रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून राष्ट्रीय महामार्गांसाठी मानांकन यंत्रणेचा प्रारंभ


चालू आर्थिक वर्षात दिवसाला 35 किमीच्या सरासरीने 11,000 किमी पेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांची निर्मिती

उर्वरित कालावधीत रस्ते बांधकामाचा वेग वाढवून दिवसाला 40 किमीचा दर साध्य करण्याचा  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा निर्धार

Posted On: 01 MAR 2021 9:44PM by PIB Mumbai

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बांधून पूर्ण झालेल्या 18,668 किमी लांबीच्या 4/6 मार्गिकांच्या 343 टोल प्लाझा असलेल्या राष्ट्रीय महामार्गांसाठी मानांकन प्रणाली सुरू केली आहे. विकसित राष्ट्रीय महामार्गांच्या वापरासाठी शुल्क देणाऱ्या वापरकर्त्यांविषयी आपले उत्तरदायित्व वाढवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही प्रणाली सुरू केली आहे. सार्वजनिक सेवांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीकोनानुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

महामार्ग वापरणाऱ्यांच्या दृष्टीकोनातून तणावमुक्त वातावरणात कमाल सुरक्षेसह किमान वेळ हे या मानांकन प्रणालीचे मूलभूत उद्दिष्ट आहे.

महामार्गावरील प्रत्येक टोल प्लाझाचे मूल्यांकन कार्यक्षमता, सुरक्षा आणि वापराच्या सेवा या तीन निकषांच्या आधारे करण्यात येत आहे. मंत्रालयाने देखील देशभरातील टोल प्लाझांवर रियल टाईम देखरेख सुरू केली आहे.  टोल प्लाझा/ शहरी रस्ते/ महामार्गांवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी विविध प्रकारच्या संगणकीय मूल्यांकन प्रणाली आणि त्वरित निर्णयांमुळे मिळणाऱ्या परिणामांचा आधार घेतला जात आहे. प्रवासाचा वेळ वाचवणे, ग्राहकांना चांगला अनुभव देणे, इंधनाच्या नासाडीमुळे होणाऱ्या खर्चात बचत करणे आणि कार्बन फूटप्रिंट कमी करणे यामुळे शक्य होणार आहे.

या मूलभूत तंत्रज्ञानामुळे रस्ते बांधकाम आणि व्यवस्थापनातील त्रुटी शोधणे शक्य होईल, अशी अपेक्षा यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली. त्यामुळे रस्त्यांमधील दोष जलदगतीने दूर करणे सोपे होईल, असे त्यांनी सांगितले. आयआयटी आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करण्यात येईल आणि प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. फास्टॅगमध्ये येणाऱ्या समस्या या सुरुवातीच्या टप्प्यातील समस्या आहेत आणि त्यांचे निराकरण करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

या वर्षी दिवसाला 35 किमी या गतीने 11,035 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले. या वर्षाच्या उर्वरित कालावधीत या गतीमध्ये वाढ करून दिवसाला 40 किमीचे रस्ते बांधण्याचा निर्धार गडकरी यांनी व्यक्त केला.

***

S.Tupe/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701806) Visitor Counter : 197