सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनी आभासी पद्धतीने “सुगम्य भारत ॲप" आणि “ॲक्सेस- द फोटो डायजेस्ट” या पुस्तिकेचे केले उद्‌घाटन

Posted On: 02 MAR 2021 4:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2021

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी आज नवी दिल्ली इथे दूरदृश्य प्रणालीद्वारे आभासी पद्धतीने सुगम्य भारत ॲप" आणि ॲक्सेस-द फोटो डायजेस्ट या नावाच्या पुस्तिकेचे उद्‌घाटन केले. यावेळी, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रत्तन लाल कटारिया हे देखील उपस्थित होते.

अँड्रॉइड प्रणालीवर आधारित फोन वापरणाऱ्यांना प्ले स्टोअर वरून हे मोबाइल ॲप डाउनलोड करता येईल. या अ‍ॅपची आयओएस स्वरूपातील आवृत्ती 15 मार्च 2021 पासून उपलब्ध होईल.

सुगम्यतेला लोकांच्या सहभागाद्वारे सार्वजनिक स्तरावर नेण्यासाठी पंतप्रधानांनी अशा एका मोबाईल अप्लिकेशन ची कल्पना मांडली ज्यामध्ये दिव्यांगजन आणि इतरांनाही सुगमतेबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जनसामान्यांच्या सहभागातून सार्वजनिक स्तरावर उपाय शोधता येतील असे गेहलोत यांनी सांगितले.

यातून दोन उद्देश साध्य करता येतील. एक म्हणजे सुगमतेविषयी  संवेदनशीलता निर्माण करून लोकांमध्ये जाणीव जागृती करणे आणि दुसरे म्हणजे बांधकाम केलेली ठिकाणे, वाहतूक क्षेत्र आणि इतर सेवांमध्ये असलेल्या   सुगमता विषयक वैशिष्ट्यांमध्ये  आवश्यक बदल घडवून आणणे.

देशभरात सुगमता विषयक बदल लागू करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे ॲक्सेसिबल इंडिया मोहिमेअंतर्गत सार्वत्रिकरित्या सुगम आणि समावेशक भारताचे स्वप्न साकार करण्यास मदत होईल.

 सुगम्य भारत ॲप"हे वापरास अत्यंत सोपे मोबाईल ॲप असून त्याची नोंदणी प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे, ज्यात नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल अॅड्रेस या फक्त तीनच बाबी भरणे अनिवार्य आहे. नोंदणीकृत वापरकर्ते त्यांना येणाऱ्या सुगमतेशी संबंधित अडचणींबाबत  प्रश्न विचारू शकतील अशी माहिती गेहलोत यांनी दिली.

हे ॲप मराठी भाषेत देखील उपलब्ध आहे. या ॲपमध्ये फोटो अपलोड करायची सुविधा दिलेली आहे त्यामुळे ज्या ठिकाणी सुगमतेशी संबंधित काही समस्यांवर तोडगा काढणे आवश्यक आहे तिथले फोटो काढून त्याचे जीओ टॅगिंग करून तो फोटो अपलोड करता येईल.

देशभरातील सार्वजनिक सुविधा आणि सेवांच्या परिचालनादरम्यान सुगमतेचा दर्जा सुधारण्याचे साधन म्हणूनच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सुगम्यतेच्या महत्त्वाविषयी जनतेत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी एक लक्षवेधी मोहीम म्हणून देखील सुगम्य भारत ॲप उपयुक्त ठरेल असे मत रत्तन लाल कटारिया यांनी यावेळी व्यक्त केली.

 

M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701967) Visitor Counter : 207