संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची संयुक्त कमांडर्सबरोबर चर्चा
Posted On:
05 MAR 2021 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2021
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे गुजरातमधील केवडिया येथे सुरू असलेल्या संयुक्त कमांडर्स परिषद 2021 मध्ये विवेचन सत्रांसाठी सशस्त्र दलांच्या संयुक्त कमांडर्सबरोबर सहभागी झाले. केवडिया येथे पोहोचल्यानंतर लगेचच सिंह यांनी लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांना आदरांजली वाहण्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली.
परिषदेतील उद्घाटन भाषण देताना सिंह यांनी राष्ट्राच्या संरक्षण आणि सुरक्षेवर परिणाम करणारे अनेक मुद्दे मांडले. लष्करी धोक्याच्या वाढत्या स्वरुपाबाबत, या धमक्यांना तोंड देण्यात सशस्त्र दलाची महत्वपूर्ण भूमिका आणि भविष्यात युद्धाच्या स्वरुपात होणारे अपेक्षित बदल यावर त्यांनी विस्तृत भाषण केले. पूर्व लडाख सीमेवर चीनबरोबरच्या संघर्षादरम्यान सैनिकांनी दाखवलेल्या नि: स्वार्थ धैर्याबद्दल त्यांनी मनापासून कौतुक व आदर व्यक्त केला. संरक्षण विभाग, संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण संशोधन व विकास विभाग आणि वित्तीय सल्लागार संरक्षण सेवा विभागाच्या सचिवांनीही संयुक्त कमांडर्सबरोबर विविध संबंधित बाबींविषयी आपले विचार मांडले.
संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत दिवसभरात झालेल्या दोन सत्रांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली, त्यातील काही चर्चा बंद दाराआड झाल्या. या विचारविनिमयांमध्ये सशस्त्र दलांच्या सध्या सुरु असलेल्या आधुनिकीकरणावर, विशेषत: एकात्मिक थिएटर कमांड तयार करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर देण्यात आला. सशस्त्र दलात मनोबल आणि प्रेरणा तसेच अभिनवतेला प्रोत्साहन यासारख्या मुद्द्यांवर तिन्ही सेवेतील जवान आणि तरुण अधिकाऱ्यांनी उपयुक्त प्रतिसाद दिला आणि उत्साहाने आपल्या सूचना मांडल्या.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702724)
Visitor Counter : 282