कृषी मंत्रालय
10,000 एफपीओंची स्थापना आणि प्रोत्साहन या केंद्रीय मध्यवर्ती योजनेचा प्रथम वर्धापन दिन साजरा
एफपीओमुळे शेती अधिक व्यवहार्य होईल: केंद्रीय राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला
Posted On:
01 MAR 2021 9:38PM by PIB Mumbai
“10,000 शेतकरी उत्पादक संघटनांची (एफपीओ) स्थापना आणि प्रोत्साहन” या केंद्रीय मध्यवर्ती योजनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त, एफपीओचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळी आणि लेखाकारांसाठी तयार केलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि कैलाश चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 29 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तरप्रदेशातील चित्रकूट येथे 6865 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीसह पंतप्रधानांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. यावेळी रुपाला यांनी नवीन एफपीओना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र वितरित केले.
एफपीओ शेतीला अधिक व्यवहार्य करेल. एफपीओ ही केवळ एक योजना नसून नव भारतामध्ये भारतीय कृषी क्षेत्राला नवीन आयाम देणारी एक योजना आहे असे रुपाला यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.
ही एक क्रांतिकारी योजना असून या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल असे चौधरी यांनी या योजनेचे वर्णन केले.
10,000 एफपीओची स्थापना या योजनेमुळे, शेतकऱ्यांच्या बांधावरच कृषी मालाची विक्री करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वृद्धिंगत होईल. यामुळे पुरवठा साखळी कमी होऊन परिणामी विपणन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण झाल्यामुळे शेताच्या बांधावरच विपणन आणि मूल्यवर्धनाच्या पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणूकीला चालना मिळेल.
***
S.Tupe/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701803)
Visitor Counter : 212