पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांच्यात आभासी शिखर परिषद

Posted On: 04 MAR 2021 8:01PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन दरम्यान 5 मार्च 2021 रोजी आभासी शिखर परिषदेचे आयोजन  करण्यात आले आहे.

2015 पासून उभय नेत्यांमध्ये हा पाचवा संवाद असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल, 2018 मध्ये पहिल्या भारत नॉर्डिक परिषदेसाठी स्टॉकहोमला गेले होते. पंतप्रधान स्टीफन लॉफवेन मेक इन इंडिया सप्ताहासाठी फेब्रुवारी, 2016 मध्ये भारतात आले होते. यापूर्वी, उभय नेते सप्टेंबर, 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या बैठकीत भेटले होते. एप्रिल, 2020 मध्ये, उभय नेत्यांनी कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी दूरध्वनीवरून चर्चा केली. याव्यतिरिक्त, त्यांचे महामहीम राजा कार्ल सोळावे गुस्ताफ आणि स्वीडनची राणी सिल्व्हिया डिसेंबर, 2019 मध्ये भारतात आले होते.

भारत आणि स्वीडन दरम्यान लोकशाही, स्वातंत्र्य, बहुलता आणि नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या सामायिक मूल्यांवर आधारित सौहार्द आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. व्यापार आणि गुंतवणूक, नवोन्मेश, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच संशोधन आणि विकास या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे अतिशय जवळचे सहकार्याचे संबंध आहेत. आरोग्य आणि आयुर्विज्ञान, वाहन उद्योग, स्वच्छ तंत्रज्ञान, संरक्षण, अवजड यंत्रसामग्री आणि उपकरणे अशा विविध क्षेत्रात जवळपास 250 स्वीडिश कंपन्या भारतात सक्रियपणे कार्यरत आहेत. तसेच स्वीडनमध्ये सुमारे 75 भारतीय कंपन्या कार्यरत आहेत.

शिखर परिषदेदरम्यान, उभय नेते द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत चर्चा करतील आणि कोविड नंतरच्या काळात सहकार्य अधिक बळकट करण्यासह क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवरील आपली मते मांडतील.

***

S.Tupe/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1702547) Visitor Counter : 235