उपराष्ट्रपती कार्यालय

ग्रामीण भागात प्रगत वैद्यकीय आरोग्य सुविधा देण्यासाठी खासगी-सार्वजनिक भागीदारीचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


दांडी मोर्चा, बार्डोली सत्याग्रह यात अवलंबलेली शांतीपूर्ण विरोधाची पद्धत आजही लागू.

उपराष्ट्रपतीकडून नवसारीत निराली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी

Posted On: 05 MAR 2021 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मार्च 2021
 

आरोग्य सुविधांच्या बाबतील शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये असलेली दरी सांधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज केले. त्यासाठी खाजगी क्षेत्राने निमशहरी आणि ग्रामीण भागात विस्तार करण्याचे आणि लोकांना किफायतशीर आरोग्य सुविधा पुरवण्याचे आवाहनही त्यांनी केले. सरकारने पुढाकार घेत खाजगी क्षेत्राशी भागीदारी करत आधुनिक वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागात आणि विशेषतः दुर्गम क्षेत्रात न्याव्यात अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

गुजरातमधील नवसारी येथे निराली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी करताना उपराष्ट्रपती बोलत होते. कोविड-19 महामारीने आपल्याला आरोग्य राखण्याचे महत्त्व शिकवले. त्याचप्रमाणे चांगल्या आरोग्य सुविधा त्या भागाचा आर्थिक विकास करण्यात महत्वाचा वाटा उचलतात असेही त्यांनी नमूद केले.

परिणामकारक आणि किफायतशीर आरोग्य व्यवस्था ही गरीबांवरील आर्थिक ओझे हलके करून कामातील उत्पादनक्षमता सुधारते, शाळांमधील अनुपस्थिती कमी करते आणि परिणामी सकारात्मक विकासाला बळकटी देते, असे सांगत, उत्तम आरोग्य हे त्या व्यक्तीची, समुदायाची आणि पुढे जाऊन समाजाचीही मिळकत ठरते,  अशी पुस्ती त्यांनी जोडली.

जीवनशैलीशी संबंधित असलेले कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार यासारखे आजार देशातील 60 टक्के मृत्युंना कारणीभूत ठरत असल्याचे नमूद करून याविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

बैठी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अनारोग्यकारक सवयी यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्य तज्ञांनी मोहीम हाती घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली.

आरोग्याविषयक अधिक समग्र व सर्वंकष दृष्टिकोन स्वीकारण्याच्या आवश्यकतेवर उपराष्ट्रपतींनी भर दिला.

चांगले आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आनंदी राहण्यासाठीचे  प्रयत्न, असे सांगत ह्या दृष्टिकोनाला अनुसरून वैद्यकीय व्यावसायिकांनी तसेच रुग्णालयांनी आरोग्य सेवेत अधिक मानवकेंद्री दृष्टीकोन आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.

समारोपापूर्वी उपराष्ट्रपतींनी त्या भागातील दांडीचा मीठ सत्याग्रह आणि बार्डोली सत्याग्रह या ऐतिहासिक चळवळींचा उल्लेख केला. 1930 मधील दांडी मोर्चाची जागतिक पातळीवर  दखल घेतली गेली असे सांगून नायडू म्हणाले, “यावरून आपल्याला आत्मशक्ती आणि आत्मनिर्भरता यांच्यामधील  बळ ध्यानात येते.” आपल्या लक्ष्यासाठी शांततापूर्ण मार्गाचा अवलंब करणाऱ्या कोणत्याही चळवळींसाठी या चळवळी कायम आदर्शभूत आहेत, असेही ते म्हणाले.

या भागातील लोकांच्या सेवेसाठी आरोग्यसेवा परिसर उभारण्यासाठी एल् अँड टी ग्रुपचे अध्यक्ष ए.एम.नाईक यांनी परोपकारी वृत्तीने केलेल्या प्रयत्नांचे नायडू यांनी कौतुक केले.

उपराष्ट्रपतींच्‍या संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा 


* * *

S.Tupe/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702751) Visitor Counter : 259