यक्त केली तर आपल्याला आपण गमावलेल्या वेळेशी जुळवून घ्यावे लागेल.

ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतामध्ये शिक्षणाची समृद्ध परंपरा होती. गांधीजींनी त्याचे वर्णन ``सुंदर वृक्ष`` असे केले होते, ज्याला बदलाच्या नावाखाली ब्रिटिश राज्यकर्त्यांनी छाटून टाकले. आपण अद्याप त्या तीव्र बदलांमधून बाहेर आलेलो नाही आणि आपण आपला वारसा परत मिळविलेला नाही.

 

महिलांनो आणि सद्गृहस्थहो,

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे त्या दिशेने अतिशय नियोजनबद्ध आणि निर्णायक पाऊल आहे. समाजाची एक गरज पूर्ण करणे आणि शिक्षण हा वैयक्तिक विकासाचा एक भाग आहे या दृष्टीनेच आणि युवांसाठीच्या समग्र दृष्टीकोनातून तो तयार करण्यात आला आहे. हे शैक्षणिक धोरण, आपला प्राचीन वारसा आणि आधुनिक शिक्षणातील उत्तमता एकत्र आणते. नैतिक शिक्षण आणि भारतीय संस्कृतीबाबत जागरूकता यावर यामध्ये भर दिला आहे . अशा शिक्षण प्रणालीतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याकडे पराकोटीचा आत्मविश्वास असेल आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी ते विद्यार्थी सुसज्ज देखील असतील.  

शिवाय, नवीन शैक्षणिक धोरण हे समृद्ध आणि स्वावलंबी राष्ट्र निर्माण करण्यासाठी काय आवश्यक आहे, हे देखील विचारात घेते. यासाठी, उच्च शिक्षण प्रणालीमध्ये समानता, कौशल्य आणि सबलीकरण ही मुले बळकट करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. सर सी. व्ही. रामन यांनी म्हटले होते की, उच्च शिक्षण संस्थांनी देशाला ज्ञानाच्या विस्ताराकडे आणि आर्थिक प्रगतीकडे नेले पाहिजे. हाच आपल्या नवीन धोरणाचे थोडक्यात अर्थ आहे.

 

प्रिय विद्यार्थ्यांनो,

आज तुमच्या आयुष्यातील अभिमानाचा दिवस आहे. तुम्ही कष्टाने मिळविलेली पदवी आज तुम्ही प्राप्त करीत आहात. मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि शिवाय तुमच्या पालकांचे आणि शिक्षकांचे, ज्यांनी तुमच्यासाठी हे  शक्यप्राय केले. खरेच, समाजात तुमच्या आयुष्याचा हा एक शुभारंभ आहे. यानंतर, तुमच्या स्वतःच्या निवडी, तुमचे प्रयत्न आणि शहाणपणाच्या जोरावरच तुम्हाला तुमच्या जीवनातील यशाची शिडी चढावी लागेल. तुमचे शिक्षण तुम्हाला भरपूर संधींची द्वारे खुली करून देईल. तुमच्या पैकी अनेकजण उच्च शिक्षणाचा मार्ग स्वीकारतील. शिक्षण, ही अर्थातच आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. आपण जेवढे जास्त शिकू, तेवढे अधिक आपल्यालाच आपल्या अज्ञानाची जाणीव होते. तमिळ भाषेमध्ये एक सुंदर वचन आहे, ते म्हणजे – ``आपले शिक्षण हे वाळूने भरलेल्या मुठीसारखे आहे, तर आपली शिकण्याची गरज ही म्हणजे जेवढा जगाचा विस्तार आहे, तेवढी रुंद असते.``

शिवाय, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, केवळ तुमची  शैक्षणिक पात्रता ही तुम्हाला एक उत्तम मुलगा किंवा मुलगी, एक उत्तम शेजारी बनवू शकत नाही. तुम्ही केलेले चांगले काम हेच तुम्हाला समाजात चांगले नाव मिळवून देऊ शकते. एक फरक तुम्ही नेहमी लक्षात ठेवला पाहिजे आपण पुस्तकांमधून शिकतो ते शिक्षण असते, तर आयुष्य आपल्याला शहाणपण शिकवत असते.

पुढील करिअरबाबतची तुमची निवड ही तुमच्या कौशल्य आणि योग्यता किंवा स्वाभाविक कल यातून योग्य दिशा घेऊन घडले पाहिजे. मातृभूमीला नेहमी स्मरणात ठेवा, असेही आवाहन मी तुम्हाला करतो. आपल्या मातृभूमीबद्दल कृतज्ञता दर्शविण्यासाठी तुमच्या राष्ट्राच्या विकासात आणि विकासात  काही योगदान देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. मला खात्री आहे की, तुम्ही कर्तव्यनिष्ठ नागरिक म्हणून देखील उत्कृष्ट कामगिरी निश्चितच कराल. 

जागतिक स्तरावर भारताला चमकविण्यात आपली भूमिका बजावण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे, असे करण्यासाठी आपल्याकडे संधी देखील आहे. शांततेने एकत्र कसे जगावे आणि निसर्गाचे संवर्धन कसे करावे, याचा जगाला महत्त्वपूर्ण धडा देण्याच्या अनन्यसाधारण स्थितीमध्ये आता आपला देश आहे. जसजसे भारत अधिक आर्थिक वृद्धी आणि अधिक समानता साध्य करतो, तसतसे जग अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या दिशेनेच येत आहे. भारताच्या या कथेमधला पुढचा अध्याय लिहिण्याची क्षमता तुमच्यापैकी प्रत्येकाची आहे. गरज आहे ती केवळ आकांक्षांची. जेव्हा तुम्हा याबाबतीत गोंधळल्यासारखे वाटेल, तेव्हा गांधींजींचा एक सल्ला तुम्हाला निश्चित मार्ग दाखवेल. गांधीजींनी म्हटले आहे - ``एखाद्याच्या जीवनाचा प्रत्येक मिनिट उपयुक्त पद्धतीतने घालविण्याच्या तत्त्वावर भर दिला जाणे म्हणजे नागरिकत्त्व मिळविण्याचे उत्तम शिक्षण आहे.``

 

महिलांनो आणि सद्गृहस्थांनो,

या समारंभानिमित्त, मी येथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांप्रति देखील कौतुक व्यक्त करतो. या युवा मनांना घडविण्यात आणि त्यांच्या संबंधिक क्षेत्रामध्ये त्यांना सर्वोत्तम घडविण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या आणि मोठे योगदान देणाऱ्या विद्यापीठातील शिक्षकवृदांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील मी कौतुक करतो.

मी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. भविष्यातील तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये माझ्या शुभेच्छा, सदिच्छा तुमच्या पाठिशी आहेत.

 

धन्यवाद,

जय हिंद !

*****

Jaydevi PS/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1703841) Visitor Counter : 168